ऐतिहासिक परिषद

fruit
नाशिक येथे आजपासून (दि. ५ नोव्हेंबर) राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत देशातील फलोत्पादनाची स्थिती, हवामानाचा तिच्यावर होणारा परिणाम आणि फळांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर विचारविनिमय केला जाणार आहे. भारतामध्ये सर्व प्रकारचे हवामान आहे आणि भारताला निसर्गाने दिलेली ही एक मोठी देणगी आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे असे आपण म्हणतो. ते केवळ या देशातली मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे म्हणून म्हणत नाही. भारतात शेती उद्योग करण्यास फार चांगले वातावरण आहे. म्हणून तो कृषीप्रधान देश आहे. भारताच्या तीन बाजूंनी समुद्र आहे. त्याचा परिणाम या देशातल्या पावसाळ्यावर होतो. तीन बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालय पर्वत अशा भौगोलिक परिस्थितीमुळे भारतात पावसाळा हा एक स्वतंत्र ऋतु असतो. जगाच्या पाठीवरील अन्य देशांमध्ये अशी स्थिती नाही. काही देशात हिवाळ्यात पाऊस पडतो तर काही देशात उन्हाळ्यात पाऊस पडतो. पावसाळा नावाचा तिसरा ऋतू फार कमी देशात आहे. त्यात भारताचा प्रामुख्याने समावेश होतो.

चार महिने पाऊस पडून गेल्यानंतर बाकीच्या दोन ऋतुंमध्ये हवामान कोरडे आणि स्वच्छ असते. त्यामुळे भारतात चांगली शेती करता येते. राजस्थानातील कोटा हे जगातील सर्वात उष्णतामान असणारे गाव आहे आणि हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला हे सर्वात कमी तापमानात मानवी वस्ती असलेले शहर आहे. जगातील उष्ण हवामान आणि थंड हवामान या दोन्हींची दोन टोके भारतातच आहेत. शिवाय जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे चेरापुंजी हे शहर आणि सर्वात कमी पाऊस पडणारे जैसलमेर अशी दोन्ही शहरे याच देशात आहेत. थंड, उष्ण, समशितोष्ण, आर्द्र, संमिश्र अशा सर्व प्रकारच्या हवामानांनी हा देश युक्त आहे. एखाद्या इंजिनिअरने आखूनसुध्दा पाण्याचे चॅनल तयार होणार नाही तसे चॅनल निसर्गाने भारतातल्या नद्यांचे तयार केलेले आहे. एकूण उपलब्ध जमिनीपैकी ५२ टक्के जमीन शेती करण्यास योग्य असलेला भारत देश हा याही बाबतीत अद्वितीय आहे. परंतु वर्षानुवर्षे हा देश गरीब राहिलेला आहे. सार्‍या जगाला धान्य पुरवण्याची क्षमता एकट्या भारतात आहे. परंतु ही क्षमता वापरली जात नाही. म्हणजेच स्वतः शेतीप्रधान असूनही भारतात स्वतःपुरते धान्य तयार होत नाही. अजूनही या भारतातील लोकांना इंडोनेशियातून आयात केलेले पामतेल आणि जमेल तिथून आयात केेलेल्या डाळी खाव्या लागतात. कारण शेती चांगली असली तरी तिचे तंत्रज्ञान म्हणावे तसे विकसित झालेले नाही.

शेती अधिक स्वावलंबी, अधिक उत्पादक करण्यासाठी शेतीला फळबागांची जोड दिली पाहिजे. याचे आकलन अजूनही म्हणावे तसे झालेले नाही. त्यामुळे सार्‍या गोष्टी अनुकूल असूनही भारतात फळ बागायती म्हणावी तशी विकसित झालेली नाही. राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या विविध सत्रांमध्ये शेती व्यवसायातील फळबागांचे महत्त्व विशेष करून सांगितले जाईल, अशी अपेक्षा आहे. फळबागा या एकदा लावल्या की किमान २० वर्षे ते कमाल ५० वर्षे टिकून राहतात. पुन्हा पुन्हा जमिनीची मशागत, लागवड या गोष्टी कराव्या लागत नाही. फळबागातील झाडे परस्परांपासून दूर असल्यामुळे त्यांना पाणी फार कमी लागते. तीव्र दुष्काळ पडला तरी काही फळबागा जगून राहतात आणि याउपरही त्यांना पाणी द्यावेच लागले तर प्रत्येक झाडाच्या बुडाशी हाताने पाणी घालून झाडे जगवता येतात. फळबागांना मिळालेले हे एक वरदानच आहे. महाराष्ट्रात तर ते विशेषच जाणवते. कारण महाराष्ट्रात जमिनी सपाट नाहीत. अशा उंच, सखल जमिनींमध्ये फळबागांची लागवड फायदेशीर ठरते आणि अशा फळबागांना ठिबक सिंचनसारख्या प्रगत तंत्रज्ञानाने पाणी देणे सोयीस्कर जाते.

सार्‍या जगाला धान्य पुरवण्याची क्षमता एकट्या भारतात आहे आणि सार्‍या जगाला फळे पुरवण्याची क्षमता एकटा महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यात आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या व्हिजन २०२० या पुस्तकातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. फळबागावर आपण जोर द्यायला लागल्यानंतर अलीकडच्या काळात ही गोष्ट आपल्यालाही जाणवायला लागली आहे. आज महाराष्ट्रातून द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, चिकू, नारळ, संत्रा, मोसंबी, आंबा इत्यादी फळांची निर्यात फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र फळबागांच्या विकासाचे फार नियोजनपूर्वक प्रयत्न न करताही ही निर्यात साध्य झालेली आहे. तसे नियोजनपूर्वक प्रयत्न झाले तर महाराष्ट्र खरोखरच सार्‍या जगाला फळे पुरवू लागेल. ही क्षमता दिसत असतानाच दोन दोष दिसतात. महाराष्ट्रात फळांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु दर हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे आहे. सार्‍या जगात सरासरी दर हेक्टरी २५ ते ३० टन एवढ्या फळांचे उत्पादन होते पण महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ १५ टन आहे. ते वाढले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे फळांवर प्रक्रिया करून फळांची किंमत वाढवता येते. तेव्हा आपल्या देशातली फळे परदेशात विकण्यासाठी न पाठवता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केली गेली पाहिजे. प्रक्रिया उद्योगाचा अभाव हा भारतातल्या फळबागातला एक दोष आहे.

Leave a Comment