आपत्ती पार्टी

aap
आम आदमी पार्टी हा पक्ष कोणत्या मुहूर्तावर जन्माला आलाय हे काही कळत नाही पण तो मुहूर्त काही चांगला नसणार हे कळायला कोणालाही पंचांग पहावे लागणार नाही एवढ्या आपत्ती या पक्षावर कोसळल्या आहेत. या पक्षाची नाचक्की होणारी एखादीही घटना घडली नाही असा एकही आठवडा त्याच्या जन्मापासून पार पडला नसेल. यातल्या किती तरी आपत्ती अशा होत्या की त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वावरच किंवा पक्षाच्या दिल्लीतल्या सरकारच्या अस्तित्वावर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले. आपत्ती कोसळली तरीही तिच्यातूनही लोकप्रियता कमावण्याचा एक मार्ग या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शोधून काढला आहे. काहीही घडले तरी ते नरेन्द्र मोदींच्या नावाने बोटे मोडतात. मुळात नरेन्द्र मोदी लोकप्रिय असल्यामुळे त्यांच्या नावाने बोटे मोडली की त्याला प्रसिद्धी मिळते आणि आम आदमीची ती आपत्ती मोेदींमुळेच कोसळली असल्याने त्या पक्षाला तिच्या दुरुस्तीसाठी काही करण्याची गरज नसते. निदान केजरीवाल तरी आपल्या पक्षातल्या प्रत्येक संकटावर एकच उपाय सांगतात तो म्हणजे मोदी यांनी कारस्थाने थांबवावीत.

आता मात्र या पक्षावर कोसळलेले संकट न्यायालयाने टाकले आहे. आपल्या पक्षातल्या २१ आमदारांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा केजरीवाल यांचा डाव त्यांच्यावर उलटला आहे. त्यांची ती पदे आता रद्द करण्याची आपत्ती तर आली आहेच पण कदाचित निवडणूक आयोगाने मनावर घेतले तर या २१ आमदारांची आमदारपदे जाणार आहेत. आता ही आपत्ती न्यायालयामुळे आली असल्याने निदान आता तरी केजरीवाल त्याची जबाबदारी मोदींवर टाकणार नाहीत अशी अपेक्षा आहे. त्यांच्यावर कोसळलेल्या संकटाला मोदी बिती न म्हणता आप बितीच म्हणावे लागेल. केजरीवाल यांचे ग्रहच आता फिरले आहेत की काय हे कळत नाही. नवज्योतसिंह सिद्धु याने नवा पक्ष काढला आहे. सिद्धु या आधी भाजपात होता आणि त्याने तिथून बाहेर पडून आपला आवाजे पंजाब हा पक्ष स्थापन करीत असल्याचे जाहीर केले आहे. कोणालाही हे कळेल की असा एका पक्षात नाराज झालेला नेता आपला नवा पक्ष काढतो तेव्हा तो आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्षाच्या डोक्यावर खापर फोडतो. पण, सिद्धु यांनी आपला नवा पक्ष घोषित करताना भाजपावर टीकास्त्र न सोडता केजरीवाल यांच्याच नावाने खडे फोडले आहेत. एक गंमतीदार प्रसंग आहे. नवा पक्ष स्थापन करताना सिद्धु भाजपावर एक शब्दही बोललेला नाही. उलट त्याने आम आदमी पार्टीला असे काही लक्ष्य केले आहे की तो त्याच पक्षातून बाहेर पडत आहे असे वाटावे,

नवज्योतसिंग सिद्धू याने नवा पक्ष स्थापन करून पंजाबच्या राजकारणात एक चुकीचा फटका मारला आहे. मैदानावरील फटकेबाजी आणि राजकारणातली फटकेबाजी यातला फरक माहीत नसलेल्या सिद्धुच्या या फटक्याने तो आता नाही पण काही दिवसांनी का होईना पण बाद होणार आहे. त्याचा हा फटका योजना, आखून आणि स्वत:ची राजकीय औकात तपासून लगावलेला नाही. नव्वदच्या दशकात भारतीय क्रिकेट संघात आघाडीचा ङ्गलंदाज म्हणून नावाजलेला क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हा राजकारणात चमकला आणि खासदारही झाला पण राजकारणात किती महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे याचे भान त्याला राहिले नाही. त्याला भाजपात काय खुपायला लागले हे काही समजले नाही पण त्याने एके दिवशी भाजपातून काढता पाय घेतला. २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याला त्याच्या सुरक्षित अशा अमृतसर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली नाही. त्याला डावलून तिथून अरुण जेटली यांना उभे करण्यात आले. ही गोष्ट त्याला खटकली असणार.

अशा घटना तर पक्षात घडतच असतात. राजकारण हा मानापमानाचा खेळ असतो. असे अपमान पोटात घालून पुढे संधी मिळण्याची वाट पाहिली पाहिजे. पण भडक डोक्याच्या सिद्धुने भाजपाला धडा शिकवण्याचा आव आणून या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सिद्धु हा निष्णात राजकारणी नाही याचा आणखी काय पुरावा हवाय. आपल्याला एकदा तिकिट दिले नाही एवढ्या एका गोष्टीवरून त्याने आपल्याच विनाशाची पावले टाकली. खरे तर त्याच्या लोकसभा सदस्यत्वाच्या दहा वर्षांच्या काळात त्याच्या राजकीय कारकिर्दीचा ठसा म्हणावा तसा उमटलेला नव्हता. तरीही त्याची राजकीय महत्वाकांक्षा वाढीस लागली आणि त्याला पंजाबचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडायला लागली. म्हणून त्याने कमळ उपटून टाकत चक्क आपचा झाडू हातात घेण्याचा विचार पक्का केला. पण आप आणि भाजपात काय फरक आहे? तिथेही गद्दारांची जत्रा जमलेलीच आहेे. तिथेही पायात पाय घालणार्‍यांची संख्या कमी नाही, हे लक्षात आल्यानंतर सिद्धूचा अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या दोन्हींच्याही बाबतीत भ्रमनिरास झाला. केजरीवाल यांनी त्याला बरेच दिवस तिष्ठत बसवले. येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पाटीं सत्तेवर येईल आणि आपण नक्की मुख्यमंत्री होऊ असे त्याला वाटत होते. खरे तर आम आदमी पार्टीला तशी काही संधी नाही. ही गोष्ट खुद्द सिद्धू यालाही कळत होती पण त्याची बातच अलग आहे. न मिळणार्‍या मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवाला आणि सिद्धु यांच्यात वाद होऊन सिद्धूने नवा पक्ष स्थापन केला म्हणून त्याने नवा पक्ष स्थापन करताना केजरीवाल यांच्यावरच जास्त चिखलफेक केली.

Leave a Comment