आठवड्याला २४ हजारच काढण्याची अट शिथील

rbi
मुंबई – नागरिकांना आता रिझर्व्ह बँकेकडून मोठा दिलासा मिळणार असून बँक खात्यातून आठवड्याला फक्त २४ हजार काढण्याची अट आता आरबीआयने शिथील केली आहे. त्यामुळे आता बँकेतून २४ हजाराहून जास्त रक्कम काढता येणार आहे. हा निर्णय २९ नोव्हेंबरपासून लागू होईल.

चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा लादण्यात आली होती. मात्र आता आठवड्याला २४ हजारापेक्षा जास्त रोकड काढता करता येईल. ही मर्यादा किती रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, त्याबाबत अद्याप माहिती नाही. मोठी रक्कम दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांच्या स्वरुपात मिळणार आहे. दैनंदिन व्यवहारात ज्यांना मोठी रोकड हाताळावी लागते, अशा बँक खातेधारकांना मोठी रक्कम काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच काही जण मोठी रक्कम बँकेत भरण्यासही काकू करत आहेत. त्यामुळेच आरबीआयने अशा खातेधारांना दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईचा काळ असल्यामुळे अनेक कुटुंबांनाही या निर्णयामुळे हायसे वाटणार आहे.

दरम्यान २७ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या बँकांमध्ये ३३,९४८ कोटी रुपयांच्या जुना नोटा बदलण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. तर ८,११,३३ कोटी रुपयांची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या घोषणेनंतर ग्राहकांनी बँकेतून काढलेल्या रकमेचीही माहिती आरबीआयने दिली आहे. गेल्या २० दिवसांत देशभरातल्या बँकांमधून २,१६,६१७ कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली. सध्या ग्राहकांना पाचशेच्या जुन्या नोटा महत्त्वाच्या सेवांसाठी वापरता येणार आहे.

Leave a Comment