व्यासंगींचे महामेरु

death
नामवंत मराठी लेखक आणि इतिहासकार वि. ग. कानिटकर यांचे निधन होणे ही मराठी साहित्य विशेषतः चरित्र लेखन या क्षेत्राला बसलेला मोठा धक्का आहे. कारण वि. ग. कानिटकर यांनी अनेक मोठ्या नेत्यांची चरित्रे इंग्रजी वाङ्मयातून मराठीत आणली आहेत. निव्वळ मराठी वाचणार्‍या वाचकांना जागतिक स्तरावरची जी माहिती मराठीतून मिळणे शक्य नाही त्यांना मराठीतून उपलब्ध करून देण्याची मोठी कामगिरी वि. ग. कानिटकर यांनी केलेली आहे. अर्थात त्यासाठी इंग्रजी साहित्यातील अनेक पुस्तकांचे वाचन करावे लागले. त्यांच्या नोंदी ठेवाव्या लागल्या आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य अतीशय ओघवत्या आणि प्रभावी मराठी भाषेत लिहावे लागले. श्री. वि. ग. कानिटकर यांची लिखाणाची शैली ही पूर्णपणे वेगळी होती. म्हटले तर ती ललित शैली नव्हती कारण त्यांच्या लेखनशैलीला खांडेकर किंवा फडकेंच्या शैलीप्रमाणे आलंकारिक वाक्यांचा आणि उपमांचा सोस नव्हता. परंतु कानिटकरांची लेखनशैली योग्य तेथे हे सारे लेखनगुण घेऊन प्रकट होत असे. परंतु ती त्या प्रसंगाची गरज आहे म्हणूनच येत असे.

अतीशय संपन्न मराठी भाषा आणि विशेषतः लोकांना खिळवून ठेवणारे प्रसंगाचे वर्णन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. आलंकारिक आणि ललित शैलीचा वापर न करताही लेखन कसे प्रभावी करता येते याचा धडा त्यांनी घालून दिलेला होता. शैलीच्या अंगाने त्यांची पुस्तके वाचनीय होती म्हणूनच त्यांच्या एकेका पुस्तकाने इतिहास घडवला. दुसर्‍या महायुध्दास कारणीभूत ठरलेला जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याच्यावर कानिटकरांनी लिहिलेल्या नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकाने असा इतिहास घडवला आहे. कथा, कादंबर्‍या किंवा ज्ञानेश्‍वरीसारखे आध्यात्मिक ग्रंथ वर्षानुवर्षे वाचले जातात आणि त्यांच्या अनेक आवृत्त्या निघत जातात. परंतु एका जर्मन हुकूमशहावर आणि दुसर्‍या महायुध्दाच्या इतिहासावर लिहिलेल्या या पुस्तकाच्या ३० पेक्षाही अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. अशा विषयाच्या पुस्तकाने असा विक्रम करावा हे अभूतपूर्वच आहे. वाचनाची चांगल्यापैकी आवड असणारा कोणीही मराठी वाचक आपल्या आयुष्यात कधीतरी नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचल्याविना राहत नाही. हा विक्रम करणे जसे त्यांच्या लेखनशैलीमुळे शक्य झाले तसेच ते त्यातल्या अधिकृत आणि नेमकेपणाने दिलेल्या माहितीमुळे देखील शक्य झाले आहे. बर्‍याच लेखकांना भाराभर संदर्भ ग्रंथांचे संदर्भ देण्याची सवय असते. परंतु वि. ग. कानिटकरांनी दुसर्‍या महायुध्दाचा इतिहास लिहिताना फार निवडकच संदर्भ ग्रंथ वापरले आहेत.

त्यांच्या लिखाणाला त्यांच्याकडच्या कात्रणांच्या संग्रहाचाच आधार प्रामुख्याने आहे. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात अगदीच शाळकरी वयात असतानाही त्यांनी त्या काळात प्रसिध्द झालेल्या या महायुध्दाच्या बातम्यांची कात्रणे तारीखवार जतन करून ठेवली आहेत आणि त्याच्या आधारावर प्रामुख्याने दोन-तीन ग्रंथ लिहिले आहेत. कात्रणे जमा करण्याची ही चिकाटी आणि कौशल्य फार दुर्मिळ झालेले आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकाची पारायणे करणारे लोकही मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या समाजात काही वेळा फार परिपक्वता नसलेल्या लोकांमध्ये हुकूमशाहीचे फार आकर्षण आढळते आणि हिटलर तर हुकूमशहांचा मेरुमणीच होता आणि म्हणूनच अनेकांनी नाझी भस्मासूर हे पुस्तक वाचलेले आहे. परंतु खुद्द कानिटकरांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांनी हुकूमशाहीच्या आकर्षणापोटी हे पुस्तक लिहिलेले नाही. उलट या पुस्तकात त्यांनी हिटलरला भस्मासूर म्हटलेले आहे. असे असले तरी त्यांनी नेहमीच आपण इतिहासाचे पुस्तक लिहित आहोत याचा विचार करून लिखाणाच्या बाबतीत पूर्ण तटस्थता पाळण्याचा अतीशय दुर्लभ वाटावा असा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे.

मुळात वि. ग. कानिटकर हे सरकारी नोकरी करत होते. परंतु ती नोकरी करत असताना आणि निवृत्तीनंतरही कानिटकरांनी वाचन आणि लेखन यांचा यज्ञ अखंड जारी ठेवला. त्यांची ग्रंथ संपदा थक्क करणारी आहे. हिटलरशिवाय त्यांनी व्हिएतनामच्या युध्दावर, व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ हे पुस्तक लिहिलेले आहे. त्याशिवाय अब्राहम लिंकन, माओ यांचीही चरित्रे मराठीत आणली आहेत. जगाच्या इतिहासावर अलीकडच्या काळात ज्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडलेला आहे अशा लोकांची चरित्रे हाताशी घेऊन समकालीन इतिहासावर नजर टाकण्याचा प्रयत्नक कानिटकरांनी केलेला आहे. अशा प्रकारची १२ पुस्तके लिहून प्रकाशित केली होती. त्याशिवाय ८ कथासंग्रह, ६ अनुवादित पुस्तके आणि ३ पुस्तकांचे संपादन असा त्यांचा साहित्यसेवेचा पसारा होता. इतिहासाच्या वाटचालीत हिटलरबरोबरच अब्राहन लिंकन, माओ त्से तुंग, गोल्डामायर इत्यादींची चरित्रे आणि त्यांच्या देशांचे इतिहास कानिटकरांनी शब्दबध्द केले आहेत. त्याशिवाय ३ कादंबर्‍या आणि काही छोटीमोठी पुस्तके हीही त्यांच्या ग्रंथसंभारात आहेत. सरकारी नोकरी सुरू असतानाही एवढे प्रचंड ग्रंथ लिहिणे आणि ते गाजणे हे काही येरागबाळाचे काम नव्हे. त्यांनी सावरकर आणि महात्मा गांधी याही दोन महापुरुषांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुर्दैवाने तो प्रयत्न साकार झाला नाही.

Leave a Comment