दुर्मिळ दातृत्व

wedding1
औरंगाबादच्या मुनोत कुटुंबानेे आपल्या कन्येचा विवाह शंभर गरिबांना घरे बांधून देऊन साजरा केला. या कुटुंबाचे आणि मुनोत यांचे व्याही, जावई या सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेल्या दातृत्वाचे दर्शन त्यांनी घडवले आहे. मुनोत यांच्या श्रीमंतीचा विचार केला असता या विवाहाच्या सोहळ्यास एखादा कोटी रुपये सहजच खर्च झाला असता. पण असा पैशाचा चुराडा करण्यापेक्षा त्याच पैशातून ९० घरे बांधावीत अशी कल्पना त्यांना सुचली. काटकसरीने बांधल्या जाणार्‍या ९० घरांची वसाहत त्यांनी उभीही केली आणि याच वसाहतीत मुलीचा विवाह केला.

आपल्या कन्येचे विवाहाचे स्वप्न साकार करतानाच मुनोत यांनी ९० गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार करून दिले. मुनोत यांच्यासाठी एक लाख ही फार मोठी रक्कम नाही पण त्यांच्या एवढ्या खर्चात एका कुटुंबाच्या डोक्यावर स्वत:च्या मालकीचे छप्पर निर्माण होते. अशा या घरात मुनोत यांनी ज्या गरीब लोकांना स्थायिक केले आहे ती सारी कुटुंबे श्रमजीवी, दररोज कमावून खाणारे मजूर, लोकांच्या घरात धुणी भांडी करून जेमतेम पोट भरणार्‍या महिला, पुरुष यांची आहेत. त्यातल्या काही लोकांची स्थिती तर एवढी जेमतेम आहे की त्यांच्यात स्वत:च्या घराचे स्वप्न पाहण्याचीही क्षमता नाही. पण त्याचे जन्माचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जो खर्च येतो तो काही लोकांच्या हातचा मळ असतो. आपण आज एक लाख रुपयांचा विचार करायला लागतो तेव्हा काळा पैसा बाळगणारांच्या काळ्या धनाचे आकडे आपल्यासमोर येतात.

काही लोकांनी काही कोटी रुपयांच्या जुन्या नोटा गटारात फेकल्या असल्याचे आढळले आहे. त्यांनी त्या नोटा घरात साचवून ठेवण्याऐवजी त्यात काही गरीब लोकांची कामे केली असती तर देशातल्या गरिबांची मदत झ्राली असती. एखाद्या नराधम काळा पैसावाला करोडो रुपये म्हणजे शेकडो गरिबांची जन्माची स्वप्ने घरात साठवून ठेवत असतो.त्यात त्याला काय समाधान मिळते हे काही कळत नाही. अनेक श्रीमंतांचा हॉटेलातला एका दिवसाच्या मुक्कामाचा खर्च एखादा लाख रुपये असतो. त्यात बचत करून त्याने ते पैसे गरिबाला दिले तर त्याचा एक मुक्काम हा गरिबांच्या कायमच्या मुक्कामाच्या खर्चाएवढा असतो हे लक्षात येईल. अनेक लोक आपल्या पैशाची किती उधळपट्टी करीत असतात हे आपण पाहतो, कोणी पाण्यात लग्न करतो तर कोणंी हवेत माळा घालतात. अशा लोकांनी आपल्या अशा विवाहाचे खर्च वाचवले तर कितीतरी मोठी कामे होतील.

Leave a Comment