आता ‘डॉमिनोज’ देणार फक्त शाकाहारी पिझ्झा!

dominos
मुंबई – ‘डॉमिनोज’ या पिझ्झा विक्री क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीने नवरात्रीच्या काळात आपल्या ५०० दुकानांमधून केवळ शाकाहारी पिझ्झाच देण्याचा निर्णय घेतला असून या संबंधीचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. नवरात्रीच्या काळात अनेक लोक मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाही. त्याचबरोबर अनेक लोक या काळात उपवास करतात, या सगळ्याचा विचार करून आणि भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याच्या हेतून कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

देशभरात १ ते ११ ऑक्टोबर या काळात नवरात्री साजरी करण्यात येणार आहे. डॉमिनोजच्या देशातील ५०० दुकानांमधून या काळात केवळ शाकाहारी पिझ्झाच ग्राहकांना देण्यात येतील. याकाळात मांसाहारी पिझ्झा निर्मिती बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पिझ्झासाठी लागणारा बेसही वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे ११ दिवसांच्या काळात डॉमिनोजमधून ग्राहक केवळ शाकाहारी पिझ्झाचीच ऑर्डर देऊ शकणार आहेत. अशा पद्धतीने नवरात्रीनिमित्त आंतरराष्ट्रीय साखळी असलेल्या कंपनीने केवळ शाकाहारीच पिझ्झा देण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

नवरात्रीचा सण हिंदूंमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या काळात देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे गरबा-दांडीयाचे आयोजन केले जाते. देवीची आराधना करण्यासाठी अनेक भक्त उपवासही करत असतात. तर अनेक भक्त या काळात परंपरेप्रमाणे व्रतही करत असतात. महाराष्ट्रातही नवरात्रीचा उत्सव श्रद्धेने आणि आनंदात साजरा केला जातो.

Leave a Comment