छापासत्र

note
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही लोकांनी आपल्या जवळचा काळा पैसा जो हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये जमा केलेला होता तो त्यांनी बँकांत जमा करावा असे आदेश देण्यात आले. ज्यांच्याकडचा पैसा पांढरा असेल तोच उजळ माथ्याने बँकेत जाणार आणि आपला वैध पैसा तिथे जमा करणार. त्याच्या बदल्यात त्याला नव्या नोटा मिळतील असे घडणारच होते. मात्र काही चलाख काला धनवाल्यांनी नियमातल्या अनेक पळवाटांचा वापर करून आपले पैसे वेगवेगळ्या मार्गांनी बँकेत जमा केला आणि तसा तो केल्यामुळे तो आता पांढरा झाला आहे अशी त्यांचीही कल्पना झाली आणि लोकही तसेच मानून चालले आहेत. खरे म्हणून असे किती पैसे जमा झाले याची कोणाकडेही नोंद नाही. मात्र नोटाबंदीचा हेतू फसलेला आहे आणि अनेक कालाधनवाल्यांनी आपला पैसा बँकेतून पांढरा करून घेतलेलाच आहे अशा कल्पनेत अनेक माध्यमातले पत्रकार आणि काही जाणकार अर्थतज्ञही मश्गुल आहेत. विरोधी पक्ष तर तसा प्रचार करतच आहेत. त्यांचे ते कामच आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी तर काळा पैसा आहेच कोठे असा सवाल केला आहे.

जो काळा पैसा होता तो बँकेत जमा होऊन पांढरा झाला आहे अशीच चिदंबरम् यांचीही कल्पना आहे. परंतु प्रत्यक्षात ज्या लोकांनी असे प्रयत्न केले ते आता पुराव्यानिशी सरकारच्या हाती सापडले आहेत आणि अशा लोकांवर छापे पडून त्यांच्या ताब्यातील जुन्या किंवा नव्या नोटांच्या स्वरूपातली काळी संपत्ती हस्तगत करण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच गेल्या तीन दिवसात एक हजार कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी उघड केली आहे. हे छाप्यांचे सत्र असेच जारी राहणार आहे. म्हणजे पी. चिदंबरम् काहीही म्हणत असले तरी नोटाबंदीच्या निर्णयाच्यावेळी डोळ्यासमोर ठेवलेली कारवाईची दिशा चुकलेली नाही.

काळा पैसेवाले या मार्गाने सापडणारच आहेत असे सरकारचेही मत होते आणि ते लोक आता सापडायला लागले आहेत. या छाप्यांमध्ये काही क्विंटल वजनाएवढे सोने हस्तगत झालेले आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला तेव्हा अनेक कथित तज्ञांनी, काळेधन नोटांपेक्षा सोन्यात अधिक गुंतवलेले असते तेव्हा सरकारने सोन्याची दखल घेतली पाहिजे असे म्हटले होते. सरकारने तशी दिशा पकडलेलीसुध्दा आहे. त्यानुसार देशात विविध ठिकाणी काही क्विंटल वजन भरेल एवढे सोने सापडलेले आहे. अशा प्रकारच्या किती कारवाया होतात आणि त्यातून सरकारला किती पैसा मिळतो हे तर आगामी काळातच कळणार आहे. मात्र विरोधी पक्षांना ही सारी योजना फसली असल्याचा प्रचार करण्याची सध्या संधी मिळाली आहे.

Leave a Comment