
उत्तर प्रदेेशात होणार्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला आपल्या हातातली सत्ता टिकविता येईल की नाही हे काही अजून सांगता येत नाही. पण सत्ता हाती आली तर मुख्यमंत्री कोण यावर या पक्षात वाद सुरू आहे. अर्थात हा वाद जसा रंग धरायला लागला आहे तस तशी या पक्षाची निवडणुका जिंकण्याची शक्यता कमी कमी होत चालली आहे. पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव हे संभ्रमात असून त्यांचा संभ्रम वरचेवर वाढत चालला आहे. पंचाहत्तरी गाठलेले हे नेताजी आपला मुलगा अखिलेश यादव आणि भाऊ शिवपाल यादव या दोघांच्या भांडणात असे काही सापडले आहेत की त्यांंना नेमके कोणाला झुकते माप द्यावे यावर काहीच निर्णय देता येत नाही. सध्या त्यांनी केवळ वेळ मारून नेण्याचे सत्र आरंभिले आहे. समाजवादी पार्टीच्या हातात सध्या सत्ता आहे आणि अखिलेश यादवच मुख्यमंत्री आहेत पण मुलायम यांचे बंधू शिवपाल हेही महात्वाकांक्षी असून त्यांनाही मुख्यमंत्री होण्यात रस आहे. त्यामुळे काका आणि पुतण्या यांच्यातून आडवा विस्तव जात नाही.
समाजवादी संभ्रम
मुलायमसिंग यांना भावाचा धाक आहे म्हणून त्याला झुकते माप द्यावे लागते. पण पुत्रप्रेमही आहे. म्हणून मुलालाही झुकते माप द्यावे लागते. या संभ्रमात त्यांनी आगामी मुख्यमंत्री कोण यावर काहीच निर्णय दिला नाही आणि त्यामुळे भाऊ खुष झाला आणि मुलगा रुसला. भावाच्या आणि कात्रीत सापडलेल्या नेताजींनी घरात तर चांगली चाल खेळली पण त्यांचे दुसरे एक भाऊ रामगोपाल यांनी आपल्या या ज्येष्ठ बंधूंना चांगला सल्ला दिला. मुख्यमं१ी म्हणून अखिलेश यांचे नाव जाहीर न करणे ही नेताजींची ऐतिहासिक चूक ठरेल असे ते म्हणाले. त्यावर मुलायम पुन्हा फिरले आणि त्यांनी, सत्ता हाती आल्यास अखिलेशच मुख्यमंत्री होईल असे जाहीर केले. या सार्या गोंधळाने आता भाऊ शिवपाल नाराज होणार हे नक्की आहे. मुलायम यांना नेमके कोणाला खुश करावे आणि नेमके कोणाला नाराज करावे हे समजेनासे झाले आहे. २०१७ च्या पूर्वार्धात राज्यांत पंजाब, मणिपूर, उत्तरांचल, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांत निवडणुका होणार आहेत. तरी सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशाकडे लागल्या आहेत. कारण ते देशातले सर्वात मोठे राज्य तर आहेच पण तिथून गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे ८० पैकी ७३ खासदार निवडून आले होते. आता भाजपाला तीच कामगिरी करता येईल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ते आता तरी शक्य वाटत नाही कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून त्यात भाजपाला फार चांगले यश मिळालेले नाही.
या पार्श्वभूमीवर भाजपाला विधानसभा निवडणुकीतही फार देदिप्यमान यश मिळवता येईल असे दिसत नाही. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या मतदारांच्या पाहण्यांमध्ये कधी बसपा तर कधी सपा यांना यशाची खात्री देण्यात आली होती. या दोघांपैकीच कोणीतरी सत्तेवर येणार असे पाहण्यांत दिसून आले होते. या पाहण्या भाजपाला जसे हमखास तिसरे स्थान देत होत्या तितक्याच खात्रीने कॉंग्रेसला २० जागांच्या आत जागा आणि चौथा क्रमांक देत होत्या. नामवंत निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी आता उत्तर प्रदेशातल्या कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यांनी धुरा सांभाळली म्हणजे विजय होणार असे समीकरण मांडले जाते. कारण त्यांनीच मोदींच्या लोकसभा निवडणुकीतल्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नंतर त्यांनी बिहारात नितीशकुमार यांच्या प्रचाराचा मक्ता घेतला आणि त्यांना सत्तेवर आणून दाखवले. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्या हातात उत्तर प्रदेशातली सूत्रे दिली. असे असले तरी त्यांच्या पातळीवर सारे काही छान चाललेले नाही.
प्रशांत किशोर हा परिस असेलही पण परिस लोखंडाचेच सोने करीत असतो. दगडाचे नाही. तेव्हा प्रशांत किशोर यांनी सूत्रे घेतली म्हणून आपल्याला आता लखनौची गादी मिळालीय असे कॉंग्रेसजनांनी समजण्याचे कारण नाही. मुळात प्रशांत किशोर यांनीही कॉंग्रेसला सत्ता मिळवून देण्याचा दावा केलाच नव्हता. त्यांनी जास्तीत जास्त १०० जागांचा हवाला दिला होता. त्यांच्या मते हेही यश प्रियंका गांधी वड्रा मैदानात उतरतात की नाही यावर अवलंबून होते. आता त्याही मैदानात उतरणार नाही असे दिसायला लागले आहे आणि प्रशांत किशोर यांना कॉंग्रेसच्या प्रचाराला फार गती देणे शक्य झालेले नाही. त्यांनी मोदींच्या चायपे चर्चा या उपक्रमाप्रमाणेच खाटपे चर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न केला पण तो निव्वळ पोरकटपणा ठरला. राज्यात पक्षाला कितीही वाईट वेळ आली तरीही पक्षाची नऊ टक्के ठरलेली मते आहेत. अर्थात ती मते पक्षाचा आत्मविश्वास प्रकट झाला तरच पडतात नाहीतर ती विखरून अन्य पक्षांना मिळतात पण या ९ टक्के मतांच्या भांडवलावर चाणाक्षपणे राजकारण केले तर पक्षाचा प्रभाव वाढू शकतो. ते कॉंग्रेसला जमलेले नाही. पण प्रशांत किशोर यांनी या ९ टक्के मतांना १४ टक्के ब्राह्मण मतांची जोड देण्यासाठी ब्राह्मण मतांना चुचकारण्याचा डाव टाकला. त्यासाठी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले. मात्र आता आता सुरू असलेल्या प्रचारात त्या कोठे दिसतही नाहीत आणि सारा प्रसार दीनवाणेेपणाने केवळ राहुल गांधी यांच्या भोवती सुरू आहे.
