राजधानी झाकोळली

fog1
भारताची राजधानी सध्या कथित औद्योगिक प्रगतीने झालेले कर्ब वायूचे उत्सर्जन आणि त्यातून निर्माण झालेला विषारी धूर आणि निसर्गातील धुके यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या स्मॉगने झाकोळली गेली आहे. भारतापेक्षा चीनने जास्त प्रगती केलेली आहे आणि प्रगती करत असताना प्रदूषणाकडे तेवढेच दुर्लक्षही केलेले आहे. त्यामुळे चीनची राजधानी बीजिंग याही शहराला नेहमी अशा प्रकारे स्मॉगचा वेढा पडत असतो. चीनने जास्त प्रगती केल्यामुळे चीनची राजधानी वारंवार वेढली जाते आणि आपण चीनच्या तुलनेत कमी प्रगती केली असल्यामुळे आपल्या राजधानी हे संकट बर्‍याच दिवसांनंतर कोसळले आहे. बीजिंग शहरावर असे कितीही गंभीर संकट कोसळले तरी ते बाहेरच्या जगाला कळत नाही. कारण ते कळवणारी माध्यमे चीनमध्ये मुक्त नाहीत. त्यामुळे दाट धुके पसरले आणि माणसाला माणूस दिसत नसला तरीही असे धुके पडले असल्याची बातमी देण्यासाठी वृत्तपत्रांना सरकारची परवानगी घ्यावी लागते. म्हणूनच हे संकट बीजिंग शहरावर कितीही वेळा कोसळले तरी ते प्रसिध्द करण्याची अनुमती अगदी निवडक वेळाच वृत्तपत्रांना मिळत असते.

सध्या कॉंग्रेस पक्षाला देशात दडपशाही वाढत असल्याचा भास व्हायला लागला आहे. कोणाला काय भास व्हावा हे त्याच्या त्याच्या मनःस्थितीवर अवलंबून असते. कॉंग्रेसला तसा भास झाला म्हणून देशात खरोखरच दडपशाही निर्माण झाली आहे हे कोणाला पटलेले नाही. प्रत्यक्षात देशात दडपशाही नसल्यामुळे वृत्तपत्रे दिल्लीतल्या स्मॉगच्या बातम्या मुक्तपणे प्रसिध्द करत आहेत आणि त्यातून असे उघड झाले आहे की प्रदूषणाची जी पातळी मान्यताप्राप्त असते त्या पातळीपेक्षा १७ पट अधिक प्रदूषण झाल्यामुळे दिल्लीवर ही पाळी आली आहे. म्हणजे दिल्ली शहर सुसह्य पातळीपेक्षा १७ पटींनी अधिक प्रदूषित झालेले आहे. दिल्लीच्या या स्मॉगची चर्चा जगभर वेगाने पसरली आहे. दिल्ली हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. त्यामुळे ही गोष्ट ज्यांना माहीत आहे त्यांना या स्मॉगचे काही आश्‍चर्य वाटले नाही. परंतु आपल्या देशातले अनेक लोक कोणत्याही समस्येच्याबाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यांना दिल्ली हळूहळू कशी प्रदूषित होत चालली आहे याची माहितीच नाही. अशा लोकांना मात्र दिल्लीवर मोठे संकट कोसळले आहे आणि ते अचानक कोसळले आहे असे वाटत आहे. भारतात सर्वाधिक छान कारभार करत असल्याचा दावा करणारे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. मग त्यांनी आतापर्यंत दिल्लीवर असे संकट येऊ नये यासाठी काहीच कसे केलेले नाही, याचे आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

आता हे संकट कोसळल्यानंतर त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची स्पर्धा नेहमीप्रमाणे सुरू झालेली आहे. दिल्ली शहराच्या लगत असलेल्या राज्यातील शेतकर्‍यांनी खळीदळी संपल्यानंतर राहिलेले काड जाळायला सुरूवात केल्यामुळे झालेल्या धुरामुळे दिल्लीवर हे संकट कोसळले आहे, असे विश्‍लेषण करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रदूषणाची जबाबदारी झटकून ती शेजारच्या राज्यांवर टाकली आहे. दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश होतो आणि या तीनपैकी दोन राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे अरविंद केजरीवाल नेहमीप्रमाणेच याही संकटाला मोदी जबाबदार असल्याचा आरोप करण्याची संधी मिळाली आहे. मात्र कंेंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केजरीवाल यांचा वावदूक आरोप फेटाळून लावला असून दिल्लीच्या प्रदूषणाला दिल्लीकरच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शेतकर्‍यांच्या जाळपोळीमुळे केवळ २० टक्के प्रदूषण झालेले आहे आणि ८० टक्के प्रदूषण हे दिल्लीकरांमुळेच झालेले आहे, असे पर्यावरण मंत्र्यांनी म्हटले आहे.

दिल्ली असो की मुंबई त्या गावातले प्रदूषण त्या गावातल्या घटनांमुळेच होत असते. उगाचच शेजार्‍यांवर जबाबदारी टाकण्यात काही अर्थ नाही. दिल्लीतल्या उद्योगांची झालेली बेशिस्त वाढ आणि दिल्लीत येणारी डिझेलची वाहने यांचा या प्रदूषणात मोठा वाटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी या गोष्टीची दखल घेतली होती आणि शहरातली सगळी मोठी वाहने डिझेल ऐवजी सीनएनजीवर पळतील असा निर्णय दिला होता. त्यानुसार शहरातील वाहने सीएनजीवर पळतही आहेत परंतु तेवढ्याने दिल्लीच्या प्रदूषणाच्या धोक्यावर काही परिणाम झालेला नाही. शहराच्या नागरी वस्तीत कायद्याची पायमल्ली करून उभारण्यात आलेले प्रदूषणकारी उद्योग हे दिल्लीच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. शहरामध्ये नागरी वस्तीत त्यातल्या त्यात नागरी वस्तीत उद्योग उभारू नयेत असा नियम असतानाही दिल्लीत सुमारे २० हजार प्रदूषणकारी उद्योग शहराच्या हृदयस्थ भागात उभारले गेलेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे. कोणत्याही शहरातील जलाशये, नदी ही हवेतील कर्बवायू शोषून घेत असतात. दिल्लीत सरोवरे तर नाहीतच परंतु यमुुना नदी शहरातून वाहते. तिचे पाणी मृत झाले आहे. त्याच्यात आता हवेतील अशुध्दता शोषून घेण्याची क्षमता राहिलेली नाही. यमुना नदीच्या शुध्दीकरणाचे अनेक प्रयोग फसले आहेत. या सगळ्यांचा संकलित परिणाम होऊन दिल्ली आज स्मॉगने वेढली गेली आहे.

Leave a Comment