
महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम दैनिकाने दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जाहीर केले असून या संबंधात चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवर शिक्षणाविषयीची सांख्यिक माहिती संकलित करणार्या युडाएस या यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून या अहवालात दरवर्षी महाराष्ट्रातले अडीच लाख विद्यार्थी दहावीनंतरच्या शिक्षणाला वंचित राहतात असे कळले आहे. राज्य सरकारचीही एक यंत्रणा या गणतीचे काम करते. तिला सरल यंत्रणा असे म्हटले जाते. या प्रणालीने दिलेल्या माहितीवरूनसुध्दा महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थी दहावीनंतर शिकू शकत नाहीत असे आढळून आले आहे. वास्तविक पाहता ही स्थिती वाईट आहे परंतु पूर्वीच्या प्रमाणाच्या तुलनेत विचार केला असता ही स्थिती तुलनेने चांगली आहे. उपरोक्त माहितीनुसार २०१५-१६ या वर्षी १६ लाख ३ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यातल्या अडीच लाख विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण घेता आले नाही. केवळ साडेतेरा लाख विद्यार्थीच दहावीनंतरच्या कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पुढे शिकायला लागले.
प्रवाह पतित
उर्वरित विद्यार्थी दहावीपर्यंत शिक्षण थांबवून उपजीविकेच्या मागे लागले आहेत. भारतामध्ये यापूर्वी उच्चशिक्षणाच्या प्रमाणाचे अनेक अहवाल प्रसिध्द झालेले आहेत आणि साधारणतः १० टक्के विद्यार्थीच उच्च शिक्षण घेऊ शकतात असे या अहवालातून सांगण्यात आलेले आहे. या आकड्याच्या तुलनेत आताचा आकडा निश्चितच समाधानकारक आहे. मात्र जेवढे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतात तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना नंतरच उच्च शिक्षण घेता आले पाहिजे हे खरे आहे. सरकारचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि एक ना एक दिवस किमान अशी परिस्थिती निर्माण होईल की दहावी उत्तीर्ण झालेले १०० टक्के विद्यार्थी नंतर किमान बारावीपर्यंत किंवा समकक्ष शिक्षण घेत आहेत. ती स्थिती यावी अशी सदिच्छा आपण व्यक्त करू. परंतु या निमित्ताने हाती आलेल्या आकड्यावरून आपल्याला देशातली बेकारी का वाढत आहे हे समजू शकते. १६ लाख दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी साडेतेरा लाख विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. परंतु त्या साडेतेरा लाखात ११ लाख ७० हजार विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्या शाखांना प्रवेश घेतात. ही स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. कारण या शाखांच्या शिक्षणातून रोजगारक्षम प्रशिक्षण मिळत नाही.
साडेतेरा लाखातून ७० हजार विद्यार्थी अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेतात आणि १ लाख १३ हजार विद्यार्थी आयटीआयला जातात. तांत्रिक शिक्षणाकडे वळलेल्या या दोन विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम २ लाखसुध्दा नाही. म्हणजे ज्या शिक्षणाने नोकरी मिळण्याची थोडीबहुत तरी शक्यता आहे असे शिक्षण घेणार्याचे प्रमाण निरर्थक पदव्या घेणार्यांच्या पाचपटीने कमी आहे. तांत्रिक शिक्षणाची ही अवस्थाच आपल्या देशातल्या बेकारीचे कारण आहे. वास्तविक पाहता दहावी उत्तीर्ण होणार्या अधिकधिक विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाकडे वळायला हवे. परंतु ११ लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांकडे जातात आणि केवळ दोन लाख विद्यार्थी तांत्रिक शिक्षणाकडे वळतात. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या या निरर्थक आकर्षणामुळे हजारो विद्यार्थी दहावीनंतर पाच वर्षे शिक्षण घेऊनही पुन्हा बेरोजगारच राहतात. कारण या तीन शाखांचे शिक्षण नोकरीचे कसलेही कौशल्य प्रदान करीत नाही आणि या पदव्या मिळवणारे विद्यार्थी कर्मचारी म्हणून काहीही करू शकत नाहीत.
अभियांत्रिकी पदविका आणि आयटीआयचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा कमी दर्जाचा मानला जात असला तरी ते शिक्षण घेतल्यानंतर अशा विद्यार्थ्यांकरिता नोकरी दारे खुली होतात. परंतु हे माहीत असूनही विद्यार्थी तिकडे वळत नाहीत. कारण या तांत्रिक शिक्षणातून निर्माण होणार्या नोकर्या करत असताना निळे कपडे घालावे लागतात. कष्ट करावे लागतात. बाकीच्या पदव्यांचे तसे नाही. या कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेच्या पदव्या घेतल्याने जे रोजगार मिळतात त्यांना नोकरीच्या क्षेत्रात व्हाईट कॉलर्ड जॉब असे म्हटले जाते. त्या नोकर्यामध्ये आमदनी कदाचित कमी असेल परंतु या नोकर्या करताना निळे कपडे घालावे लागत नाहीत. तेलाने किंवा ऑईलने हात घाण होत नाहीत. एखाद्या कार्यालयात टेबलावर बसून, म्हणजेच सावलीत डोक्यावरचा पंखा फिरत असताना आणि नशिब असल्यास वातानुकूलित दालनातही काम करण्याची संधी मिळते. घाम न गाळत पगार मिळतो. अशा नोकर्यांना समाजात प्रतिष्ठा आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी या शाखांकडे वळत आहेत. कृषी पदविका घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या तर साडेतेरा लाखात केवळ दहा हजार एवढी आहे. म्हणजे शेतीत कष्ट करायला तर कोणीच तयार नाही. श्रमाला अप्रतिष्ठा आहे आणि व्हाईट कॉलर्ड नोकर्यांना किंमत आहे. या सामाजिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांनासुध्दा दरमहा दहा हजार रुपये कमवणारा मेकॅनिक होण्याऐवजी तीन हजार रुपये कमवणारा कारकून होणे आवडते. त्याचेच परिणाम शिक्षणात दिसत आहेत.
