उत्तर प्रदेशातली गणिते

akhilesh-yadav
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या नाटकाकडे राज्यातल्या राजकीय निरीक्षकांची नरज लागून आहे. या घडामोडींचा फायदा कोणाला होणार आहे याचे अंदाज बांधण्याचे काम सुरू आहे. कारण विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. १९८९ साली उत्तर प्रदेशातल्या राजकारणाचे मंडलीकरण झाले आणि राज्यातल्या राजकारणाची फेरमांडणी झाली. तशी आताही समाजवादी पार्टी क्षीण झाल्यास पुन्हा एकदा फेरमांडणी होणार का असा प्रश्‍न विचारला जात आहे. १९८९ साली मंडल आयोगानंतर मतदानाच्या पॅटर्नमध्ये बदल झालेच पण १९९२ साली बाबरीमशीद पडल्याने या बदलाला गती आली. त्या भारलेल्या वातावरणात भारतीय जनता पार्टीला काही प्रमाणात फायदा झाला पण या लाटेनंतर वातावरण स्थिर स्थावर होत होत राज्यात बसपा आणि सपा या दोन राजकीय शक्ती बलवान झाल्या. कॉंग्रेसची सद्दी संपली आणि राम मंदिराची लाट ओसरल्याने भाजपाचाही वरचष्मा संपत आला.

हे परिवर्तनाचे वारे वाहण्याच्या आधी राज्यात कॉंग्रेसचे वचर्ंस्व होते कारण पक्षाला दलित, उच्चवर्णीय आणि मुस्लिम या तीन समाजघटकांचा जोरदार पाठींबा होता. काही मागासवर्गीय गट चरणसिंग यांच्या पाठीशी उभे रहात असत. हा मागासवर्गीयांचा पाठींबा आणि स्वत:चा जाट समाज यांच्या बेरजेतून चरणसिंग कॉंग्रेसला शह देत असत. त्यात ते कधी यशस्वी होत तर कधी त्यांना अपयश येत असे. याच काळात म्हणजे मंडल आयोगाच्या आधी पूर्व उत्तर प्रदेशात भाजपाची ताकद होती. ती व्यापारी वर्ग आणि काही प्रमाणात कायस्थ तसेच ब्राह्मण यांच्या पाठींंब्याची होती. १९८९ ते १९९२ या काळात झालेल्या नव्या धु्रवीकरणात चरणसिंग यांच्या मागे असलेला मागासांचा वर्ग मुलायमसिंग यांच्या मागे जमा झाला. बाबरी मशीद पडल्याने मुस्लिमांचा कॉंग्रेसवरचा विश्‍वास उडालाच होता आणि कॉंग्रेसची पिछेहाट सुरू झाली होती. हा मुस्लिम वर्गही मुलायमसिंग यांच्याच मागे गेला. कारण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी बाबरी मशिदीचे जीवापाड रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. अशा रितीने आपला यादव समाज आणि मुस्लिम यांच्या पाठींब्यावर मुलायमसिंग राजकारणात मोठे स्थान कमवून बसले. कॉंग्रेसकडे असलेला ब्राह्मण समाज भाजपाकडे ओढला गेला आणि कॉंग्रेसच्याच दलितांच्या मतपेढीवर मायावती यांचा बहुजन समाज पार्टी हा पक्ष मोठा झाला. कॉंग्रेस संपली आणि कॉंग्रेसच्या मतांची अशी त्रिभागणी झाली.

१९९२ साली कॉंग्रेसचे मतदार अन्यत्र आकृष्ट होण्याची प्रक्रिया आता समाजवादी पार्टीच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. हा पक्ष दोन समाज घटकांच्या आधारावर उभा आहे. त्यातला यादव समाज हा घटक पक्षापासून फार दूर जाणार नाही. सपा आत्मविश्‍वासहीन अवस्थेत निवडणुकीला सामोरे गेली तरी आणि पक्षात फूट पडली तरीही हा समाज पक्षातल्या दोन गटांना मदत करील. त्यातल्या त्यात मुलायमसिंग यादव ज्या गटात असतील त्या गटाकडे या समाजाचा ओढा असेल. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार यादव समाजातील तरुणांचा ओढा अखिलेश यादव यांच्याकडे आहे. मात्र यादव समाज विस्कळीत झाला. तर सपाला मिळणारा मुस्लिमांचा पाठींबा म्हणावा तसा मिळणार नाही. सपाकडून सरकलेला हा मुस्लिमांचा पाठींबा कोणाला मिळणार ही मोठी उत्सुकता आहे. कारण हा पाठींबा ज्याला मिळेल त्याचे वर्चस्व निवडणुकीत दिसणार आहे. आज तरी मुस्लीम समाज मुलायमसिंग यादव यांच्यापासून दूर गेला तर तो मायावतींच्या बसपाच्या मागे उभा राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सपामधली फूट मायावतींच्या पथ्यावर पडेल.

मायावती यांच्यामागे २८ टक्के दलित समाज भक्कमपणे उभा असतोच. त्या समाजाला मुस्लिमांची जोड मिळाली की विजयाची शक्यता वाढते. परंतु हा मुस्लीम समाज काही प्रमाणात कॉंग्रेसच्याही मागे उभा राहील अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना लागून राहिली आहे. तसे झाल्यास कॉंग्रेसला काही प्रमाणात फायदा होईल. मात्र मुस्लीम मतदारात कॉंग्रेस, मायावती आणि मुलायमसिंग या तिघांपैकी कोणाच्या मागे उभे रहावे याबाबतीत संभ्रम निर्माण झाला तर त्याचे सगळे फायदे भाजपाला मिळतील. शिवाय मुलायमसिंग यादव यांच्यामागे उभा असलेला ओबीसी वर्ग कोणाकडे जातो यालाही महत्त्व आहे आणि आज तरी हा वर्ग भाजपाच्या मागे उभा राहील असे संकेत मिळत आहेत, कारण उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचे मंडलीकरण झाल्यापासून जेव्हा जेव्हा भाजपाला चांगले यश मिळाले तेव्हा ओबीसी वर्ग भाजपाच्याच मागे उभा असल्याचे लक्षात आले. या सार्‍या राजकारणामध्ये आणखीही काही आडाखे आहेत. मुलायमसिंग यांच्या कुटुंबावर असलेल्या खटल्यांमुळे खुद्द मुलायमसिंग आणि अखिलेशसिंग या दोघांनाही भारतीय जनता पार्टीला अनुकूल असेल अशीच भूमिका घ्यावी लागणार आहे. ती कधी छुपेपणाने घेतली जाईल तर कधी उघडपणे घेतली जाईल. अशा परिस्िथतीत समाजवादी पार्टी अभंग राहो की फुटो पण भाजपाच्याच फायद्याचे वातावरण निर्माण होणार आहे.

Leave a Comment