भाजपाची मुसंडी

bjp
नगरपालिका निवडणुकांच्या दुसर्‍या सत्रात पुणे आणि लातूर या जिल्ह्यातील १४ नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या नगरपालिका दहा होत्या आणि लातूर जिल्ह्यातल्या चार होत्या. लातूर जिल्हा परंपरेने कॉंग्रेसच्या वर्चस्वाखालचा तर पुणे जिल्हा परंपरेेने राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालचा होता. या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने चांगलीच मुसंडी मारली असून लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व कमी केले आहे तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला हादरा दिला आहे. पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व निर्विवाद होते. भाजपाला तिथल्या कित्येक नगरपालिकांमध्ये पाय ठेवायलासुध्दा जागा मिळत नव्हती. निवडणूक लढवण्याची इच्छा आहे परंतु भाजपाच्या संपर्कात कोणी येतच नाही अशी स्थिती अनेक नगरपालिकांमध्ये असे. अशा प्रतिकूल वातावरणात पुणे जिल्ह्यातल्या दहा पैकी तीन नगरपालिका भाजपाने जिंकल्या आहेत. तीन नगरपालिकांत कॉंग्रेसने विजय मिळवला आहे तर बारामती नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व टिकून राहिले आहे.

निवडणुकीच्या निकालांचे विश्‍लेषण करताना अनेक प्रकारच्या आकड्यांच्या साह्याने करावे लागते. त्यातले कोणते आकडे कोणासाठी अनुकूल आहेत हे बघून त्याच आकड्यांवर भर दिला जातो आणि पराभव झालेल्या एखाद्या पक्षाचा पराभव हा सुध्दा कसा विजयच आहे असे दाखवता येते. भाजपाची पुणे जिल्ह्यातली मुसंडी ज्यांना मानवत नाही त्यांनी विश्‍लेषणाची चलाखी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातून काही नगरपालिका निसटल्या असल्या तरी एकूण नगरसेवकांची संख्या मोजायला गेल्यास त्यात राष्ट्रवादीचा पहिला क्रमांक येतो. तेव्हा तोच तो क्रमांक दाखवून राष्ट्रवादीचे वर्चस्व अजूनही शिल्लक आहे असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. काल निवडणुका झालेल्या चौदा नगरपालिकांमध्ये एकूण ३२४ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ९३ आणि भाजपाचे ८१ नगरसेवक निवडले गेले. याचा अर्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला क्रमांक आहे असे म्हणत काही वृत्तपत्रांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली असे वर्णन करायला सुरूवात केली आहे. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे आणि ते त्यांचे राहते गाव आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपली सारी शक्ती या बालेकिल्ल्यात पणाला लावली त्यामुळे या नगरपालिकांच्या ३९ जागांपैकी ३५ जागा त्यांना मिळाल्या. या ३५ जागा वगळल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकांची संख्या ६० च्या जवळपास येते.

म्हणजे राष्ट्रवादीने घेतलेली ही पहिल्या क्रमांकावरची झेप केवळ बारामतीवर अवलंबून आहे. बारामती वगळली तर राष्ट्रवादीची अवस्था विदारक आहे. भाजपाच्या एकूण ८१ नगरसेवकांचा विजय झाला. हा आकडा राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा कमी आहे. परंतु तो सांगत असताना या पूर्वीच्या नगरपालिकांमध्ये भाजपाचे किती नगरसेवक होते याचा आकडा कधी दिला जात नाही. वस्तुस्थिती अशी आहे की यापूर्वी भाजपाच्या हातात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याही जागा नव्हत्या. ३४५ जागांपैकी भाजपाच्या हातात सात-आठ जागा होत्या. तिथून भाजपाने ८१ वर झेप घेतली आहे. ही खरी झेप आहे. राष्ट्रवादीने मिळवलेल्या ९३ जागा ही झेप नसून अवनती आहे. कॉंग्रेसला या निवडणुकीत मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले. लातूर जिल्ह्यातले या पक्षाचे वर्चस्व जवळजवळ संपुष्टात आले. चारपैकी एकही नगरपालिका कॉंग्रेसला जिंकता आली नाही. भाजपने मात्र दोन नगरपालिकांत निर्विवाद वर्चस्व आणि नगराध्यक्षपदे काबिज केली. एक नगरपालिका भाजप आणि शिवसेनेच्या मतविभागणीमुळे अपक्ष आघाडीच्या हातात गेली. तिथे शिवसेनेचा उमेदवार नसता तर तिसरी नगरपालिकासुध्दा भाजपाला मिळाली असती.

कॉंग्रेसला पुणे जिल्ह्यात मात्र दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यातल्या दहा पैकी तीन नगरपालिकांत कॉंग्रेसचा विजय झाला. लातूर जिल्ह्यात झालेल्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातला हा विजय कॉंग्रेसला दिलासा देणारा ठरला आहे. परंतु एकूण ३२४ जागांपैकी कॉंग्रेसला केवळ ४५ जागा मिळाल्या आहेत आणि मराठवाड्यातल्या नगरपालिकांमध्ये त्यांची सदस्य संख्या वेगाने घसरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नोटाबंदीच्या निर्णयाच्या संबंधात बराच वाद जारी आहे. नोटाबंदीचा प्रयोग फसला आहे असा विरोधकांचा दावा असून लोकांना पैशासाठी रांगा लावाव्या लागत असल्यामुळे जनता भाजपावर प्रचंड नाराज आहे असे त्यांना वाटते. या कथित नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक झाली. मात्र मतदान आणि भाजपाची मुसंडी असे दर्शविते की नोटाबंदीवरून जनता भाजपावर नाराज नाही. नगरपालिकांच्या निवडणुकांतील भाजपाच्या या यशाने नोटाबंदीच्या नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यात हातात असलेल्या सत्तेचा वापर करून विविध पातळ्यांवरच्या निवडणुका जिंकण्याची सवय लागली होती. मात्र राज्यातली सत्ता हातातून जाताच त्यांचा विविध निवडणुकांमध्ये दारूण पराभव व्हायला लागला आहे.

Leave a Comment