कपिलच्या कॉमेडीची ट्रॅजेडी

kapil-sharma
कपिल शर्मा हा कॉमेडी किंग आहे खरा पण कोणतीही कॉमेडी ही शेवटी ट्रॅजेडीत संपत असते हे त्याला माहीत नाही असे दिसते. नाटक हे शास्त्र आहे आणि ते जाणणारे दिग्दर्शक फार कमी असतात. अभिनेत्यांना हे शास्त्र माहीत असण्याचें प्रमाण तर त्याहून कमी असते. कपिल शर्माला ते माहीत असो की नसो पण आता त्याला ते अनुभवाने ठावूक झाले आहे. कपिल शर्मा हा टीव्हीवरचा फार लोकप्रिय कॉमेडी किंग आहे असे म्हणतात पण त्याची ती लोकप्रियता त्याच्या प्रेक्षकांनाच माहीत असणार. त्याच्या टीव्हीवरील शो च्या वाटेला न जाणारांना त्याची लोकप्रियता माहीत असण्याची शक्यता कमीच पण आता मात्र सर्वांनाच त्याचा कॉमेडीचा शोही टीव्ही न लावता पहायला मिळाला तसेच त्याच्या कॉमेडीचे रूपांतर शेवटी ट्रॅजेडीत कसे झाले हे त्याच्यासह सर्वांनाच पहायला मिळाले. एकंदरीत हे दोन अंकाचे नाटक छान रंगले. आपण लोकप्रिय आहोत या भ्रमात तो सरकारवर डाफरायला लागला आणि त्याने बेकायदा बांधकाम करूनही वर मनपाच्या अधिकार्‍यांनी लाच मागितल्याचे नाटक करायला सुरूवात केली. शेवटी सत्य उघड झाल्यावर गयावया करायला लागला.

कोणत्याही नाटकात खलनायक असतो आणि तो शेवटी नेमका काय आहे हे सर्वांना समजते. अशा वेळी त्याच्यावर सर्वांकडे दयेची याचना करण्याची वेळ येते. या नाटकात मात्र कॉमेडी किंगवरच सारवासारव करण्याची पाळी आली. कपिल शर्माने मुंबईतल्या आपल्या कार्यालयात नवे बांधकाम करण्याची परवानगी महानगरपालिकेकडे मागितली पण ती देण्यासाठी त्याला संबंधित अधिकार्‍याने पाच लाख रुपयांची लाच मागितली असा त्याचा आरोप होता. तो आरोपही त्याने ट्विटरवर केला आहे. हा आरोप करताना त्याने संबंधित अधिकार्‍याचे नाव मात्र दिलेले नाही. ही टिवटिव करताना त्याने थेट नरेन्द्र मोदी यांनाही लक्ष्य केले आहे. त्यांना हेच का तुमचे अच्छेे दिन असे विचारून डिवचलेही आहे. अर्थात त्याने मोदींना साद घालण्यामागचा हेतू आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटून आपल्याला न्याय मिळावा हा नसून मोदींना अच्छे दिनच्या नार्‍यावरून खिजवणे हा आहे. मुंबई महानगरपालिकेतला कोणी अधिकारी कोणालाच लाच मागणार नाही ही काही मोदींची जबाबदारी नाही. पण देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांच्या नजरेस ही बाब आणून दिली तर मात्र वरच्या पातळीवरून सूत्रे हलवणे आणि संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देणे हे मात्र मोदी यांचे काम आहे. ते केले जाईलच पण या ठिकाणी शर्माने कॉमेडी केली आहे.

एक सामान्य माणूस म्हणून त्याला ही गोष्ट माहीत असायला हवी की, कोणावरही पैसे मागितल्याचा किवा ते दिले घेतल्याचा असा मोघम आरोप करून चालत नाही आणि अशा आरोपावरून चौकशीही केली जात नाही. एक तर ज्याच्यावर आरोप करायचा आहे त्याचे नाव तरी सांगायला हवे. खरे तर असे नाव सांगूनही भागत नाही. पैसे मागितल्याचा किंवा ते घेतल्याचा पुरावा सादर करावा लागतो. पण कपिल तर कोणाचे नावही सांगायला तयार नाही. एवढेच नाही तर तो त्या कार्यालयात जाऊन तो लाच घेणारा आरोपी कोण हे दाखवायलाही तयार नाही. अशा स्थितीत सरकारने कोणावर कारवाई करावी? की त्या कार्यालयात असणार्‍या सर्वांनाच आरोपी करावे? कायदा काय असतो याची त्याच्यासारख्या वर्षाला पंधरा कोटी रुपयांचा आयकर देणार्‍या माणसाला साधी माहितीही नसावी याचे नवल वाटते. पैसे मागितल्याचा आरोप हा कायद्यानुसारच करावा लागेल. तो करणारा कोणी तरी मोठा कॉमेडी किंग आहे म्हणून काही त्याच्यासाठी वेगळा कायदा नाही. तो कोट्यवधींचा आयकर भरतो म्हणूनही त्याला कायदा माफ नाही.

मात्र आता माध्यमांचा फार प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे या कॉमेडी किंगने केलेल्या या विनोदाला फारच प्रसिद्धी मिळाली आहे आणि सरकारही त्या दबावाखाली चौकशी करायला तयार झाले आहे. अशी लाच मागणाराचे नाव न सांगता आणि कसलाही पुरावा न देता आरोप केला असूनही सरकार चौकशी करीत असेल तर तो सामान्य माणसावर अन्याय होईल कारण असा आरोप सामान्य माणसाने केला असता तर सरकारने अजीबात चौकशी केली नसती. यातूनही एक मार्ग काढता येतो. कपिल शर्माला ते बांधकाम करण्याची अनुमती देण्याचा अधिकार कोणाला आहे त्यानेच लाच मागितली असल्याची संभावना आहे म्हणून पुरावा नसला तरीही त्याच अधिकार्‍यावर कारवाई करता येते. पण अशी काही कारवाई केली तरीही तिचा निकाल न्यायालय देणार आहे. म्हणून सरकारवर काहीही दबाव आला तरीही शेवटी न्याय करण्याचे काम न्यायालयाचे आहे. कपिल शर्माचा आरोप सिद्ध करायचा असेल तर न्यायालय काय पुरावा मागेल याला महत्त्व आहे. तो काही शर्माने दिलेला नाही. त्याने आपल्या स्वभावानुसार केवळ विनोद केला आहे. आपल्यासारख्या कलाकाराने आरोप केला की कसलाही पुरावा न देता चौकशी होऊन संबंधिताला शिक्षा दिली जाईल या भ्रमात तो आहे. पण न्यायालय ते मानणार आहे का? हा प्रश्‍न फार महत्त्वाचा आहे.

Leave a Comment