टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी

cyrus-mistry
मुंबई: टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर आता टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरूनही त्यांना दूर करण्यात आले आहे. कालांतराने टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांमधून मिस्त्री यांना पायउतार करण्यात येणार आहे.

टाटा इंडस्ट्रीजच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून त्यामध्ये मिस्त्री यांना संचालक पदावरून दूर टाटा सन्सच्या वतीने भागधारकांना करण्यात आले. मिस्त्री यांच्या संचालक पदावर असण्याने कंपनीमध्ये मतभेद, विसंवाद आणि विघटनवादी गढूळ वातावरण निर्माण होत असल्याने त्यांना हटविण्याचे आवाहन टाटा सन्सच्या वतीने करण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन भागधारकांनी बहुमताने मिस्त्री यांची संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

यानंतर टाटा समूहातील अन्य ६ कंपन्यांचीही विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्या त्या कंपन्यांच्या संचालकपदावरून मिस्त्री यांना हटविण्यात येणार आहे. ऑकटोबर महिन्यात मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्या जागी माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी तात्पुरती सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यानंतर रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यामध्ये परस्पर आरोपांचे वाग्युद्ध सुरू आहे.

Leave a Comment