विरोधी ऐक्याचा बोजवारा

rahul-gandhi
केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे शेतीची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे असे कॉंग्रेस नेत्यांना वाटते. त्यामुळेच लोकसभेत सातत्याने नोटबंदीच्या विरोधात पवित्रा घेऊन आपण देशातल्या शेतकर्‍यांची मोठी सहानुभूती कमावली आहे असा त्यांचा ग्रह झालेला आहे. त्यामुळेच हे सहानुभूतीचे सत्र पुढे चालवत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे शेतकर्‍यांच्या काही मागण्या ठेवल्या. अशारितीने देशातला शेतकरी वर्ग आपल्याकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीने करावयाच्या कारवाईचे चक्र पूर्ण झाले असून आता हा वर्ग आपल्याकडे पूर्णपणे आकृष्ट होणार आहे असे कॉंग्रेस नेत्यांना वाटते. अन्यथा राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासमोर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी ठेवण्याचे अन्य काही कारण नव्हते.

राहुल गांधी यांनी अशारितीने एक राजकीय डाव टाकला असला तरी संसदेमध्ये सरकारच्या विरोधात केलेल्या विरोधी ऐक्याला त्यांच्या या प्रयत्नाने नख लागले आहे. या सगळ्या विरोधकांनी मिळून नोटाबंदीच्या विरोधात फारच जोरदार आंदोलन केले होते. देशभरात आक्रोश दिन पाळला होता. सर्वांनी एकत्रित येऊन संसदेचे कामकाज बंद पाडले होते. मात्र या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने हातात हात घालून केल्या असताना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर नरेंद्र मोदींची भेट घेताना कॉंग्रेसच्या नेत्यांनी ती मात्र इतर विरोधी पक्षांना टाळून केवळ कॉंग्रेसच्याच नेत्यांसह घेतली. त्यामुळे दोन्ही कम्युनिष्ट पार्टी, सपा, बसपा, द्रमुक इत्यादी अन्य विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे सर्व विरोधकांचे ऐक्य करण्याचा दावा करायचा आणि पंतप्रधानांची भेट घेताना मात्र केवळ कॉंग्रेसच्याच नेत्यांनी घ्यायची ही कॉंग्रेसची दुटप्पी चाल आहे अशी तक्रार अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली.

कॉंग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी यावर खुलासा केला असून कॉंग्रेसची यात कसली दुटप्पी चाल नाही असे स्पष्ट केले आहे. विरोधकांचे ऐक्य हे संसदेच्या पातळीवरच होते. ते सर्वंकष नव्हते असे आझाद म्हणाले. संसदेच्या बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेस पक्ष आपल्याला हवी ती कारवाई करण्यास मोकळा आहे असा दावा त्यांनी केला. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा काही विरोधी नेत्यांचा मनसुबा कॉंग्रेसच्या स्वार्थी धोरणामुळे उधळला गेला आहे. विरोधी पक्षातील दुफळीच त्यातून दिसून आली आहे.

Leave a Comment