सुरू झाले व्हॉट्सअॅपचे व्हिडिओ कॉलिंग

whatsapp
मुंबई – व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून अपडेट होत असून आता बहुप्रतिक्षेत असलेला व्हॉट्सअॅप कॉलिंग सेवा सुरू झाली आहे. आता व्हॉट्सअॅपधारक अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोनवरून व्हिडिओ कॉल करु शकतील. मार्क झुकरबर्गने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरुन याबाबत घोषणा केली.

गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सुरु करण्याबाबत यूझर्सकडून वारंवार विनंती केली जात होती. त्यामुळे हे फीचर जगासमोर आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत असल्याचे व्हॉट्सअॅपच्या ब्लॉगवर मार्क झुकरबर्गने म्हटले आहे. वायफायवरुन तुम्ही मोफत व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकाल, अन्यथा तुमच्या मोबाईल कंपनीच्या डेटानुसार इंटरनेटचा दर लागू होईल. त्यामुळे वायफाय धारक याचा अधिक लाभ घेऊ शकतात.

व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगसाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. ज्या व्यक्तीला फोन करायचा आहे, त्याचा चॅट ओपन करा. ऑप्शन्समध्ये ‘फोन’ आयकॉनवर क्लिक करा. व्हॉईस आणि व्हिडिओ यापैकी व्हिडिओ पर्याय निवडा

फेसबुकने २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप १९ बिलियन डॉलरला विकत घेतले होते. सध्या भारतात १५ कोटी अॅक्टिव्ह व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर सध्या पर्सनल मेसेजिंग, ग्रुप चॅट, व्हॉईस कॉल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. फेसबुकने यापूर्वीच व्हिडिओ कॉलिंग सेवा लाँच केली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचं मार्केट भारतात जलद गतीने वाढत आहे. फक्त महागडे फोन वापरणारेच नाही, तर प्रत्येकापर्यंत ही सेवा पोहचवण्याचा आपला मानस असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. आतापर्यंत स्काईप, फेसबुक, गुगल ड्युओ, व्हायबर यासारख्या काही सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध आहे.

Leave a Comment