पाण्याचे प्रदूषण धोकादायक

water-pollution
आपण जमिनीवरचे पाणी जास्त करून वापरतो आणि काही विशिष्ट हेतूसाठीच केवळ जमिनीच्या आतले पाणी उपसून वापरतो. त्यामुळे जमिनीच्या आत भरपूर पाणी साठलेले असते आणि त्यात काही अशुध्द घटक मिसळले तरी त्यांच्या मानाने पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या घटकांनी जमिनीच्या आतले पाणी फारसे प्रदूषित होत नाही. अलीकडे मात्र जमिनीच्या आतले पाणी उपसून वापरण्याची प्रवृत्ती वाढली आहे आणि त्यामुळे जमिनीच्या आतील पाण्यात प्रदूषक घटकांचे प्रमाण तुलनेने वाढून जमिनीतले पाणी प्रदूषित झाले आहे. एका बाजूला जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी आणि दुसर्‍या बाजूला प्रदूषक घटकांचा मात्र निचरा भरपूर झालेला आहे. खते, औषधे, रसायने यांच्या कारखान्यातील सांडपाणी, साखर कारखान्याची मळी आणि रासायनिक खते आपण जमिनीत जास्त मुरवत आहोत. परिणामी जमिनीतले पाणी अधिक प्रदूषित आणि विषाक्त होत आहे. त्याचा हे पाणी वापरणार्‍याच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.

केंद्र सरकारला नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये भारतातील दोन कोटी लोकांसमोर भूमिगत पाण्याच्या प्रदूषणाची समस्या उभी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे आपल्या देशातले किमान दोन कोटी लोक आज तरी भूमिगत पाण्याच्या प्रदूषणामुळे कोणत्याही रोगाला कधीही बळी पडू शकतात. मध्य प्रदेशाच्या काही जिल्ह्यांमध्ये नलिका कूपातून वापरल्या जाणार्‍या पाण्यामध्ये फ्लोराईड्स मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले होते. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशन करणार्‍या लोकांच्या दातांवर फ्लोराईडचा थर जमा झालेला दिसला. हेच फ्लोराईड शरीरातल्या विविध सांध्यांमध्ये जाऊन जमा झाले तर सांधे आखडतात आणि अशा लोकांची बोटे वळत नाहीत. त्यांचे हात सरळच राहतात आणि गुडघे दुखायला लागतात. सरकारला सादर झालेल्या या अहवालामध्ये २० राज्यातील ३१७ जिल्ह्यांमध्ये भूमिगत पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण मर्यादेपक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. हा धोका फार गंभीर स्वरूपाचा आहे. २१ राज्यातील ३८७ जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. तर २६ राज्यातील ३०२ जिल्ह्यात पाण्यातील लोहाचे प्रमाण जास्त आहे. आर्सेनिकयुक्त पाण्याचा धोका दहा राज्यातील ८९ जिल्ह्यांना निर्माण झालेला आहे. ही स्थिती सरकारला सावधान करणारी आहे. कारण या प्रदूषित पाण्याने अनेक प्रकारचे रोग उद्वभतात. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली या गावात शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तेव्हा या मुलांची नखे लाल असण्याऐवजी निळी असल्याचे आढळले.

या दोषाचा अधिक तपास केला असता हा कूपनलिकांतील पाण्यामध्ये मिसळलेल्या काही रासायनिक द्रव्यांचा परिणाम असल्याचे आढळून आले. पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. तिथल्या या कर्करोगाचा अधिक शोध घेतला असता तो प्रदूषित आणि विषाक्त झालेल्या भूमिगत पाण्याचा परिणाम असल्याचे आढळले. पंजाबमध्ये भरपूर पाणी आहे आणि भूमिगत पाणीसुध्दा फार खोल गेलेले नाही. अगदी १५ ते २० फुटांवरसुध्दा पाणी लागू शकते. या जिल्ह्यामध्ये जमीनधारणा फार कमी आहे. दोन किंवा तीन एकराचा शेतकरी म्हणजे तिथे बडा शेतकरी मानला जातो. अन्य सामान्य शेतकर्‍यांकडे असलेली जमीन गुंठ्यात मोजून घ्यावी एवढी आहे. एवढ्या कमी जमिनीत गुजराण करायची असेल तर नगदी पीकच घेतले पाहिजे असा विचार करून तिथले शेतकरी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. कापसावर अनेक प्रकारची कीडनाशके फवारावी लागतात. तशी ती फवारताना जमिनीवर पडतात आणि कापसाला पाणी दिल्यानंतर ती पाण्यात मिसळून अगदी दहा-बारा फुटावर असलेल्या भूमिगत पाण्यात जाऊन मिसळतात आणि तेच पाणी प्राशन केल्यामुळे लोक कर्करोगाला बळी पडतात.

अशा रितीने भूमिअंतर्गत पाणी विषाक्त किंवा प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत. आता आपण स्वच्छ भारत मोहीम राबवत आहोत. या मोहिमेमध्ये लोकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालये उभारली जाणार असून त्या शौचालयातील मानवी विष्ठा सेफ्टीक टँकमध्ये जमा होणार आहे. असे सेफ्टीक टँक प्रत्येकाच्या शौचालयाला जोडलेले असतील. ज्या गावांमध्ये भूमिगत गटारांची योजना परिपूर्णपणे राबवली गेली असेल त्या गावातील शौचालयातील घाण त्या गटार योजनेतून कॉमन सेफ्टीक टँकपर्यंत नेली जाणार आहे. मात्र ती व्यवस्थित नेली गेली नाही किंवा वैयक्तिक शौचालयाला जोडले गेलेले सेफ्टीक टँक शास्त्रशुध्दरित्या उभे केले नाहीत तर ही मानवी विष्ठा आणि त्यातील अनेक जंतू भूमिगत पाण्यामध्ये मिसळण्याची भीती आहे. आपण आपले भूमिगत पाणी अशुध्द केले आहे पण ते सुधारण्याच्या नावाखाली अशुध्द केले गेले आहे. या सुधारणेतूनच लोक अनेक प्रकारची डिटर्जंट्स वापरतात आणि कपडे धुतल्यानंतर हे डिटर्जंटयुक्त पाणी जलाशयात जाऊन मिसळते तेव्हा ते प्रदूषित होते. त्यामुळे डिटर्जंटयुक्त पाणी शुध्द करूनच ते गटारीत सोडले पाहिजे. त्याशिवाय रासायनिक खतांचा वापर हेसुध्दा भूमिगत पाणी प्रदूषित होण्याचे कारण आहे.

Leave a Comment