युध्दाचे ढग

loc
भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर सध्या मोठे गंभीर वातावरण निर्माण झालेले आहे. कोणत्याही क्षणी या दोन देशात युध्द पेटेल याची शाश्‍वती देता येत नाही. एवढा तणाव त्या परिसरात निर्माण झालेला आहे. पाकिस्तानने आपल्या बाजूने युध्दाची तयारी सुरू केली असल्याचे चित्र आहे. कारण भारत आपल्यावर कधी हल्ला करील अशी शक्यता त्यांना वाटत असावी. उरी येथे पाकिस्तानने हल्ला करून भारताच्या १८ जवानांना शहीद केले. त्याची मोठी गंभीर प्रतिक्रिया देशात उमटली. साधारणतः अशा घटना घडतात तेव्हा भारतात प्रतिक्रिया उमटतात आणि भारत सरकारने पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानला नष्ट करून टाकावे अशी भावना लोकांत व्यक्त होते. परंतु काही काळ ओसरला की भावनेची ही तीव्रता कमी होते आणि युध्द हे काही या समस्येवरचे उत्तर नाही असा पोक्त विचार याच जनतेच्या मनात निर्माण होतो. अशीच प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात घडून गेली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तशी शक्यताही नाकारता येत नाही. कारण त्याला एक पार्श्‍वभूमी आहे.

नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष सत्तेवर नव्हता तेव्हाच्या काळात असे हल्ले होत असत त्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे एकजात सारे नेते भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले पाहिजे अशीच भावना व्यक्त करत असत. आता भाजपा स्वतः सत्तेवर असताना मात्र त्यांचे सरकार पाकिस्तानवर असे आक्रमण करत नाही. ही विसंगती लोकांच्या लक्षात येत आहे आणि त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात पाकिस्तानवर आक्रमण करण्याचे विचार येऊ शकतात. उरी येथील घटनेचे वृत्त त्यांना कळले तेव्हा ते अशा आक्रमणाच्या विचारानेच प्रक्षुब्ध झाले होते आणि नंतर ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक झाली. तेव्हा मात्र त्यांच्या मनाचा प्रक्षोभ कमी झाला, असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी पाकिस्तानचे नेते मात्र भारत आपल्यावर आक्रमण करू शकतो ही शक्यता गृहित धरून आहेत. तशीच प्रक्रिया भारतातही सुरू आहे. पाकिस्तान कोणत्याही क्षणी दुःसाहस करू शकते. असे मानून भारतानेही तयारी सुरू केलेली आहे. युध्दाची एक गोष्ट फार वेगळी असते. प्रत्यक्ष युध्द होतेच असे नाही. परंतु दोन्ही बाजूंनी युध्द सज्जता मात्र जोरदार होत असते. आपण स्वतः आक्रमण करणार नाही. पण पलीकडच्या बाजूने कोणत्याही क्षणी आक्रमण होऊ शकते हे गृहित धरून त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी तयार मात्र असले पाहिजे, असा विचार कोणताही देश करत असतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तर असा कायम तणाव आहे आणि दोन्ही देश कोणत्याही क्षणी युध्द होऊ शकते असे मानून चालले आहेत. त्यादृष्टीने दोघांनीही युध्दाची सज्जता करून ठेवली आहे. पण युध्द झालेले नाही. गेल्या आठवड्यात मात्र परिस्थिती अधिक गंभीर झाली. उरी क्षेत्रात पाकिस्तानने भारताच्या १८ जवानांना मारले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड जवाब देण्याचे आदेश सोडले आणि नंतर भारतीय जवानांनी रुद्रावतार धारण करून त्यापेक्षाही अधिक संख्येने अतिरेक्यांना कंठस्नान घातले. भारत-सरकारकडून एवढा तिखट प्रतिकार साधारणतः होत नाही. पण ज्या अर्थी भारत सरकार आपल्या हल्ल्याला तिप्पट तीव्रतेने उत्तर देत आहे त्या अर्थी भारताच्या मनात वेगळे काहीतरी चालले आहे असा विचार पाकिस्तानने केला असावा आणि म्हणून त्यांनी काही वेगळ्या हालचाली सुरू केल्या. देशाच्या उत्तर भागात हायअलर्ट जारी केला आणि इस्लामाबाद ते लाहोर हा राष्ट्रीय महामार्ग सामान्य वाहतुकीला बंद केला. देशातला सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग अशा रितीने नागरी वाहतुकीला बंद करणे ही गोष्ट सामान्य नाही. त्यातून युध्दसज्जताच स्पष्ट होते.

या सगळ्या हालचाली बघून भारत सरकारनेही आपल्या हवाई दलाला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. पाकिस्तानने काही वेडे साहस केलेच तर त्याला तेवढ्याच तीव्रतेने पट्कन उत्तर देता यावे एवढी सज्जता भारत सरकारने केली. न जाणो पाकिस्तानने खरोखरच हल्ला केलाच तर आपण बेसावध होतो असे घडू नये यासाठी ही दक्षता आहे. पाकिस्तानच्या मनात नेमके काय आहे हे कोणीच आता सांगू शकत नाही. परंतु हे सगळे तणाव वाढत असतानाच चीनने एक घोषणा केली आहे. पाकिस्तान हा आपला मित्र आहे आणि त्याला आपण मदत करण्यास बांधील आहोत असे चीनने म्हटले आहे. याचाच अर्थ पाकिस्तानच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे आणि तसे आपण काही केल्यास चीन आपल्या बाजूने उभा राहील याची खात्री आपण केलेली बरी असा पवित्रा पाकिस्तानने घेतलेला आहे. रशियालासुध्दा पाकिस्तान काहीतरी मूर्खपणा करू शकते याची चाहूल लागली असावी त्यांनीही भारताच्या बाजूने उतरण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रांची जमाजमव आणि इंधनाची साठवणूक सुरू आहे. तेल निर्यातदार देशांनीसुध्दा काश्मीरच्या प्रश्‍नावर आपण काश्मीरच्या बाजूचे असल्याचे जाहीर केले आहे. हे सारे पाहिल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरचा तणाव कोणत्याही क्षणी युध्दात परिवर्तित होऊ शकतो असे दिसते. प्रत्यक्षात मात्र दोघेही अशी तयारी करून शांत बसतील अशीही शक्यता आहे. नेहमी असेच घडत आलेले आहे.

Leave a Comment