पंजाबातला राणे

nvjyot-singh-sidhu
महाराष्ट्रात नारायण राणे यांना मोठे कर्तबगार नेते मानले जाते. परंतु कोणत्यावेळी काय बोलावे आणि कोणत्यावेळी काय करावे याचे भान नसल्यामुळे त्यांची कर्तबगारी मातीमोल झाली आहे आणि त्यांच्या बोलण्याने ते अनेकदा राजकारणात अडचणीत आले आहेत. क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू याचेही प्रकरण असेच आहे. त्याने एकदा रागाच्या भरात त्याच्याशी भांडणार्‍या व्यक्तीच्या डोक्यात क्रिकेटची बॅट घातली आणि तो माणूस मरून गेला. त्यामुळे सिध्दूवर खुनाचा खटला दाखल झाला आणि त्यातून सुटका करून घेऊन राजकारणात स्थिरस्थावर होईपर्यंत नवज्योतसिंग सिध्दूच्या अक्षरशः नाकीनव आले. अशा अवस्थेत राजकारणात शिरूनसुध्दा त्याला पंजाबचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडायला लागली आणि नारायण राणे यांच्याप्रमाणेच त्यानेही त्या अगम्य महत्त्वाकांक्षेपायी भारतीय जनता पार्टीचा त्याग केला.

भाजपाने त्याला दोन वेळा लोकसभा सदस्यत्त्वाची संधी दिली होती. परंतु तेवढ्याने समाधान न झालेल्या सिध्दूने भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी तर दिलीच पण आम आदमी पार्टीमध्ये जाऊन राजकारणात बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टीत आपले स्वागत चांगले व्हावे आणि तिथे आपल्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळावी यासाठी त्याने आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती तर केलीच पण भारतीय जनता पार्टीविषयी भरपूर गरळ ओकून टाकले. एकदा सिध्दूने भाजपाच्या विरोधात मनमानेल तशी फलंदाजी केल्यामुळे केजरीवाल खुष झाले.

आम आदमी पार्टीत कोणत्या अटीवर सहभागी करून घेणार यावर चर्चा सुरू झाल्यास मात्र सिध्दूला मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पुरी होणार नाही याची जाणीव व्हायला लागली. दरम्यान त्याने भाजपाने दुखवून ठेवलेच होते आणि त्यामुळे केजरीवाल यांचे एक काम झालेच होते. त्यांनी नंतर सिध्दूला मुख्यमंत्री पद देण्याविषयी असमर्थता व्यक्त करण्यास सुरूवात केली. तेव्हा मात्र सिध्दूला आपण भाजपाचा त्याग केल्याचा पश्‍चात्ताप व्हायला लागला. भाजपातून बाहेर पडल्यानंतर भाजपाला भरपूर शिव्या दिल्या असल्यामुळे भाजपाचे दरवाजे त्याच्यासाठी बंदही झालेले होते. त्यामुळे आता भाजपातही जाता येत नाही आणि आम आदमीतही इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आता तिसरा पर्याय म्हणजे स्वतःचा पक्ष काढणे. त्यादृष्टीने सिध्दूचे प्रयत्न सुरू आहेत. वस्तुतः त्याच्या या प्रयत्नाला काही अर्थ नाही. पंजाबचा मुख्यमंत्री होण्याइतकी राजकीय उंची आपल्याकडे नाही याचे भान त्याला नाही. त्यातून ही गडबड होत आहे.

Leave a Comment