कर्नाटकातील सीडी कांड

hy-meti
कर्नाटकाचे अबकारी कर मंत्री एच वाय मेती यांनी त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या आरोपावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मेती यांनी आपल्या खात्यातल्या एका कर्मचारी महिलेला तिच्या मनानुसार बदली करण्याचे आश्‍वासन दिले पण त्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली असा त्यांच्यावर आरोप आहे. या त्यांच्या वर्तनाची सीडी तयार करण्यात आली आहे. ती कन्नड भाषेतल्या एका वृत्त वाहिनीवर दाखवण्यातही आली आहे. अर्थात तिच्यातून फार काही स्पष्ट होत नाही पण त्यांच्यावर आरोप करणार्‍यांकडें काहीतरी पुरावा आहे असे चित्र निर्माण करण्यात या सीडीचा वापर होऊ शकतो. म्हणून मेती यांनी राजीनामा दिला आहे आणि सरकारने या प्रकरणाची वाट्टेल ती चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.

मेती यांच्या राजीनाम्याला एक राजकीय कड आहे. मेती हे मुख्यमंत्री सिद्रामय्या यांचे निकटचे सहकारी आहेत. ते ७१ वर्षांचे असून कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना मान दिला जातो. धनगर समाजातले ते एकमेव मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने या समाजात मोठी नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. मेती यांनी राजीनामा देताना आपल्या विरोधातली कसली तरी सीडी तयार असल्याचे सांगितले जात असले तरी अशी कसलीही सीडी तयार नाही असे ठामपणे म्हटले आहे. माहितीच्या आधिकारात काम करणारे कार्यकर्ते राजशेखर मळोली यांनी मात्र ही सीडी तयार असल्याचे ठामपणे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीवर ही कथित सीडी लावण्यातही आली. मात्र तिची विश्‍वासार्हता कमी होणारा एक प्रकार घडला.

या प्रकरणात ज्या महिलेचे नाव घेण्यात येत आहे तिच्याशी या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी संपर्क साधला आणि तिची मुलाखत घेऊन या सीडीसोबतच तिचे प्रसारणही केले. त्यात मात्र ही महिला मंत्र्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगताना दिसते. ती पत्रकारांवर भडकली आणि तिने पत्रकारांना झापले. श्री. मेती हे आपले नातेवाईक आहेत आणि त्यांच्या वयाचा तरी विचार पत्रकारांनी करायला हवा होता असे ती म्हणाली. आपण मेती यांना चांगले ओळखतो. त्यांच्याकडून असा प्रकार घडणारच नाही असे तिने ठामपणे सांगितले. या कथित सीडीच्या विश्‍वासार्हतेवर मोठेच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ही सीडी तयार करणारे कार्यकर्ते श्री. राजशेखर मळोली यांनी मात्र अशी सीडी असल्याचे तर म्हटले आहेच पण अशाच प्रकारच्या चित्रफिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये अजून एक मंत्री आणि तीन आमदार गुंतले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment