सुषमाजींचे बिनतोड सवाल

sushma-swaraj
पाकिस्तानचे नाशरीफ पंतप्रधान शरीफ यांनी नेहमीप्रमाणे भारतावरच खोटा आरोप करून आपली परंपरा पाळली. आजवर त्यांनी असे आरोप करून काश्मीर प्रश्‍न जिवंत ठेवण्याच्या इराद्याने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आणि इतरही व्यासपीठावर सातत्याने हा प्रश्‍न मांडला आहे पण यावेळेस तो आगाऊपणा असा काही अंगलट आला आहे की, पाक प्रतिनिधीच्या डोळ्यासमोर काजवे चमकावेत. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसारख्या मोठ्या व्यासपीठावर पाकिस्तानला बचावात जायला लावत आपली बाजू एवढ्या आक्रमकपणे मांडली की सारे जगातले तिथले प्रतिनिधी चकित तर झालेच पण ही बाजू मांडणार्‍या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अभिनंदन करण्यास त्यांनी रांग लावली. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत नेहमीच बचावात्मक आणि प्रतिक्रियावादी धोरण अवलंबतो असा आपल्यावर नेहमीच आरोप होत असतो. पण आपण प्रथमच या पातळीवर एवढा रुद्रावतार धारण केला की पाकिस्तानचे प्रतिनिधी चक्रावून गेले. या चोख उत्तराचे कारण म्हणजे पाकने भारतावर लावलेला खोटा आरोप.

आपण फार मोठे शरीफ म्हणजे सभ्य आहोत असा आव आणून त्यांनी भारतावर असा आरोप केला आहे की, भारताशी आम्ही चर्चा करीत असतो. पण भारताचे नेते कधी अटी घातल्याशिवाय चर्चेलाच येत नाहीत. भारतासारख्या शांतताप्रिय देेशावर हा आरोप लावल्याबद्दल त्याची जीभ का झडली नाही असा प्रश्‍न मनात यावा इतका हा आरोप बेलगाम आहे. भारतावर आरोप करीत असताना शराफतची जी व्याख्या गृहित धरत आहे ती ऐकून नवल तर वाटतेच पण म्हणावेसे वाटते की, तुमची शराफत तुम्हाला लखलाभ असो. पाकिस्तानला सुषमा स्वराज यांनी टाकलेेले काही प्रश्‍न बिनतोड आहेत. ते ऐकताना पाकिस्तानी प्रतिनिधींच्या माना शरमेने खाली गेल्या असतील यात काही शंका नाही. सुषमा स्वराज या विचारतात, आम्ही तुमच्या पंतप्रधानाला आमच्या पंतप्रधानाच्या शपथविधी समारंभाला आमंत्रित करून मित्रत्वाचा हात पुढे केला. तेव्हा कोणती अट घातली होती ? आमचे पंतप्रधान तुमच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला त्यांच्या निवासस्थानी निमंत्रण नसताना आणि अफगाणिस्तानातून परतताना अचानकपणे आले. सुरक्षेची अनेक आव्हाने असतानाही आले तेव्हा आम्ही कोणत्या अटी घातल्या होत्या ? अशी भारताकडून दाखवल्या जाणार्‍या सद्भावनेची अनेक उदाहरणे देताना सुषमा स्वराज यांनी त्या त्या प्रसंगी भारताने कसलीही अट घातली नव्हती असे या नाशरीफला बजावले.

भारताची केवळ एकच अट आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ही ती अट होय. ती अट आम्ही घालणारच असेही स्वराज कडाडल्या. आम्ही शराफत दाखवली पण त्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळाले असाही सवाल त्यांनी केला. आम्ही सभ्यपणात कधी कमी पडणार नाही पण आमचा हा भाऊ प्रत्येक सभ्यतेला गोळ्या आणि हिंसाचाराचीच भेट देत आला आहे असा टोला त्यांनी लगावला. भारताने आजवर अनेक मर्यादा पाळल्या पण आता पाकिस्तानला उघडे पाडण्याची एकही संधी सोडायची नाही आणि तेव्हा मर्यादांचा विचार करायचा नाही असेही भारताच्या परराष्ट्र खात्याने ठरवले आहे. अर्थात हे आक्रमक धोरण प्रचाराच्या पातळीवरच सीमित करायचे आहे असे आपले सरकार म्हणते. म्हणूनच नवाज शरीफ यांनी काश्मीर मधील कथित अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या पायमल्लीचा केलेला उल्लेख समोर ठेवून सुषमा स्वराज यांनी, पाकिस्तानला सुनावले आहे की. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्‍यांच्या घरावर कधी दगड फेकायचे नसतात. हे बजावताना अर्थातच त्यांनी, पाकिस्तानने आपल्या घरात थोडे डोकावून पाहिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा उल्लेख करून भारतावर आंतरराष्ट्रीय राजकारणात वरचढपणा करण्याचा प्रयत्न करीत असते पण आता त्याला तोडीस तोड जबाब मिळायला लागला आहे आणि त्याने काश्मीरबाबत काही चोंबडेपणा करण्याचा प्रयत्न करताच भारताने बलुचिस्तानचा उल्लेख करायला सुरूवात केली आहे. याच क्रमाने पाकिस्तान हे दहशतवादी कारवायांचे आद्यपीठ कसे बनले आहे याचा व्यवस्थित पंचनामा सुषमा स्वराज यांनी केला आहे. आजवर अनेक देशांत दहशतवादी शक्तींना पाठीस घातले गेले आहे पण याबाबत पाकिस्तानचे नाव विश्‍व विक्रमांच्या पुस्तकात करण्याची वेळ आली आहे. त्याचीही चर्चा करताना परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला अजून काही बिनतोड सवाल केले आहेत. पाकिस्तान भारतात घुसखोरी करणारांना कशी मदत करते असा आरोप करताना त्यांनी केवळ भारतातच नाही तर सार्‍या जगात जेथे कोठे दहशतवाद असेल तेथे पाकिस्तानचीच फूस असते असे त्या म्हणाल्या. या भाषणानंतर जगातल्या अनेक देशातल्या नेत्यांनी सुषमा स्वराज यांचे एवढे जोरदार अभिनंदन केले की त्याला काही मर्यादा नाहीत. जगभरातल्या प्रतिनिधींच्या त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

Leave a Comment