तामिळनाडूच्या अम्मा

jayalalitha3
तामिळ भाषेत अम्मा या संबोधनाचा अर्थ बहिण असा होतो. जयललिता यांना तामिळनाडूतल्या समस्त जनतेने आपली लाडकी अम्मा बनवले होते. जयललिता या एम. जी. रामचंद्रन यांच्या वारस म्हणून राजकारणात आल्या होत्या. रामचंद्रन हे गरिबांचे नेते होते. शाळेत येणारी गरिबांची मुले पोटभर जेवून शाळेत येत नसतील तर त्यांचे शिकण्यात लक्ष कसे लागेल असा प्रश्‍न त्यांना पडत असे. त्यातून त्यांनी शाळेतल्या मुलांना मधल्या सुट्टीत सरकारच्या खर्चाने जेवण देण्याची योजना सुरू केली. १९८० च्या दशकामध्ये त्यांनी ही योजना सुरू केली तेव्हा सार्‍या देशात त्यांची टिंगलटवाळी करण्यात आली. पण आज सार्‍या देशामध्ये मध्यान्ह्य भोजनाची योजना लागू झाली आहे. त्यातून रामचंद्रन यांची दूरदृष्टी दिसून आली. त्यांचाच वारसा पुढे चालवत जयललिता यांनी गरीब, दलित आणि महिला यांच्यासाठी एवढ्या कल्याणकारी योजना सुरू केल्या की तामिळनाडूतल्या जनतेने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. केवळ महिलांसाठी पोलीस ठाणे, महिलांना नोकरीत आरक्षण, एक रुपयांत स्वस्त जेवण, दलित विद्यार्थिनींना सरकारी खर्चाने सायकल देणे अशा कितीतरी योजनांचा उगम जयललिता यांच्या कल्पनेने झालेला आहे.

१९९१ साली जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला विधानसभेच्या २३४ पैकी २२५ जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या विरोधी द्रमुक पक्षाचे केवळ ९ सदस्य निवडून आले. जयललिता यांचे पहिले मुख्यमंत्रीपद असे नाट्यमय आणि खळबळजनक ठरले. त्यांनी त्यासाठी तामिळ जनतेच्या भावनांना असा काही हात घातला होता की, जनतेने त्यांना देवासारखा मान दिला. ताीमळनाडूतल्या जनतेच्या नाडीवर बोट ठेवणे सोपे नाही. त्यात निदान १९९१ साली तरी जयललिता यांना यश आले. पण याच जनतेने त्यानंतर म्हणजे १९९६ साली झालेल्या निवडणुकीत जयललिता यांना असे काही भिरकावून दिले की ज्याचे नाव ते. १९९१ साली सत्तेवर आलेल्या जयललिता यांनी आपल्या या पहिल्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराने तामिळ जनता अशी काही नाराज झाली की तिने जयललितांना केवळ पायउतारच केले असे नाही तर त्यांना केवळ चार जागा मिळाल्या. स्वत: जयललिताही पराभूत झाल्या. तामिळनाडूच्या जनतेच्या मनाचा ठाव लावणे भल्याभल्यांना जमलेले नाही. कॉंग्रेसलासुध्दा त्यामुळे गेली ५० वर्षे तामिळनाडूत हातातून गेलेली सत्ता पुन्हा मिळवता आलेली नाही. याच जनतेने एम.जी. रामचंद्रन यांच्यावर मात्र विलक्षण प्रेम केले होते आणि त्यांना सलग तीन वेळा मुख्यमंत्री केले होते.

