भारत पाक तणावामुळे कापूस निर्यातदारांपुढे अडचणी

cotton
भारत पाकिस्तानातील संबंध उरी हल्ला व सर्जिकल स्ट्राईकमुळे कमालीचे ताणले गेल्याचा परिणाम भारतातील कापूस उत्पादकांवर झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका कापूस निर्यातदारांना बसला आहे कारण गेल्या वर्षी पाकिस्तानाने भारतातून सर्वाधिक कापूस आयात केली होती. गेल्या वर्षी ती २५ लाख गासड्या होती ती यंदा ३० लाख गासड्यांवर जाण्याची शक्यता होती मात्र आता निर्यात ठप्प झाल्याने कापूस उत्पादकांना अन्य पर्याय शोधणे भाग पडणार आहे. भारतातून यंदा एकूण ७० लाख गासड्या निर्यात होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार गेली दोन वर्षे पाकिस्तानात कापूस पिकावर पांढर्‍या अळीचा रोग पडल्याने तेथील उत्पादन घटले होते त्यातच यंदा कापूस पीकाखालील क्षेत्रही कमी झाले होते.त्यामुळे यंदाही कापूस उत्पादन घटणार आहे. पाकिस्तानला कापूस आयात करावा लागत असून भारत जवळ असल्याने तसेच रस्ता मार्गाने कापूस जात असल्याने त्यांना भारतातील कापूस स्वस्त पडतो. यापूर्वी चीन भारतीय कापसाचा सर्वात मोठा खरेदीदार होता मात्र चीनमधील कापूस उत्पादन वाढल्याने त्यांची आयात कमी झाली होती व ती जागा पाकिस्तानने घेतली होती. भारत पाक मध्ये कापूस व्यापार साधारण साडेपाच हजार कोटींचा आहे.

Leave a Comment