चर्चा अम्मांच्या वारसाची

jaylalitha
तामिळनाडूत आता जयललिता यांच्या वारसाची चर्चा सुरू आहे. खरे म्हणजे त्यांनी हा प्रश्‍न त्यांनी बर्‍यापैकी मार्गी लावला आहे आणि आपले वारस पेरिसेल्वम हे असतील असे दाखवूनही दिलेले आहे. अम्माच्या निधनाने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही गोष्ट खरी असली तरी ती पोकळी भरून येणारच नाही असे काही सांगता येत नाही. किंबहुना कोणत्याही मोठ्या नेत्याच्या निधनानंतर असेच निदान केले जाते. मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले जाते आणि ती भरून येणे अवघड असल्याचे निदान केले जाते. जयललिता यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले ओ. पेरिसेल्वम हे जयललिता यांच्याएवढे सक्षम नाहीत आणि त्यांचा जनमनावर जयललिताइतका प्रभाव नाही. त्यामुळे अण्णा द्रमुकला आता एकमुखी नेता राहणार नाही; पक्षात फूट पडेल असे भाकीत वर्तवले जात आहे. यातही नवे काही नाही. देशातल्या कोणत्याही प्रभावशाली नेत्याच्या निधनानंतर अशाच प्रकारची भाकीते वर्तवली जात असतात. मात्र ती नेहमीच खरी ठरतात असे नाही.

काही काळ गेल्यानंतर पोकळी भरून निघते, नवा नेता समोर येतो. पुरातन काळापासूनचा इतिहास पाहिला तरी या गोष्टीचा अनुभव येईल. पंडित नेहरुंच्या निधनानंतर अशीच विधाने केली गेली होती. काही लोकांनी तर नेहरुंच्या निधनानंतर या देशामध्ये लोकशाही टिकणार नाही इथंपर्यंत अंदाज बांधण्याची मजल मारली होती. मात्र त्यांच्या जागी इंदिरा गांधींचे नेतृत्व निर्माण झालेच. पंडित नेहरुंच्या निधनाच्यावेळी त्यांच्या पक्षावरचे वर्चस्व बरेच ओसरले होते. इंदिरा गांधींनी त्यापेक्षा जास्त वर्चस्व कमावले. पक्षात फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली परंतु इंदिरा गांधीच वरचढ ठरल्या. अगदी अलीकडच्या काळामध्ये आंध्रात तेलुगू देसम पक्षात एन. टी. रामाराव यांच्या निधनानंतर बंडाळी माजली, फूट पडली परंतु त्यांची तृतीय पत्नी लक्ष्मीपार्वती यांच्या नेतृत्वाखालील गट अगदीच निष्प्रभ ठरून राजकारणातून बादही झाला. एन. टी. रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू हेच एन. टी. रामाराव यांच्या मुलांना बाजूस सारून पक्षाचे सर्वेसर्वा बनले. त्यांनी पक्ष टिकवून धरला. तामिळनाडूमध्ये आणि अगदी द्रमुक पक्षातसुध्दा प्रत्येक प्रभावशाली नेत्याच्या निधनानंतर थोड्याफार फरकाने अशाच घटना घडत गेल्या. पक्षाचे संस्थापक पेरियार यांनी ही चळवळ सुरू केलेली. त्यांच्या निधनानंतर अण्णा दुराई हे पक्षाचे नेते झाले.

मात्र त्यानंतर अण्णा दुराई यांच्या निधनाने करूणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन या दोघांचे दोन गट निर्माण झाले. अण्णा दुराई गेले म्हणून पक्ष संपला नाही. उलट पक्षाचे दोन गट होऊन दोघांनीही राज्याच्या राजकारणात असे वर्चस्व निर्माण केले की ते दोनच पक्ष आळीपाळीने सत्तेवर येत गेले. एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतरही त्यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे काय होणार अशी चर्चा झाली. पक्षात फूटही पडली. परंतु शेवटी जयललिता यांचा प्रभाव निर्णायक ठरला. या पक्षात जानकी रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखाली एक गट स्थापन झाला होता. याचासुध्दा लोकांना आता विसर पडला आहे. जयललिता यांच्या निधनानंतरही आता पुन्हा या चर्चेला ऊत आला आहे. जयललिता यांच्या आयुष्यात ज्यांच्यामुळे अनेक अडचणी आल्या ती त्यांची मैत्रीण शशीकला यांचा पक्षावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न आहेच मात्र जयललिता यांनी आपल्या हयातीतच आपले खरे वारस पेरिसेल्वम हेच असतील हे एक नव्हे तर दोनवेळा स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे शशीकला यांचा वर्चस्वाचा प्रयत्न सुरू असेल तेव्हा त्या पेरिसेल्वम गटाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील.

आगामी काही दिवसात पक्षावरच्या वर्चस्वावरून शशीकला आणि पेरिसेल्वम या दोघात संघर्ष होण्याची शक्यता आहे. परंतु शशीकला यांना कसलाही राजकीय आधार नाही. त्या नेत्या नाहीत. त्यांना अण्णा द्रमुकचे नेतेही फारसे मानत नाहीत. केवळ जयललितांच्या निकटवर्ती गटात शशीकलांचा प्रभाव आहे. जयललितांची मालमत्ता, त्यांचे बंगले, सोने, दागिने जमिनी या सगळ्यांच्या मालकीवरून वाद झाला तर त्यात कदाचित शशीकला वरचढ ठरतील परंतु जयललिता यांच्या प्रमाणे पक्षाच्या सर्वेसर्वा होण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात अम्माच्या वारस म्हणून जे स्थान मिळवणे आवश्यक आहे ते त्यांना मिळवता आलेले नाही आणि मिळवता येणारही नाही. शशीकला ह्या जयललिता यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांना अम्माच्या राजकीय तत्वज्ञानाविषयी, जनहिताच्या कार्यक्रमाविषयी काहीही रस नाही. तसा त्यांनी आजवर कधी दाखवलेला नाही. जयललिता यांनीच आपल्या हयातीत आपल्या अनुपस्थितीत पेरिसेल्वम यांना मुख्यमंत्री करून तेच आपले वारस असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे राज्यातले अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते पेरिसेल्वम यांनाच आपला नेता मानतात. त्यामुळे पक्षात वर्चस्वावरून वाद झाला तरी शशीकला यांची डाळ फारशी शिजेल असे वाटत नाही. अण्णा द्रमुक पक्षाला जयललिता यांनी जोरदार नेतृत्व दिलेले होते. तेवढ्या सामर्थ्याने पेरिसेल्वम कदाचित पक्षात आपले स्थान निर्माण करू शकणार नाहीत आणि त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला काही पावले पुढे चालण्याची संधी मिळू शकते. गेल्या पन्नास वर्षापासून कॉंग्रेसची तामिळनाडूत फरपट झालेली आहे. तिच्यातून सावरून कॉंग्रेसचे नेते जयललिता यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीत आपले स्थान वाढवू शकतात. मात्र हे काम राहुल गांधी यांच्या ऐवजी पी. चिदंबरम् यांच्यावर सोपवले गेले पाहिजे.

Leave a Comment