तामिळ जनता फार व्यक्तीवादी आहे. तसे भारतातले लोक थोडया बहुत प्रमाणात व्यक्तिवादीच आहेत पण तामिळनाडूची व्यक्तिवादी संस्कृती वेगळीच आहे. जिचा अंदाज कोणालाच येत नाही. अशा अनप्रेडिक्टेबल मतदारांवर जयललिता यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचे गारूड टाकले होते. यातच त्यांचे नेता म्हणून असलेले कौशल्य पणाला लागले होते. दि. ४ डिसेंबरला जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची बातमी राज्यात पसरली. जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलला हलवण्यात आले असल्याचे कळताच तिथे त्यांचे हजारो चाहते जमले. कित्येक महिला धाय मोकलून रडायला लागल्या. पुरुषही रडताना दिसले. आक्रोश करताना दिसले. एका चाहत्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचेे निधन झाले. काही लोकांनी दगडफेक केली. आता हे लोक नेमकी अशी प्रतिक्रिया व्यक्त करतील याचा नाही नेम सांगता येत नाही म्हणून पोलीस अधिकारीही कोड्यात पडले. तिथले लोक असे आहेत म्हणून जयललिता यांना तिथल्या राजकारणावर हुकमत प्राप्त करताना फार मोठ्या मानसिक वादळांतून प्रवास करावा लागला.

जयललिता यांचे सारे जीवनच वादळी होते. त्यांचे कुटुंब फार सधन होते. आजोबा वकील होते पण वकील असलेले जयललिता यांचे वडील फार काळ जगले नाहीत. जयललिता यांनी वयाच्या दुसर्‍या वर्षी पितृछत्र गमावले. त्यावर त्यांची आई वेदवल्ली ही कर्नाटकातून चेन्नईला नोकरीच्या निमित्ताने आली. तिला नाटकाची आवड असल्याने नोकरी करतानाच नाटकात आणि सिनेमात काम करायला लागली. तिचे सिनेसृष्टीतले नाव संध्या होते. त्यांनी जयललितालासुध्दा चित्रपटात कामे करण्यास भाग पाडले आणि तिचे वकील होण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. त्यांच्यावर ही जबाबदारी जबरदस्तीने पडली असली तरीही त्यांनी हेही क्षेत्र गाजवले. तेलुगु, तामिळ आणि कन्नडमध्ये १४० चित्रपटात कामे केली. त्यांचे काही अपवाद वगळता सारे चित्रपट सिल्व्हर ज्युबिलीचे ठरले. त्यातल्या काही भूमिकांबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि तीन वेळा फिल्म फेअर ऍवॉर्डही मिळाले. त्यांच्या शेवटच्या २८ चित्रपटाचे नायक होते एम.जी.रामचंद्रन. ते चित्रपटातल्या लोकप्रियतेच्या जोरावर मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी १९८२ साली जयललिता यांना राजकारणात आणले आणि पदार्पणातच त्यांना आमदार केले. नंतर १९८४ साली जयललिता यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाचा फायदा होईल म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवले. त्यांचा चित्रपटातला प्रवेश नाट्यमय होता तसाच चित्रपटातून राजकारणात झालेला प्रवेशही नाट्यमय होता.

एमजीआर यांनी जयललिता यांच्याकडे आपला वारस म्हणून पाहिले होते पण पक्षातले नेते त्या भावनेने त्यांच्याकडे पहात नसत. त्यामुळे आपल्याला पक्षाच्या प्रमुख म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जयललिता यांना संघर्ष करावा लागला. त्यांच्या निकटच्या सहकारी शशीकला यांच्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले झाले आणि त्यामुळे त्यांचा सारा राजकीय प्रवासच काट्यांनी भरलेला झाला. अनेक खटल्यांत त्यांची निर्दोष मुक्तता झाली पण खटला चालू असल्याच्या काळात त्यांना मानसिक यातनाही सहन कराव्या लागल्या आणि दोन वेळा मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यांचा जवळपास २० वर्षांचा राजकीय कार्यकाळ खटल्यांनी झाकोळलेला होता. राजकारणात केवळ अपघाताने प्रवेश केला असूनही त्यांनी राजकारणात आपल्या नावाची मोहर उमटवली. हे करताना त्यांचे आयुष्य म्हणजे एक संघर्षपर्व ठरले. राजकारणातली ही कहाणी दीर्घकाळ स्मरणात राहील.

Leave a Comment