कल्लोळ माजवण्याचा आटापिटा

currency
नोटा बंदीच्या मुद्यावरून बराच मोठा हलकल्लोळ करावा आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला त्रस्त करून सोडावे असा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. एकामागे एक गंभीर आरोप करायचे आणि एकच गोंधळ उडवून द्यायचा अशी कार्यपध्दती कॉंग्रेसने अवलंबिलेली दिसत आहे. जनतेला खूप त्रास झाला, अर्थव्यवस्था कोसळली, लोक उद्धवस्त झाले. असे एकापेक्षा एक गंभीर, मनगडंत आरोप लावून नोटाबंदी हा एक मोठा फज्जा आहे असे वातावरण निर्माण करायचा कॉंग्रेसचा डाव दिसत आहे. सरकार लोकसभेत या विषयावर चर्चाच करायला तयार नाही अशीही सरकारची बदनामी करण्याचा डाव कॉंग्रेसने रचला परंतु लोकसभेत सरकार चर्चेला उत्सुक आहे आणि कॉंग्रेसचे नेतेच चर्चेपासून पळ काढण्यासाठी सदनात गोंधळ घालत आहेत. हे पुरतेपणी स्पष्ट झाले. त्यामुळे सरकार चर्चेला घाबरते या आरोपातली हवा आपोआपच निघून गेली. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण बोलल्यास मोठा भूकंप होईल कारण नोटाबंदी हा देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे अशी डरकाळी फोडली.

राहुल गांधींनी काही म्हटले असले तरी त्यावर लोकांचा विश्‍वास बसलेला नाही. कारण ते करत असलेल्या आरोपामध्ये त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातला पोरकटपणा पूर्णपणे स्पष्ट होत असतो. नोटाबंदीच्या संबंधात राहुल गांधी काहीतरी आरोप करत आहेत आणि एका आरोपाचे कसलेही पुरावे न देता किंवा आरोपाचे स्पष्टीकरण न करता पुढचा नवा निराधार आरोप करत आहेत. अशा रितीने आरोपांच्या बाबतीत त्यांनी हिट अँड रन हे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही आरोपावर कोणीही गंभीरपणे विचारच करत नाही. आपण लोकसभेत बोलल्यास भूकंप होईल अशी धमकी देणारे राहुल गांधी नंतर त्या भूकंपाविषयी काहीच बोलले नाहीत आणि नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीमध्ये केलेला गैरव्यवहार नेमका कशा स्वरूपाचा आहे याचा कसलाही खुलासा त्यांनी केला नाही. अशाप्रकारे स्वतःच्याच आरोपाचे त्यांनी स्वतःच हसे करून घेतले आहे. आता त्यांनी सरकार गरिबांना रोकडमुक्त करून भिकेला लावत आहे असा नवा आरोप केला आहे. परंतु सरकारने कोणालाही रोकडमुक्तीची सक्ती केलेली नाही आणि जो कोणी रोकडमुक्तीच्या मोहिमेत सहभागी होईल तो भिकारी होण्याचा प्रश्‍नच येत नाही. हातात नोटा घेऊन व्यवहार करण्यापेक्षा चेक, ड्राफ्ट, ऑनलाईन पेमेंट किंवा ई-बटवा यासारखी साधने वापरल्याने ते वापरणार्‍याच्या आर्थिक परिस्थितीत कसलाही फरक पडत नाही हे तर लोकांना माहीतच आहे.

राहुल गांधी यांचा हा आरोप खरा मानायचे झाले तर ज्या प्रगत देशांनी कॅशलेस इकॉनॉमी राबवलेली आहे त्या देशाच्या सरकारांनी तिथल्या लोकांना भिकेला लावले असेच म्हणावे लागेल. भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा पाया राहुल गांधींच्या वडिलांनीच घातलेला आहे. तेव्हा त्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर पैशाच्या देवाणघेवाणासाठी करणे हे ओघाने आलेच. तेव्हा राहुल गांधी नरेंद्र मोदींवर आरोप करतानाच आपल्या वडिलांच्या माहिती तंत्रज्ञानावर आरोप करत आहेत याचे भान त्यांना नाही. फार जपून बोलावे, अभ्यासपूर्वक बोलावे, तार्किकपणे बोलावे, पुराव्यानिशी बोलावे याचे त्यांना वावडेच आहे. सध्या तर नोटाबंदीच्या प्रश्‍नावरून लोकांना त्रास होत असल्यामुळे या संबंधात सरकारवर कसलाही आरोप केला तरी चालते; त्यामुळे काही बिघडत नाही. नरेंद्र मोदींची लोकप्रियता लोकांमध्ये कमी होत तेव्हा तार्किकता, पुरावे, अभ्यास, तारतम्य यांचा कसलाही विचार न करता आता या मोक्याला सरकारविरुध्द बोलले पाहिजे असे त्यांना कोणीतरी सांगितलेले दिसत आहे.

राहुल गांधींच्या आरोपांची अशी वासलात लागत असल्यामुळे कॉंग्रेसने आता अर्थतज्ञ असलेल्या पी. चिदंबरम् यांना मैदानात उतरवले आहे. नोटाबंदीच्या संबंधात पूर्वी अर्थमंत्री असलेलेच एक मंत्री बोलले तर त्याला विश्‍वासार्हता येईल अशा भावनेने पी. चिदंबरम् यांना बोलते करण्यात आलेले दिसत आहे. परंतु ते अर्थतज्ञ आणि माजी अर्थमंत्री असले तरी त्यांनाही अर्थशास्त्राच्या भाषेत सरकारची काही चूक दाखवता आलेली नाही. उलट त्यांनी जे आकडे सादर केले ते त्यांच्यावरच उलटणारे ठरले आहेत. देशात १६ लाख कोटी रुपयांचे चलन होते. त्यातले १२ लाख कोटी रुपयांचे चलन रिझर्व्ह बँकेेकडे बदलण्यासाठी आलेले आहे. हे आकडे उद्धृत करून चिदंबरम् यांनी, मग काळा पैसा निघाला कोठे असा सवाल केला आहे. खरे म्हणजे जे चार लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडे आलेले आहेत ते काळेच आहेत आणि म्हणूनच ते रिझर्व्ह बँकेकडे येऊ शकलेले नाहीत. हे चिदंबरम् यांनी सादर केेलेल्या आकड्यावरूनच दिसत आहे. शिवाय जे १२ लाख कोटी रुपये सरकारकडे आले आहेत त्यांची छाननी केल्यानंतर त्यातही काही काळे पैसे सापडणारच आहेत. त्यांची छाननीसुध्दा सुरू आहे. तेव्हा पी. चिदंबरम् यांना मैदानात उतरवून कॉंग्रेसने नेमके काय साधले हे कळत नाही. पी. चिदंबरम् हे कॉंग्रेसकडचे सर्वाधिक विश्‍वासार्ह ठरू पाहणारे तज्ञ होते आणि या सर्वाधिक मोठ्या अस्त्राचा बार फुसका ठरला आहे. दरम्यान परिस्थिती सुधारत आहे.

Leave a Comment