ई-मेल आयडी सेवांसमोर दाता एक्सजेनचे आव्हान

mail-id
नवी दिल्ली : देवनागरी लिपित मराठी ई-मेल देण्याची सेवा स्टार्ट-अप कंपनी दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीने सुरू केली असून ही सेवा सध्या मोफत नाही. पण ती लवकरच मोफत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. भारतात ही सेवा मोफत सुरू झाल्यास जी-मेल, आऊटलूक आणि याहू या दिग्गज कंपन्यांच्या ई-मेल आयडी सेवांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. देवनागरी लिपीत हिंदी, मराठी, नेपाळी आदी अनेक प्रमुख भारतीय भाषा लिहिल्या जातात. या भाषा वापरणारे लोक देवनागरी ई-मेल आयडीला पसंती देऊ शकतात.

याबाबत अधिक माहिती देताना दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अजय दाता यांनी सांगितले की, आतापर्यंत शे-दोनशे मेल आयडी तयार करण्यात आले असून ते ‘डॉट भारत’ या डोमेनवर आहेत. आमच्या वेबसाईटवर जाऊन कोणीही देवनागरीतील ई-मेल आयडी विकत घेऊ शकतो. या वेब पत्त्यावरून पाठवलेले मेल जी-मेल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांच्या सेवा यंत्रणांमध्ये स्वीकारले जात आहेत. नेटवर हिंदी देवनागरीची सोय यापूर्वीच झाली आहे. आता देवनागरी लिपीत ई-मेल अ‍ॅड्रेस तयार करण्याची सोय आम्ही दिली आहे.

गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने घेतलेल्या एका बैठकीत देवनागरी ई-मेल आयडी स्वीकारण्याचे मान्य केले आहे.

Leave a Comment