बहिष्काराने काय साधेल?

combo
सध्या आपल्या देशात लोकांच्या देशभक्तीला उधाण आले आहे. मात्र काही वेळा ही देशभक्ती अनाठायी वाटायला लागते. देशभक्ती ही भावना आहे आणि ती कधी कधी क्षणिकही असते. तशीच ती आता काही लोकांच्या मनात उद्भवली असून तिच्यातून पाकिस्तान बरोबरच चीनलाही धडा शिकवण्याचे आवाहन केले जायला लागले आहे. आपल्या देशामध्ये मुक्त अर्थव्यवस्था आल्यापासून चिनी बनावटीच्या वस्तू हा कायमच वादाचा विषय झालेला आहे. चीनच्या बर्‍याच स्वस्त नित्योपयोगी वस्तू बर्‍याच भारतात येतात आणि त्या भारतीय वस्तूंपेक्षा फारच स्वस्त असल्यामुळे धडाधड खपतात आणि अशा वस्तू रस्त्यावर तसेच लहानमोठ्या दुकानातून विकल्या जात असल्यामुळे त्यांची धडाकेबाजपणाने होणारी विक्री डोळ्यात भरायला लागते. त्यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांनी या चिनी बनावटीच्या मालांवर बहिष्कार टाकावा म्हणजे चीनचे नाक दाबले जाईल आणि पाकिस्तानला मदत करणे बंद करेल असा या लोकांचा दावा असतो. सध्या सोशल मीडियावर चीनच्या विरोधात हे व्यापारअस्त्र उगारण्याचे आवाहन करणार्‍या पोस्टस् मोठ्या संख्येने फिरत आहेत.

असे असले तरी या देशभक्तीच्या आवाहनाला विवेकाचा, वस्तुस्थितीचा आणि अभ्यासाचा आधार नाही. त्यामुळे ही देशभक्ती असली तरी आणि ती खरी असली तरी अनाठायी आहे असे म्हणावेसे वाटते. चीन एकंदर जगभरात जेवढ्या वस्तू पाठवते त्याच्या केवळ २.६ टक्के एवढ्या किंमतीच्या वस्तू भारताला पाठवत असते. म्हणजे चीन एकंदर २ हजार ५०० अब्ज डॉलर्स एवढी निर्यात करत असते त्यातील केवळ ५८ अब्ज डॉलर्स एवढीच निर्यात भारताला होते. म्हणजे थोडक्यात वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर चीनच्या एकूण १०० रुपयांच्या निर्यातीमध्ये दोन ते अडीच रुपये एवढीच निर्यात भारताला होते. ती सगळीच्या सगळी काही बंद होणार नाहीत. परंतु एवढी अल्प निर्यात बंद झाली म्हणून चीन भारताला शरण येईल आणि आपले परराष्ट्र धोरण बदलेल असे समजणे खुळेपणाचे आहे. आपण आपल्या बाजारात आलेल्या चिनी वस्तू बघतो परंतु त्या खरोखरच किती आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेचा किती भाग त्यांनी व्यापलेला आहे आणि चीनच्या उलाढालीमध्ये या निर्यातीचे स्थान केवढे याचा आपण विचारच करत नाही. त्यातून अशा प्रकारचे आवाहने निर्माण होतात. पूर्वीच्या काळीतर काही लोकांनी स्वदेशीचा एवढा आग्रह धरला होता आणि चिनी वस्तूंचा एवढा दुःस्वास सुरू केला होता की चीन या वस्तूंची भारताला निर्यात करत करत भारताची पूर्ण अर्थव्यवस्थाच ताब्यात घेईल अशी भीती काही लोक व्यक्त करत होते.

चीनने भारतामध्ये पाठवलेल्या वस्तूंच्या किंमतीचा आकडा पाहिल्यानंतर हे स्वदेशीचे समर्थक किती भाबडे आहेत याचा अंदाज येतो. भारताच्या एकंदर आयातीमध्ये चीनची आयात ३.६ टक्के आहे. तिचा कितीही अतिरेक झाला तरी भारताची अर्थव्यवस्था तिच्यामुळे उद्धवस्त होईल असे म्हणणे बालिशपणाचे ठरेल. चीनकडून भारताला पुरवल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याला स्वस्त तर मिळतातच. परंतु त्या आपल्या देशात तयारही होत नाहीत. आता दिवाळी आली आहे आणि विजेच्या दिव्यांच्या छोट्या माळा चीनमधून भारतात यायला लागणार आहेत. त्या सगळीकडे लागल्या की आपल्या डोळ्यात भरणार आणि आपण चक्रावून जाणार. आपल्या देशातला सारा उजेड असा चीनने व्यापलेला आणि ते गुलामीचे निदर्शक आहे अशी लगेच आपली भावना होणार हे ठरलेले आहे. परंतु आपण या चीनी वस्तू खरेदी केल्या नाहीत तर आपल्याला भारतीय वस्तू खरेदी कराव्या लागतील आणि त्या चीनी वस्तूंपेक्षा महाग असतील.

भारतीय वस्तूंच्या या किंमती चीनच्या वस्तूंपेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. त्यामुळे चिनी वस्तू गायब झाल्या की भारतीय वस्तूृंच्या किंमती पाहून आपले डोळे फिरायला लागतील आणि अशा अवस्थेत आपण चिनी वस्तूच बर्‍या होत्या असे म्हणायला लागणार आहोत. हे अपरिहार्य आहेत. येथे आपण चीनमधली वस्तू आणि भारतातली वस्तू यांची तुलना करत आहोत. परंतु चीनमधून येणार्‍या काही वस्तू अशा आहेत की त्या भारतात तयार होत नाहीत. आपण ते चीनकडून मागवतो. उद्या चालून या देशभक्तांच्या आवाहनानुसार आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला तर आपल्याला त्या वस्तू जपानकडून किंवा कोरियाकडून मागवाव्या लागतील आणि त्या जपानी आणि कोरियन वस्तूंच्या किंमती चिनी वस्तूंपेक्षा अधिक आहेत हे कळायला लागले की आपल्याला चीनचे महात्म्य पटायला लागेल आणि चीनचे नाक दाबण्याच्या हेतूने आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आणि आपल्या देशाचे मार्केट चीनच्या ऐवजी कोरियाला किंवा जपानला मोकळे करून देणार. असा हा व्यवहार होणार आहे आणि तो परवडणारा नाही. पण देशभक्तीच्या धुंदीत आपल्याला हे लक्षातच येत नाही. दुसरी बाजू म्हणजे आपण चीनचे नाक दाबू तेव्हा चीनही गप्प बसणार नाही आणि आपल्या चीनमध्ये खपणार्‍या वस्तू खपणार नाहीत. सध्या आपण चीनला ४० लाख टन तांदूळ पाठवत आहोत. शिवाय भारतातील आयुर्वेदिक औषधी उत्पादने चीनमध्ये बेसुमार खपतात. त्याही पैशाला आपण मुकणार आहोत. एवढे करून चीनचे धोरण बदलणार नाही ते नाहीच.

Leave a Comment