कॉंग्रेसला अजून एक धक्का

congress
ईशान्येतल्या अरुणाचल प्रांतात कॉंग्रेसने दोन महिन्यांपूर्वी लोकशाहीचा लढा जिंकला होता आणि तिथे कॉंग्रेसचे सरकार पाडण्याच्या कारवायांबद्दल भाजपाला न्यायालयाकडून चांगलाच फटकारा मारला होता. भाजपाने अनेक युक्त्या करून तिथे सत्तेवर आणलेले सरकार न्यायालयाने बरखास्त केले आणि कॉंग्रेसचे सरकार स्थानापन्न झाले. पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सत्तेवर येऊन एक महिनाही झाला नसेल पण या पूर्ण सरकारनेच पक्षांतर केले आहे. अरुणाचलात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या कॉंग्रेसच्या सरकारला सदनातल्या ६० पैकी ४३ आमदारांचा पाठींबा होता. पण दोन तृतियांश बहुमत असलेले हे स्थिर सरकार आता कॉंग्रेसचे राहिलेले नाही. या ४३ पैकी ४२ आमदारांनी रात्रीतून पक्षांतर करून अरुणाचल पीपल्स पार्टी या प्रादेशिक पक्षात प्रवेश केला आहे. कॉंग्रेस पक्षात तिथे आता केवळ एक आमदार उरला आहे. भारतात पक्षांतराच्या अनेक घटना घडल्या आहेत पण असा प्रकार कधीही घडला नाही.

१९७० च्या दशकात कधीतरी हरियाणात असा प्रकार घडला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांसह आणि पाठीराख्या आमदारांसह कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता आणि त्यांचे होते तसे सरकार एक झटक्यात जनता पार्टीचे झाले होते. देशात पूर्वी पक्षांतराच्या घटना फार मोठ्या प्रमाणावर होत असत. पण त्या वेगळ्या होत्या. सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांचे पक्षातले किंवा बाहेरचे नेते बंड करीत असत आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन आपले सरकार स्थापन करण्याचा दावा करीत असत. असे कितीतरी प्रकार देशात घडले. त्यात सत्तेची लालसा होती. पण मुख्यमंत्री स्वत: पदावर असताना आणि स्पष्ट बहुमत हाताशी असताना स्वत:च त्या सर्वांना सोबत घेऊन अन्य पक्षात जातात हा प्रकार अजब आहे. हरियाणात तो भजनलाल यांच्या बाबतीत घडला होता आणि आता तो अरुणाचलात घडला आहे. आधीच देशातली फार कमी राज्ये कॉंग्रेसच्या हातात राहिली आहेत. त्यातले अरुणाचल हे ईशान्य भारतातले महत्त्वाचे राज्य पक्षाला गमवावे लागले आहे. अरुणाचलात सत्तांतराचे नाटक पूर्वीही घडले होते. पण त्यात भाजपाची खेळी होती. ती खेळताना भाजपाच्या नेत्यांनी काही चुका केल्या होत्या.

तिथल्या राज्यपालांनी सभापतींना डावलून विधानसभेच्या बैठकीची तारीख जाहीर केली होती. हा प्रकार घटनेला धरून नव्हता शिवाय पक्षांतरबंदीच्या कायद्याच्या काही कलमांचा भाजपाकडून भंग झाला होता. त्यामुळे तिथे अवैध मार्गांनी भाजपाने मिळवलेली सत्ता भाजपाला सोडावी लागली. ती कॉंग्रेसला मिळाली. त्याआधी असाच एक प्रकार उत्तराखंडात घडला होता आणि तिथेही भाजपाला न्यायालयाची फटकार मिळाली होती. या दोन प्रकारांनी कॉंग्रेस पक्षाचे मनोधैर्य वाढले होते. भाजपावर टीका करताना कॉंग्रेसचे नेते भाजपाला घटना पायदळी तुडवायची आहे असे सांगत होते. या दोन्ही घटनांत भाजपाला न्यायालयाची फटकार मिळाली असली तरी मुळात या दोन घटना भाजपाने चिथावणी देऊन घडवलेल्या नव्हत्या तर त्यांच्या मुळाशी कॉंग्रेसमधील अंतर्गत कलागती होत्या. भाजपाच्या दुर्दैवाने त्याला या भांडणांचा योग्य वापर करता आला नाही. त्यांना शेवटी न्यायालयात माघार घ्यावी लागली. भाजपाचा यात फजितवाडा झाला असला तरी या मागे असलेली कॉंग्रेसची अंतर्गत भांडणे काही संपुष्टात आली नव्हती.

भाजपाने घडवलेली नाटके संपल्यानंतर या राज्यातली कॉंग्रेस अंतर्गत भांडणे पुन्हा उफाळून आली. उत्तराखंडांत बंडखोर आमदार भाजपात आले. तर आता अरुणाचलात कॉंग्रेसच्या एक वगळता सर्व आमदारांनी संघटितपणेे कॉंग्रेसला रामराम ठोकला आणि प्रादेशिक पक्षात प्रवेश केला. या दोन राज्यांत पूर्वी कॉंग्रेसची न्यायालयात सरशी झाली असली तरी तिचा आनंद अल्पजीवी ठरला आहे. आता घडत असलेल्या घटनांवरून कॉंग्रेसने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. पेमा खांडू हे दोनच महिन्यांपूर्वीच्या नाट्यमय घटनांनंतर मुख्यमंत्री झाले होते. त्यांना हे पद देताना ज्या नाबात तुकी यांना पायउतार करण्यात आले होते त्या तुकींनी मात्र आता पक्षांतर केलेेले नाही. ते एकटेच कॉंग्रेसमध्ये राहिले आहेत. या सदनातली आमदारांची संख्या ६० असून त्यात भाजपावे ११ आमदार आहेत. गंमतीचा भाग म्हणजे या कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी ज्या पक्षात प्रवेश केला आहे त्या अरुणाचल पीपल्स पार्टीचा एकही आमदार या सदनात नव्हता. आता ही संख्या ४२ झाली आहे. हे आमदार भाजपाशी हात मिळवणी करतात की काय याची उत्सुकता लागून राहिली आहे. या घटनांच्या मागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला जाण्याची शक्यता बघून भाजपाने तो आरोप होण्याच्या आतच आपला यामागे हात नसल्याचा आगाऊच खुलासा करून टाकला आहे. अर्थात या खुलाशाने कोणी समाधानी होणार आहे की नाही हे माहीत नाही पण न विचारला करण्यात आलेल्या खुलाशाने संशयाला भरपूर जागा ठेवली आहे. देशभरात कॉंग्रेसचे वर्चस्व कमी करून आपली सत्ता स्थापित करण्याची भाजपाची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही.

Leave a Comment