सीमोल्लंघन ज्याचे त्याचे

dasra
विजयादशमी किंवा दसरा हा सण किती व्यापक अर्थाने साजरा केला जात आहे याचे प्रत्यंतर काल महाराष्ट्रात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा, शिवसेनेचा दसरा मेळावा, बौध्दधर्मीयांचे धम्मचक्र प्रवर्तन, विविध संघटनांचे रावण दहन आणि काही जातीसंस्थांचे दसरा मेळावे त्यातल्या त्यात भगवानगडावर झालेला मेळावा. अशा सगळ्या कार्यक्रमातून जे विचार प्रवर्तन झाले त्याकडे साक्षेपी दृष्टिकोनतून पाहिले असता आपल्या समाज जीवनाचे सीमोल्लंघन कसकसे होत चालले आहे याचे दर्शन घडते. या प्रत्येक मेळाव्यात एक नवा विचार व्यक्त झाला आहे. त्या विचाराला राजकीय किनार आहे आणि सामाजिकसुध्दा आहे आजच्या काळात सामाजिक विचार कुठे संपतो आणि राजकीय विचार कुठे सुरू होतो याची सीमारेषा निश्‍चितपणे आखता येत नाही. परंतु काही सामाजिक संघटना एकत्र आल्या की तिथली गर्दी बघून नेत्यांच्या आशा पल्लवीत होतात आणि त्या गर्दीचा लाभ घेऊन आपण आपला राजकीय हेतू साध्य करावा असे वाटल्यावाचून राहत नाही. म्हणूनच भगवानगडावरचा संघर्ष उभा राहिला.

भारतीय संस्कृतीमध्ये धर्माला सर्वोच्च स्थान आहे आणि राजा धार्मिक नेत्यांच्यापुढे नतमस्तक होत असतो, अशी आपली परंपरा आहे. मात्र भगवानगडावर आक्रित घडले. गडाच्या वर मेळावा घेण्याची इच्छा अपुरी राहिल्यामुळे पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला आणि पुढच्या वर्षी आपण नवीन महंत नेमू असे जाहीर केले. आताचा जमाना उलटा झाला आहे आणि राज्यकर्तेच महंतांना नेमायला लागले आहेत. हे एक वेगळ्या प्रकारचे सीमोल्लंघनच आहे. विपरीत अर्थाने असेल पण ते सीमोल्लंघनच. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाची एकी हा विषय फार चर्चेला आलेला आहे. या समाजाच्या या अभूतपूर्व ऐक्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा मोह अनेकांना होत आहे. पण मोर्चाच्या संयोजकांनी तूर्तास तरी राजकारण्यांना चार हात दूर ठेवलेले आहे आणि एक वेगळे सीमोल्लंघन करत मराठा समाजातील हुंड्यांची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरील अनेक प्रभावी उपायांपैकी हा एक उपाय आहे. कारण आत्महत्या करणारे बरेच शेतकरी मुलीच्या लग्नातला हुंडा असह्य झाल्यामुळे आत्महत्या करत असतात. एकदा हुंड्याची चाल बंद झाली की कितीतरी वधूपित्यांचे आयुष्य सुखी होणार आहे. तेव्हा मराठा समाजाच्या आगामी मूक मोर्चामध्ये हुंडाबंदीची पोस्टर्स असतील ही घोषणा एक वेगळे सीमोल्लंघन दाखवून देणारी आहे.

दुसर्‍या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यातही एक वेगळे सीमोल्लंघन झाले आहे. संघाचा मेळावा म्हटला की काहीतरी वादग्रस्त विधान होणारच किंवा ते न झाले तरी केल्या गेलेल्या विधानाला वादग्रस्त वळण दिले जाणार हे नक्कीच आहे. परंतु यावेळी सरसंघचालकांनी तशी काही संधी दिलेली दिसत नाही. फुल्ल पँटमधला संघाचा पहिलाच दसरा मेळावा वादरहित झाला आहे. तरीसुध्दा खरे गोभक्त आणि नकली गोभक्त अशा दोन वर्गात गोभक्तांची विभागणी होऊ शकते हे सरसंघचालकांनी सूचित केले. वास्तविक संघाची गोवध बंदीची मागणीच शास्त्रीय नाही. परंतु काही गायवेड्यांनी गायीच्या अर्थशास्त्राला उगाचच आधुनिक पेहराव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अर्थशास्त्राच्या भ्रमातच सरसंघचालक गोवध बंदीचे समर्थन करून गेले आहेत. संघ ही हिंदूंची संघटना आहे हे खरे. परंतु गोमांस खाणार्‍या हिंदूंना संघात प्रवेश नाही, त्यांना संघाचा विरोध आहे त्यामुळे हिंदू समाजाचा एक वर्ग संघापासून दूरच असतो. तो सरसंघचालकांच्या कालच्या विधानांमुळे पुन्हा एकदा संघापासून दूर गेला आहे.

नवबौध्द समाजाने काल सर्वत्र धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धर्म स्वीकारला होता. तोच हा दिवस होय. एका बाजूला हा धम्मचक्र प्रवर्तन दिन धूमधडाक्याने साजरा होत असला तरी तो सवर्ण हिंदूंसाठी विचार प्रवर्तनाचा दिवस व्हायला पाहिजे. डॉ. आंबेडकर यांना हिंदू धर्माचा त्याग का करावासा वाटला आणि एवढे हिंदू बांधव आपल्यापासून दूर का गेले आहेत याचा विचार म्हणजेच आत्मपरीक्षण हिंदूंनी करायला पाहिजे. मात्र ते तसे करत नाहीत आणि याच दिवशी हिंदूंच्या धार्मिक उपचारांना उधाण आलेले असते. देवीभक्तांना तर हा दिवस फारच धामधूमीचा वाटतो. मात्र हे सारे उपचार, देवीच्या भक्तीचे प्रदर्शन त्यातून होणारे आवाजाचे प्रदूषण हे धर्माचे स्वरूप स्वीकारार्ह आहे का याचा विचार हिंदूंनी करायला हवा. धर्माविषयीचे प्रेम, धर्माविषयीचा अभिमान हे वाढलेच पाहिजे परंतु या धर्माभिमानाला धर्मवेडेपणाचे स्वरूप येता कामा नये. याची काळजी कोणी घेत नाही. धर्माच्या आचरणापेक्षा धर्माच्या प्रदर्शनाला अधिक महत्त्व येत आहे. या विचारातून कधीतरी सीमोल्लंघन होण्याची गरज आहे. सीमोल्लंघन हे केवळ नवा प्रदेश जिंकण्यासाठीच केले जाते असे नाही तर नवा विचार जिंकण्यासाठी ते केले गेले पाहिजे.

Leave a Comment