दुंदुभी निनादल्या

combo
शेवटी नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही हे एकदाचे स्पष्ट झाले. युती व्हायला हवी होती असे या दोन्ही पक्षांच्या हितचिंतकांना वाटते. पण पक्षाच्या या बाबतीत काही मर्यादा असतात. पक्षाला आपला कार्यकर्ता टिकवायचा असतो. दोन पक्षांनी एकदा युती केली आणि परस्परांची शक्तिस्थाने ओळखून त्यांना त्यांना ती वाटून दिली की, दुसर्‍या पक्षाला त्या क्षेत्रात कोठेच शिरकाव करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पक्षाचे तळागाळातले कार्यकर्ते नाराज होतात. अनेक भाजपा कार्यकर्त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असते. ती फार मोठी नसते. आपण निदान आपल्या वॉर्डातली नगरपालिकेची तरी निवडणूक लढवून नेतेपणा मिळवावा असे त्याला मनापासून वाटत असते. पण भाजपाशी शिवसेनेशी युती झाली आणि त्याचा वॉर्ड कायमच शिवसेनेच्या वाट्याला गेला तर त्या भाजपा कार्यकर्त्याला आपले राजकीय नशीब आजमावून पाहण्याची कधीच संधी मिळत नाही.

युती करणे आणि ती तळागाळापर्यंत पाळणे म्हणजे आपल्या हातून आपल्या पक्षातल्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांच्या राजकीय महात्त्वाकांक्षेला तीलांजली देणे होय. केवळ भाजपाचीच नाही तर शिवसेनेची आणि दोन्ही कॉंग्रेस पक्षांचीही अशीच अवस्था झालेली आहे. म्हणून युती होणे कधीही आणि कितीही चांगले असले तरीही ती आपल्या कार्यकर्त्यांच्या मनाला नाराज करणारी असते. म्हणून शिवसेनेने आणि दोन्ही कॉंग्रेस पक्षांनी शक्यतो युती न करण्याकडे आपला कल असल्याचे दर्शविले आहे. शिवसेनेने तर तसे काल मुंबईपुरते जाहीरच करून टाकले. मुंबईच्या पाठोपाठ पुण्यातही स्थानिक नेत्यांनी स्वत:च तशी घोषणा केली. एकंदरीत आता विधानसभे नंतर पहिल्यांदाच या दोन मित्र पक्षांच्या खर्‍या शक्तीचा कस लागणार आहे. त्यातल्या त्यात मुंबईत या दोन पक्षांत मोठी रणधुमाळी होणार आहे कारण शेवटी या दोघांचाही मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवसेनेला तर मुंबई फार महत्त्वाची वाटते. कारण देशाची ही आर्थिक राजधानी हातात आहे म्हणून शिवसेनेचा आवाज नेहमीच उंच राहिला आहे. एकदा ही राजधानी हातातून गेली की, शिवसेनेचा आवाज क्षीण होणार आहे. गेल्या निवडणुकीतच शिवसेना मुंबई गमावणार असे वाटायला लागले होते पण तिने भाजपाच्या मदतीने का होईना पण ही आर्थिक राजधानी राखली आणि मनसेेला मनसोक्त खिजवले. करून दाखवले अशा घोषणा करून तसे बोर्डही रंगवले.

आता या करून दाखवले बोर्डावरून भाजपाने शिवसेनेच्या विरोधात जाहीराती तयार केल्या आहेत आणि त्या अनेकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवायला सुरूवात केली आहे. या संदेशांवर भाजपाचे नाव नाही पण असले सोशल मीडियावरचे घोषणा युद्ध करण्यात भाजपावालेच आघाडीवर असतात. सध्या आपण राज्याच्या राजकारणात एक मजेदार दृश्य पाहत आहोत. शिवसेना राज्याच्या सरकारमध्ये आहे पण जणू काही आपला या सरकारशी काही संबंध नाही असे भासवत शिवसेनेचे नेते राज्य सरकारवर टीका करीत असतात. त्यातल्या त्यात भाजपावर या निमित्ताने दुगाण्या झाडण्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच आघाडीवर असतात. आता तर आदित्य ठाकरे यांनीही राज्यातल्या मंत्र्यांना नालायक ठरवून टाकले आहे. आपण ज्यांना नालायक म्हणत आहोत त्यात आपल्याही शिवसेनेचे मंत्री आहेत याची त्यांना जाणीव नाही. सारे तारतम्य गुंडाळून ठेवून ठाकरे आपला हातोडा भाजपावर चालवत आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत असाच प्रकार घडणार आहे.

मुंबईत गेल्या १५ वर्षापासून भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचे राज्य आहे पण आता भाजपाला मुंबईतल्या घाणीच्या विरोधात प्रचार करताना आपलाही या घाणीशी संबंध होता याचा सोयिस्कर विसर पडला आहे. जणू काही आपण या १५ वर्षात विरोधी बाकावरच बसत होतो असे भासवत भाजपाचा प्रचार सुरू झाला आहे आणि निवडणूक होईपर्यंत तो सुरू राहणार आहे. भाजपा आणि शिवसेनेतला हा बेबनाव आणि त्याला आता येत असलेले कटुतेचे स्वरूप पाहता हे दोन्ही पक्ष पायात पाय घालून आपापले नुकसान करून घेणार असे दिसायला लागले आहे. ही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोघांसाठी फार मोठी संधी आहे. कारण भाजपा आणि शिवसेनेतल्या बेबनावाचा फायदा या दोन पक्षांना मिळू शकतो. मात्र त्यासाठी या दोन पक्षांना शहाणपणाने वागावे लागेल आणि भाजपाचे मनोधैर्य खचवण्याची ही संधी साधावी लागेल. निदान आतापर्यंत समजलेल्या वृत्तांतावरून तरी या दोन पक्षांचे नेते युती करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कारण त्यांच्यातही अनेक प्रकारचे मतभेद आहेत. ते सोडायला ते तयार नाहीत. नारायण राणे यांनी याबाबत केलेल्या विधानावरून तरी असे दिसते की, आपण युती नाही केली तरी मराठा समाजातल्या असंतोषाचा लाभ केवळ कॉंग्रेसला मिळणार अशी खात्री त्यांना वाटत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही समजूत या पेक्षा वेगळी नाही. भाजपाला मात्र आपण इबीसीची मर्यादा वाढवल्याने मराठा समाज आपल्याच मागे येणार असे वाटत आहे. शिवसेनेने तर ही सवलत आपल्यामुळेच मिळाली असल्याचा प्रचार सुरू केला आहे. प्रत्यक्षात मतदारांच्या मनात काय आहे हे नंतरच कळेल.

Leave a Comment