राष्ट्रवादीला दणका

ncp
महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला जबरदस्त फटका बसला. कॉंग्रेसची इभ्रत थोडक्यात वाचली. भारतीय जनता पार्टीने एक जागा जादा जिंकून दोन जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेला अनपेक्षितपणे एक जागा मिळाली. या निवडणुकीत सर्वाधिक फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला. मतदान झालेल्या सहा जागांपैकी चार जागा आधीच राष्ट्रवादीकडे होत्या. त्यातल्या तीन जागा या पक्षाने गमावल्या. कॉंग्रेसला दोन जागा राखता आल्या. सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यात प्रचंड कटुता आहे आणि दोन पक्ष एका आघाडीत असूनसुध्दा एकमेकांची तोंडे पहात नाहीत. त्यांच्यातल्या या मतभेदांचा लाभ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी उठवावा त्यासाठी हाती हात घ्यावेत अशी कल्पना दोन्ही पक्षाचे सामान्य कार्यकर्ते व्यक्त करत असतात तरीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे अहंकार आडवे येतात. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसतो.

विधान परिषदेच्या निवडणुकीतच कॉंग्रेसने राष्ट्रवादीकडे मैत्रीचा हात दिला होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या मदतीची गरज नसल्याचे जाहीर केले. आपण स्वबळावर चारी जागा निवडून आणू असा अजितदादांचा विश्‍वास अनाठायी ठरला. विदर्भातल्या भंडारा, गोंदिया या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनवान नेते प्रफुल्ल पटेल हे सक्रीय झाले होते. कारण त्यांना पक्षाची इभ्रत तेथे राखायची होती. या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर मोठे आव्हान होते. अर्थात प्रफुल्ल पटेल यांचा राजकारणावरचा प्रभाव मोठा असल्यामुळे ते हे आव्हान पेलू शकतील असे वाटले होते. किंबहुना प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवार पडूच शकत नाही असा विश्‍वास सर्वांना वाटत होता. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात फाटाफूट झाल्यामुळे ही जागा भाजपाच्या परिणय फुके यांना मिळाली. प्रफुल्ल पटेल यांच्या पसंतीचे उमेदवार रमेश जैन यांना १२१ मते पडली. कॉंग्रेसच्या प्रफुल्ल अग्रवाल यांना ११२ मते मिळाली तर भाजपाच्या फुके यांना १५३ मते मिळाली. केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील फाटाफुटीचा फायदा भाजपला मिळाला. परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या विजयाने एका बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला तर मुख्यमंत्र्यांची इभ्रत राखली गेली.

पुणे विधान परिषद मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे अनिल भोसले हे निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेसची इभ्रत वाचली. परंतु अनिल भोसले यांचा विजय अपेक्षितच होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही मोहरे भाजपाच्या गळाला लागतील अशी चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू होती आणि पार्श्‍वभूमीवर तिथे काय जादू घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु राष्ट्रवादीमधले बंड फारसे प्रभावी ठरले नाही आणि अनिल भोसले निवडून आल्याने राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. सातारा, सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही तिथे कॉंग्रेसने चमत्कार घडवला. तिथला राष्ट्रवादीचा पराभव हा अजितदादांचा पराभव मानला जातो. कारण हा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा केवळ बालेकिल्लाच होताच असे नाही तर तिथे अजितदादांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पंतगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादीची जागा हिसकावून घेतली. सांगली, सातारा या दोन्ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असतानासुध्दा राष्ट्रवादीला हार मानावी लागली.

नांदेड मतदारसंघात कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून विद्यमान आ. अमर राजूरकर यांना निवडून आणले. मतदार संघात असलेल्या संख्याबळाचा विचार करता कॉंग्रेसचा विजय होणार हे निश्‍चित होते. परंतु पक्षांतर्गत गटबाजीचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो अशी चर्चा होती. तिथे कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने अशोक चव्हाण यांची इभ्रत वाचली आहे. जळगाव मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली पण ती एकनाथ खडसे यांच्या विरोधात लावली होती. परंतु भाजपाच्या पक्षांतर्गत मतभेदांना थारा मिळाला नाही आणि फडणवीस यांच्या पसंतीचा उमेदवार चंदू पटेल निवडून आला. हीही जागा राष्ट्रवादीने गमावली. यवतमाळ मतदारसंघात तर शिवसेनेने स्पृहणीय यश मिळवले. मराठवाड्यात कार्यरत असलेले तानाजी सावंत विदर्भात जाऊन केवळ विजयीच झाले असे नव्हे तर त्यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही जागा हिसकावून घेतली आहे. विद्यमान आ. संदीप बजोरीया यांना केवळ दोन मते मिळाली. तानाजी सावंत यांच्या विजयामुळे शिवसैनिकांना आनंद होणे साहजिक आहे. परंतु हा विजय नेमका कशाने मिळाला त्याचा शोध घेतल्यास फार स्थिती अानंददायक नाही असे दिसेल. विधानपरिषदेची निवडणूूक आजकाल केवळ पैशावर चालते याचा प्रत्यय दरवेळी येत आहे.

Leave a Comment