पाकिस्तानला धडा

army1
अखेर भारतीय जनतेची इच्छा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसा धडा दिला. पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्या ठिकाणी सुरू असलेल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर धाडी घालून ५० अतिरेक्यांना यमसदनाला पाठवले. गेले काही महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशांचे दौरे करून आले आहेत. तिथे त्यांनी व्यापारी करारासंबंधी चर्चा केली असे जाहीर केले जाते आणि आपणही सर्वजण तसे समजून चाललो आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांनी मोठ्या चातुर्याने या सार्‍या दौर्‍यांमध्ये निश्‍चितपणे काहीतरी वेगळे काम केलेले आहे आणि पाकिस्तानकडून आपल्याला होत असलेल्या उपद्रवाबाबत जगातल्या महत्त्वाच्या देशांना अवगत केले आहे. पंतप्रधानांसारख्या वरिष्ठ नेत्याच्या दौर्‍यांमध्ये वन टू वन अशी चर्चा होते. ही चर्चा नेमकी काय झाली हे कधीच प्रकट केले जात नाही. अशा चर्चातून नरेंद्र मोदी यांनी सार्‍या जगातल्या प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांना पाकिस्तान हा देश किती नालायक आहे हे पटवून दिले असावे असे दिसते. त्याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वीच्या सर्जिकल ऑपरेशननंतर आला.

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर जबर हल्ले केले आणि ५० अतिरेक्यांचा खात्मा करून उरी येथे झालेल्या हल्ल्यातील १८ जवानांच्या हौतात्म्याचा योग्य तो बदला घेतला. अशा प्रकारचा हल्ला होऊनसुध्दा जगात कोठेही भारताच्या निषेधाचा सूर उमटलेला नाही. १९७१ साली कै. इंदिरा गांधी यांनी जगातल्या ८० राष्ट्रप्रमुखांना आपण बांगला देश स्वतंत्र करणार आहोत याची जाणीव दिली होती. स्वतः इंदिरा गांधी, त्यांचे परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र खात्यातले वरिष्ठ अधिकारी इत्यादींनी मिळून ८० देशांचा दौरा केला होता. आपण बांगला देशला मुक्त करण्यासाठी तिथे लष्करी कारवाई करणार असे त्यांनी आगावू सांगितले होते. एवढे असूनही अमेरिका भारताच्या विरोधात उभी राहिली. अमेरिकेच्या वर्चस्वाखाली उभारण्यात आलेल्या लष्करी गटात पाकिस्तान हा एक सदस्य आहे त्यामुळे त्याच्या हितसंबंधाला बाधा पोहोचताच त्याच्या मदतीसाठी धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे असे म्हणत अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागराकडे रवाना केले होते. म्हणजे एवढे प्रयत्न करूनही अमेरिकेने भारताच्या विरुध्द भूमिका घेतली होती. परंतु नरेंद्र मोदी यांच्या या कारवाईनंतर अमेरिका आणि चीन या पाकिस्तानच्या दोन बड्या मित्र राष्ट्रांनीही निषेधाचा चकार शब्द काढला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले होतेच. मात्र भारतीय नेते असेच म्हणत असतात असा पाकिस्तानचा समज होता. अर्थात तो चुकीचाही नव्हता कारण गेल्या २० वर्षात म्हणजे १९८४ पासून सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या परंपरेपासून भारताच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्ये करण्याशिवाय दुसरे काहीच केले नव्हते. तेव्हा उरी हल्ल्याचा बदला म्हणजे नरेंद्र मोदी अजून आक्रमकपणे पण राजकीयच भूमिका घेतील. पाकिस्तानला अलग पाडण्यासाठी जास्त प्रभावी पावले टाकतील. फार तर एवढेच होईल असे पाकिस्तानला वाटत होते. मोदींनी तसे केलेही. खून और पानी एकदम बहाया नही जाता, असे म्हणत पंतप्रधानांनी आपण पाकिस्तानची आर्थिक कोंडी अधिक प्रभावीपणे करू असे सूचित करायला सुरूवात केली होती. हे सारे प्रयत्न बघून पाकिस्तानचे नेते अगदी खुशीत आले होते. परंतु त्यांचा अंदाज चुकला आणि बुधवारच्या पहाटे भारताच्या सैन्याने दसर्‍या आधीच सीमोल्लंघन केले.

सारे जगच सध्या दहशतवादाच्या सावटाखाली भयभीत अवस्थेत जगत आहे आणि त्यांचे जीवन नकोसे करणारा हा दहशतवाद पाकिस्तानात पोसला जातो हे कळल्यापासून पाकिस्तानविषयी सार्‍या जगातच तिरस्काराची भावना तयार झाली होती. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवताच भारतीय तर खुष झालेच पण दहशतवादाने त्रस्त झालेले सारे जग खुष झाले. चीन हा आपला घनिष्ठ मित्र आहे आणि अमेरिका तर पाठीराखाच आहे. त्यामुळे आपल्याला काय कमी. अशा भ्रमात वावरणार्‍या पाकिस्तानला चीनने पहिला धक्का दिला. पाकिस्तान आपला मित्र असला तरी काश्मीरवरून युध्द झाल्यास चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार नाही असे स्पष्ट करून पाकिस्तानचे डोळे उघडवले. चीनसारख्या बलाढ्य देशाचा पाठिंबा मिळत नाही असे दिसत असूनही पाकिस्तानची मस्ती कमी झाली नाही पण दहशतवादी विरोधी लढ्यात चीन पाकिस्तानच्या बाजूने कधीच उभा राहणार नाही कारण पाकिस्तानमधल्या आयएसआय संघटनेने भारताप्रमाणे चीनलाही त्रस्त केलेले आहे. चीनच्या वुईघूर प्रांतात असलेल्या मुस्लिमांना पाकिस्तानची फूस असून वुईघर प्रांताचा वेगळा देश करावा अशा मागणीसाठी तिथे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे चीनसुध्दा पाकिस्तानच्या दहशतवादी स्वरूपाविषयी नाराजच आहे. त्यांनी योग्यवेळी स्पष्टीकरण केले आणि त्यामुळे मानसिक बल वाढलेल्या भारताने पाकिस्तानच्या मस्तकावर हा निर्णायक आघात केला.

Leave a Comment