आला हिवाळा ओठ सांभाळा

lips
हिवाळा आला की ओठ फाटण्याचा त्रास अनेकांना होतो. मग त्यावर निरनिराळे उपचार केले जातात. त्यातले काही उपाय प्रथमदर्शनी फायदेशीर ठरतात खरे पण त्यांचे काही दुष्परिणाम दूरगामी असतात. म्हणून या क्षेत्रातल्या तज्ञांनी अशा अपायकारक उपायांचा आग्रह सोडून पारंपरिक उपाय योजण्याचा सल्ला द्यायला सुरूवात केली आहे. हिवाळ्यात ओठ तडकू नयेत म्हणून अनेक प्रकारची रासायनिक द्रव्ये असलेले क्रिम्स बाजारात येतात आणि ते आपण वापरतो. परंतु अशा क्रिम्स्च्या ऐवजी लोणी किंवा तूप ओठांना लावणे हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो. एक तर तूप किंवा लोणी घरात सहज उपलब्ध असते आणि त्यात कसलेही केमिकल्स नसल्यामुळे साईड इफेक्टस् होण्याची शक्यता नसते.

ओठांच्या फाटण्यावर एक सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. कारण ओठ तडकणे हा एक प्रकारे डिहायड्रेशनचाच परिणाम असतो. आपण भरपूर पाणी प्यायला लागलो की शरीराला तर पाणी मिळतेच पण त्यातले काही पाणी ओठांनाही मिळून ओठ ओले राहतात. ओठ असे ओले नसले की ते शुष्क होतात आणि त्यातूनच ते तडकतात. तेव्हा भरपूर पाणी पिणे केवळ ओठालाच नव्हे तर इतर अवयवांनाही फायदेशीर ठरते. काही लोकांना जिभ अधूनमधून ओठांवरून फिरवण्याची सवय असते ती सवय बंद केली पाहिजे. ओठांवरून जिभ फिरवल्याने ओठ ओले होतात असे आपल्याला वाटते पण ते फक्त वरवरच आले होतात आणि उलट त्यांची शुष्कता आतून वाढते आणि जिभ फिरवणार्‍याचेच ओठ तडकतात.

ब जीवनसत्त्वाचे अधिक सेवन केल्याने जिभेला ओलसरपणा मिळतो. या जीवनसत्त्वाच्या अभावाने पूर्ण पचनसंस्थाच असंतुलित होत असते. पण ओठांवर त्याचा जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे विशेषतः ओठाचे कोन अधिक शुष्क होतात. ब जीवनसत्त्वाच्या अभावाने तोंड येते ज्याला माऊथ अल्सर म्हटले जाते. त्याचा परिणाम ओठांवर होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान बंद करा. धूम्रपानाचे गंभीर परिणाम ओठांवर होतात. केवळ धूम्रपानच नव्हे तर सतत कॉफी पिणार्‍याचे ओठ काळे पडलेले असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment