सायरस मिस्त्रींची टीसीएसच्या अध्यक्षपदावरूनही उचलबांगडी

cyrus-mistry
मुंबई – आता समुहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक मंडळ अध्यक्षपदावरूनही टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. इशात हुसेन यांची त्यांच्या जागी अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मुंबई शेअर बाजाराला टीसीएसकडून कळविण्यात आले आहे. सायरस मिस्त्री यांना या निर्णयामुळे आणखी एक मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, तातडीने त्यांच्या पदाचा कार्यभार इशात हुसेन स्विकारणार आहेत. नव्या अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत ते या पदाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या इशात टाटा समूहातील टाटा सन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. यापूर्वी इशात यांनी टाटा स्टीलचे कार्यकारी संचालक (वित्त) म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

काही दिवसांपूर्वी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर मिस्त्री यांनी समूहाच्या संचालक मंडळ तसेच विश्वस्तांना लिहिलेल्या इ-मेलमध्ये समूहाच्या एकूणच कारभारावर टीका केली होती. टाटा समूहाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले होते. मिस्त्री यांनी संचालक मंडळ सदस्य व विश्वस्तांना लिहिलेल्या व प्रसिद्ध झालेल्या पत्राबाबतची घडामोड अयोग्य असल्याचे नमूद करत हा एक ‘पोरकट’पणा असल्याचे टाटा समूहाने म्हटले आहे. आपल्याला ‘कर्जबुडवा’ अध्यक्ष म्हणून पुढे केले गेल्याचा मिस्त्री यांचा आरोपही निराधार असल्याचे समूहाने म्हटले होते.

Leave a Comment