गुंतवणुकीत महाराष्ट्र पुढे

investment
मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये परदेशी गुंतवणुकीला मोठे महत्त्व आलेले आहे. एकेकाळी या देशातली अर्थव्यवस्था परकीय भांडवलासाठी बंद होती. पण नंतर हे धोरण बदलण्यात आले. आता परदेशी कंपन्यांसाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत. ज्या राज्यांच्या पायघड्या जास्त सुखद वाटतील त्या राज्यात परदेशी कंपन्या आपली गुंंतवणूक करत आहेत आणि त्यासाठी या लोकांना महाराष्ट्र हा अधिक सुखकर आणि अनुकूल वाटलेला दिसत आहे. गेल्यावर्षी भारतात एकूण १ लक्ष ४४ हजार ६०० कोटी एवढी परदेशी गुंतवणूक भारतात झाली. या गंुंतवणुकीचे राज्यनिहाय आकडे समोर आले आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्राने याबाबतीत आघाडी मिळवलेली आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. १ लाख ४४ हजार ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी ६२ हजार ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

या गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राचे अन्य कोणाशीही स्पर्धा नाही. इतकी अन्य राज्ये त्याच्या मागे आहेत. मात्र दिल्लीला महाराष्ट्राच्या बरोबरीने गुंतवणूक झाली आहे. १५-१६ सालचा या संबंधातला नेमका आकडा पहायचा झाला तर दिल्लीत महाराष्ट्रापेक्षा किंचित अधिक गुंतवणूक झाली आहे. ते महाराष्ट्रापेक्षा तब्बल २० हजार कोटींनी जास्त आहे. परंतु चालू वर्षीच्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजे पहिल्या दोन तिमाहीमध्ये महाराष्ट्राने दिल्लीला फार मागे टाकले आहे. या काळातली म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये दिल्लीमध्ये २३ हजार ४१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. पण याच काळात महाराष्ट्रात मात्र ६८ हजार ४०९ कोटी रुपये परदेशातून भारतात आले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात दिल्ली किंचित पुढे असली तरी चालू वर्षीच्या तिमाहीत मात्र महाराष्ट्राने दिल्लीपेक्षा तिप्पट अधिक गुंतवणूक आकृष्ट केली आहे. हा फरक का पडला याचे उत्तर शोधावे लागणार आहे. मुंबईमध्ये गतवर्षी झालेल्या इनव्हेस्टमेंट मीटच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या परदेशी गुंतवणुकीच्या करारावर सर्वाधिक जास्त सह्या झाल्या होत्या. ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली तेव्हा अनेकांनी एवढी गुंतवणूक प्रत्यक्षात येणार आहे का असे सवाल उपस्थित केले होते. मात्र या वर्षीच्या सहामाहीतले हे आकडे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे त्या कार्यक्रमानंतर केलेले दावे खरे असल्याचे लक्षात येत आहे.

Leave a Comment