जीवनाच्या आकलनाचा अभाव

jayalalitha1
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाचे दुःख असह्य होऊन तामिळनाडूमध्ये ७७ जण मरण पावल्याची माहिती अण्णा द्रमुक पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यातले बरेच लोक अम्माच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मेले आहेत तर काही जण गेल्या दोन तीन दिवसात आजारी पडून निराश अवस्थेत हे जग सोडून गेले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अशी जणू परंपराच पडली आहे. नेत्यांवरची श्रध्दा किंवा भक्ती आपण समजू शकतो. ती असावीच. ती असण्यात काही चूक नाही पण ही भक्ती किती असावी याला मर्यादा असली पाहिजे. जयललिता या मोठ्या नेत्या होत्या. त्यांच्याविषयी कोणाला आदर वाटत असेल तर तो त्याचा विषय आहे आणि त्याला आपण हरकत घेऊ शकत नाही. परंतु नेता कितीही मोठा झाला तरी त्याला एक ना एक दिवस या जगातून जायचेच आहे. माणूस हा मर्त्य प्राणी आहे. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. तेव्हा साधारण सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जयललिता हे जग सोडून गेल्या यामध्ये जगावेगळे काही घडलेले नाही.

त्यांच्या जाण्याने कोणाच्या मनात निराशा उत्पन्न होऊ शकते. परंतु आता जयललिता जिवंत नाहीत म्हणून आपणही जगण्यात काही अर्थ नाही अशी जर कोणाची समजूत झाली असेल तर त्यांच्या मनामध्ये जगण्यामरण्या विषयीचे आकलन कमी आहे असेच म्हणावे लागेल. तामिळनाडचे माजी मुख्यमंत्री आणि जयललिता यांचे गुरु एम. जी. रामचंद्रन यांच्याबाबतीही असेच घडले होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्या होत्या. ही पराकोटीची भक्ती उद्भवते कशातून? रामचंद्रन यांना तामिळनाडूतील जनता चित्रपटाचा अभिनेता म्हणून ओळखत होती. त्यांचे चित्रपट एका छापाचे होते आणि प्रत्येक चित्रपटात रामचंद्रन यांची भूमिका गरिबांचा कैवार घेणारा, सावकारांचा कर्दनकाळ नायक अशीच रंगवण्यात आलेली होती. त्यामुळे लोकांच्या मनावर त्यांच्या चित्रपटातील प्रतिमेचे गारूड होते. अर्थात ती प्रतिमा पडद्यावरची होती. प्रत्यक्षातल्या आयुष्यातली नव्हती. वास्तव जीवनातील एम. जी. रामचंद्रन ही व्यक्ती सावकारांचा कर्दनकाळ होती की नाही हे माहीत नाही परंतु चित्रपटात त्यांची तशी भूमिका होती आणि तामिळनाडूतले चित्रपट रसिक त्यांना खरोखरच गरिबांचा कैवारी हिरो समजत होते. मग असा माणूस मरण पावलाय याचा अर्थ गरिबांचा कैवारी गेलाय असाच होतो.

असा हा गरिबांचा कैवारी जगातून गेला आहे. त्यामुळे आता गरिबांचा तारणहार कोण अशा प्रश्‍नाने हे चाहते हैराण होत असत आणि आता गरिबांचे जीणे अशक्य होऊन जाणार या निराशेने ते आत्महत्या करत असत. एम. जी. रामचंद्रन यांच्या प्रमाणेच एन. टी. रामाराव यांच्याबाबतीतही घडले होते. रामाराव यांनी प्रदीर्घकाळ चित्रपटात राम आणि कृष्णाच्या भूमिका केल्या होत्या. ते राजकारणात आले तेव्हा अगदी नवखे होते. एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणूनसुध्दा त्यांना कामाचा अनुभव नव्हता. मात्र तरी पदार्पणातच लोकांनी त्यांना भरघोस मते दिली आणि त्यांना मुख्यमंत्री केले. आंध्रातल्या जनतेला याबाबत विचारण्यात आले तेव्हा लोकांचे उत्तर तयारच होते की, आम्ही रामाला मते दिली आहेत. म्हणजे चित्रपटातल्या पडद्यावरच्या रामाला आंध्रातले भोळेभाबडे लोक खराच राम समजत होते. पडद्यावरची भूमिका वेगळी असते आणि पडद्यावर कसलीही भूमिका करणारा नट प्रत्यक्ष आयुष्यात तसाच असतो असे नाही. मात्र या दोन्हीत फरक करण्याइतके भूमिका आणि जीवनाचे आकलन जनतेकडे नसते. त्यातून असे प्रकार घडतात.

आंध्र प्रदेशाचे एक मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे अपघाती निधन झाले. तेव्हा राज्यात १ हजार लोक हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले. राजशेखर रेड्डी हे काही चित्रपटातले अभिनेते नव्हते आणि त्यांची हिरो अशी प्रतिमाही निर्माण झालेली नव्हती. पण आंध्रातले त्यांचे चाहते आणि मतदार त्यांना उत्तम प्रशासक म्हणून आदर देत होते. आता त्यांच्या निधनानंतर मरण पावलेल्या एक हजार लोकांना पडद्यावरची भूमिका आणि वास्तव जीवनातली भूमिका यातला फरक कळत नव्हता असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या निधनानंतर मरण पावलेले हजारभर लोक एक चांगला प्रशासक गेला म्हणूनच निराश होऊन मेले आहेत. मात्र त्यांच्याही बाबतीत प्रश्‍न उपस्थित करता येतो. राजशेखर रेड्डी कितीही चांगले प्रशासक असले तरी त्यांच्या जाण्याने अशी काय स्थिती येणार होती की त्यांच्या या चाहत्यांना जगणेसुध्दा अशक्य वाटले. आंध्रातले हे लोक तामिळनाडूतल्या चित्रपटवेड्या लोकांएवढे वेडे नाहीत हे मान्य. पण तरीही त्यांच्या निधनानंतर त्यांना एवढा धक्का बसावा ही गोष्टही त्यांच्या या चाहत्यांच्या जीवनविषयक आकलनातला अभावच दाखवते. त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर कितीही प्रेम असेल परंतु पत्नीएवढे प्रेम तर नक्कीच नव्हते. त्यांच्या पत्नीला त्यांच्या निधनानंतर धक्का बसला नाही पण तो इतर हजार लोकांना बसला. पत्नी आपल्या पतीला चांगली ओळखत असते मात्र दुरून त्या व्यक्तीला पाहणारे लोक काहीतरी समज करून बसतात आणि असे धक्के बसून जीवाला मुकतात.

Leave a Comment