उत्तर प्रदेशात काका वि. पुतण्या

akhilesh-yadav
भारताच्या राजकारणात आता काका आणि पुतण्या यांचेच राजकारण रंगायचे दिवस आले आहेत. मग त्याला उत्तर प्रदेशच अपवाद कशाला असेल? तिथे तर आता काका आणि पुतण्या यांच्यातला संघर्ष टिपेला पोचला असून मुख्यमंत्री अखिलेश यादव हे आता परस्परांना संपविण्यास सिद्ध झाल्याप्रमाणे डावपेच आखायला लागले आहेत. तसा हा या दोघांतला संघर्ष नवा नाही पण त्याला आता नवा आयाम जोडला गेला असून त्यात आता अखिलेश यादव आणि सपाचे संस्थापक सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव या पितापुत्रांनीही एकमेकांना शह आणि काटशह द्यायला सुरूवात केली असल्याचे दिसायला लागले आहे. मुलायमसिंग यादव हे ज्यांना आपला गुरू मानतात ते डॉ. राममनोहर लोहिया हे समाजवादी विचारांचे होते. आताच्या राजकीय नेत्यांत मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव हे लोहियांचे अनुयायी आहेत. मुलायमसिंग यांनी उत्तर प्रदेशात आपला स्वत:चा पक्ष स्थापन केला तेव्हा त्याला समाजवादी पार्टी असे नाव दिले ते त्यामुळेच. वास्तविक त्यांच्या पक्षात नावाशिवाय कोठेही समाजवाद दिसत नाही. पण समाजवाद या शब्दाचाही प्रभाव काही कमी नाही.

या शब्दाचा फाटाफूट आणि बेदिली यांच्याशी निकटचा संबंध आहे. भारतात समाजवादी चळवळ नेहमीच दुहीने ग्रासलेली आहे. समाजवाद या शब्दातच अशी काही तरी जादू आहे की, या नावाचा पक्ष स्थापन केला की त्यात दुही माजतेच. आताही या पक्षात मुलायमसिंग यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व आहे पण तरीही त्याला दुहीने ग्रासायला सुरूवात केली आहे. हा पक्ष मुलायमसिंग यादव यांचाच फॅमिली लिमिटेड पक्ष आहे पण कुटुंब म्हटले की कुटुंबकलह येतोच. भारतातल्या सगळ्याच फॅमिली लिमिटेड पक्षांत तो आहे. शिवसेना, द्रमुक, राष्ट्रवादी, राजद असे सारे कौटुंबिक पक्ष कौटुंबिक कलहाने ग्रासलेले आहेत. समाजवादी पार्टीतला कुटुंब कलह विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसा अधिक तीव्र होत आहे म्हणूनच त्याचे परिणाम निवडणुकीच्या वातावरणावर होत आहेत. समाजवादी पार्टीतही मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव आणि त्यांचे काका शिवपालसिंग यांच्यात वर्चस्वावरून मोठा अंतर्गत संघर्ष जारी आहे. तसे शिवपाल हे प्रभावी नेते आहेत आणि त्यांच्याकडे अनेक खाती आहेत पण त्यांच्या पुतण्याने काकांचे निर्णम फिरवून त्यांना नेहमीच अपमानित केले आहे. त्यामुळे काका आणि पुतण्यातली कटुता एवढी वाढली आहे की नुकतेच मैनपुरी येथील एका समारंभात बोलताना शिवपालसिंग यांनी आपण आता पक्षातून बाहेर पडणार आहोत असे जाहीर केले आहे.

तसे झाल्यास राज्यात समाजवादी पार्टीला मोठाच धक्का बसेल आणि या पक्षाच्या मतदारांचा पक्ष सत्तेवर येण्याबाबतचा आत्मविश्‍वास संपून जाईल. त्याचा फायदा भाजपाला मिळेल. शेवटी मुलायमसिंग यादव यांनाही सारे राजकारण कळतेच. त्यांनीही एक कार्यक्रमात बोलताना शिवप्रसाद बाहेर पडण्याचे पक्षावर गंभीर परिणाम होतील असे स्पष्टच म्हटले आहे. म्हणून ते पक्षात फूट पडू देणार नाहीत. मात्र पक्ष एक राहिला तरीही अंतर्गत कलहातून दोन गटात एकमेकांचे उमेदवार पाडण्याची कारस्थाने होतील आणि त्याचाही फायदा भाजपाला होईल. म्हणून मुलायमसिंग यादव यांनी एक डाव टाकला आहे. आपला भाऊ आपल्यापासून दुरावू नये म्हणून त्यांनी त्याला आपल्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून जाहीर करून टाकल. शिवपाल यादव यांचा प्रभाव कमी करण्याची एकही संधी न सोडणारे त्यांचे पुतणे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या जखमेवर त्यांच्याच वडलांनी असे मिठ चोळले. आपले वडील आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. उत्तर प्रदेशातले मतदार त्यांच्याकडेच पाहून समाजवादी पार्टीला मतदान करीत असतात. त्यांना कोणत्याही निवडणुकीत विजयाकडे निर्णायकपणे नेणारा मुस्लिम मतदारही समाजवादी पार्टीला मतदान करताना मुलायमसिंग यादव यांच्याच प्रभावाखाली मतदान करीत असतो.

तेव्हा आपले वडील आपल्या पक्षाचे अध्यक्षपद कधी सोडतील असे अखिलेश यादव यांना स्वप्नातही वाटले नसेल. आपला मुलगा आपल्या भावाला सातत्याने पाण्यात पहात आहे असे दिसल्यावर आपले वडील आपल्या भावाच्या ऐवजी आपल्यालाच महत्त्व देतील असे अखिलेश यादव यांना वाटले असणार पण मुलायमसिंग यांनी कमालच केली. त्यांनी आपल्या मुलाऐवजी आपल्या भावाच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि मुलापुढेच पेच निर्माण केला. हा पुतण्याही राजकारणात तरबेज आहे. आपल्या वडलांनी आपल्या कानाखाली असा आवाज काढला आहे असे दिसताच त्यानेही आपल्या काकांची तीन खाती काढून घेतली. एवढेच नव्हे तर राज्याच्या सचिवालयातल्या काकांच्या आवडत्या वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याने सुटी दिली. आता काका आणि पुतण्याचा हा आगळा वेगळा सामना येत्या विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत आणल्याशिवाय राहणार नाही. काकांनी पुतण्याला सांभाळून घेऊन राजकारण करण्याचे अनेक प्रकार सध्या आपण राजकारणात पहात आहोत पण काका वि. पुतण्या असा एवढा कटुतापूणे सामना आपल्याला कोणत्याच राज्यात पहायला मिळणार नाही.

Leave a Comment