अखेर भटकळला फाशी पण…

yasin-bhatkal
हैदराबादच्या दिलसुख नगर भागामध्ये २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दोन बॉम्बस्फोट घडवून १८ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल इंडियन मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या स्फोटाच्या कटाचा सूत्रधार यासीन भटकळ याचाही फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे. मात्र या पाचपैकी केवळ चारच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. कटाचा सूत्रधार असलेला भटकळ हा मात्र फरारी असून सध्या तो पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली असली तरी तो ती शिक्षा भोगण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात येईल अशी काही शक्यता नाही. कारण त्याच्या संबंधाने भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान दाऊद इब्राहिमच्या प्रत्यारोपणाप्रमाणेच केवळ आरोप-प्रत्यारोप होत राहणार आहेत.

असे असले तरी भारतात एखाद्या दहशतवादी घटनेच्या संदर्भात तपास होऊन आरोपीला शिक्षा सुनावली जाण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे. कारण साधारणतः दहशतवादी कारवायात आरोपी सापडत नाहीत. सापडले तरी पुरावे सापडत नाहीत आणि एवढ्यावरही पोलिसांनी खटला दाखल केलाच तर सबळ पुराव्या अभावी आरोपी सुटण्याचीच शक्यता जास्त असते मात्र हैदराबादच्या या दहशतवादी कृत्याच्या संबंधात पोलिसांनी अगदी थोड्या वेळात खटलाही उभा केला आणि विशेष न्यायालयात का होईना पण केवळ तीन वर्षाच्या कालावधीत खटल्याचा निकालसुध्दा लागला. त्यामुळे समाधान व्यक्त करायला हरकत नाही.

आता लागलेला निकाल विशेष न्यायालयातला आहे. त्यावर उच्च न्यायालयात अपिल दाखल करता येते. तसे ते केले जाणार आहे आणि शिक्षा झालेले आरोपी शेवटच्या पायरीपर्यंत निर्दोष ठरवून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मात्र विशेष न्यायालयातला निकाल जसा त्वरेने लागला तसाच तो वरिष्ठ न्यायालयातसुध्दा लागला पाहिजे. २००८ पासून २०१५ पर्यंत भारतात झालेल्या दहशतवादी कारवायामध्ये यासीन भटकळचे नाव वारंवार येत होते. शेवटी तो एका प्रकरणात का होईना पण शिक्षा होईपर्यंत अडकला. त्याच्या पळून जाण्यानंतर देशातल्या दहशतवादी कारवायाही कमी झाल्या. मात्र त्याने इंडियन मुजाहिदीनचे जाळे पूर्ण भारतभर पसरवले होते. म्हणूनच आता शिक्षा झालेल्या आरोपीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातला एकजण आहे. चौथा आरोपी पाकिस्तानातला आहे.

Leave a Comment