लोकसंख्या विवेक

mohan-bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशात आग्रा येथे एका कार्यक्रमात बोलताना हिंदूंनी अधिक मुलांना जन्म द्यावा असे आवाहन केल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या आहेत. अर्थात सरसंघचालक असे काही बोलले की तिची बातमी होणार हे उघड आहे आणि विशेषतः सरसंघचालकांच्या विधानामध्ये कोठे हिंदुत्ववाद प्रकट होत असेल तर त्याच्या बातम्या अधिक व्यापकपणे प्रसिध्द होतात. त्यातल्या त्यात त्यांच्या वक्तव्यात आलेला हिंदुत्वाचा मुद्दा मुस्लिमांच्या विरोधात असल्यास या बातम्यांवर मोठ्या प्रमाणावर विचारमंथन होते आणि बातम्यांच्या पल्याड जाऊन त्यावर टीकाटिप्पणीही केली जाते. सध्या उत्तर प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वहायला लागले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते तिथे सत्तेवर येण्याची स्वप्ने गंभीरपणे पहायला लागले आहेत. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतांना निर्णायक महत्त्व आहे. त्यामुळे अशा मतदारसंघामध्ये हिंदू विरुध्द मुस्लीम असा वाद पेटवून दिला की हिंदूंची मते संघटित होतात आणि त्यांच्या गठ्ठा मतदानाच्या जोरावर मुस्लिमांचे गठ्ठा मतदान निष्प्रभ होते.

असा हिशोब मांडून उत्तर प्रदेशामध्ये सगळेच राजकीय पक्ष मुस्लिमांच्या किंवा हिंदूंच्या गठ्ठा मतदानासाठी विशिष्ट पध्दतीचे राजकारण खेळायला लागतात. त्यामुळे सरसंघचालकांनी हिंदू विरुध्द मुस्लीम असा भेद निर्माण होण्याची क्षमता असलेले हे विधान केले. त्यामुळे माध्यमांमधून त्यांच्या या विधानावर प्रतिकूल मतप्रदर्शन सुरू झाले आहे. मोहन भागवत यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते हिंदू विरुध्द मुस्लीम असे वातावरण निर्माण करण्याचा जसा प्रयत्न करतात आणि तशी संधी कधी हातची सोडत नाहीत तसाच प्रकार माध्यमांचाही झालेला आहे. मोहन भागवत मुस्लिमांच्या विरुध्द कधी काही बोलतात का यावर सारी माध्यमे टपूनच बसलेली असतात. ते प्रत्यक्षपणे मुस्लिमांच्या विरुध्द बोलले नाही तरी त्यांच्या विधानाचा विपर्यास करून त्यांच्यावर मुस्लीमविरोधाचा आरोप करण्याचा आगलावेपणाही काही माध्यमे करत असतात. यापूर्वीही मोहन भागवत यांच्या काही विधानांच्या बाबतीत असे घडलेले आहे. एकंदरीत संघ आणि भाजपाचे नेते मुस्लिमांच्या विरोधात बोलण्यास नेहमी उत्सुकच असतात आणि ते नेहमी मुस्लीम विरोधी आगलावेपणा करत असतात. हे समाजाच्या आणि विशेषतः मुस्लिमांच्या मनावर ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्या कोणत्याही विधानावर मर्यादेपेक्षा अधिक लक्ष केंद्रीत करून ही मंडळी मुस्लिमांची मने भडकावयाची प्रयत्न करत असतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला मुस्लिमांची सहानुभूती मिळू नये असा या संघ विरोधकांचा प्रयत्न असतो. उद्या चालून हिंदुत्ववादी शक्ती मुस्लीम हातात हात घालून चालायला लागले तर समाजवादी, साम्यवादी आणि कॉंग्रेस तसेच अन्य सर्व प्रादेशिक पक्ष यांची दुकाने उठणार आहेत. हे माहीत असल्यामुळेच या सगळ्या राजकीय पक्षांचे हितसंबंध सांभाळण्याचे कंकण हाती बांधलेले काही पत्रकार सरसंघचालकांच्या एखाद्या वाक्याचा विपर्यास करून त्यावर नेहमीच आगडोंब पेटवत असतात. एकंदरीत हिंदू-मुस्लीम भेद निर्माण करणारी वाक्ये हा जसा काहींच्या राजकारणाचा भाग असतो तसाच सरसंघचालकांची विधाने हातात घेऊन त्यावर गोंधळ घालणे हासुध्दा राजकारणाचाच भाग असतो. त्यामुळे सरसंघचालकांच्या आग्रा येथील विधानावरून सध्या ज्या माध्यमांमध्ये चर्चांचे गुर्‍हाळ सुरू झाले आहे. ती सारी माध्यमे ही मुस्लिमांच्या कल्याणाचे कंकण हाती बांधलेले समाजसेवक नव्हेत हेही लक्षात घेतले पाहिजे.

आग्रा येथे नेमके काय झाले हे तर कोणीच कोणाला सांगत नाही. वस्तुस्थिती न सांगता आणि मागचे पुढचे संदर्भ तोडून मधलेच एक सोयीस्कर वाक्य हाती धरून चर्चा घडवणे हा काही माध्यमांचा धंदा झाला आहे. त्यांच्यापासून जनतेने सावध राहण्याची गरज आहे. मुळात सरसंघचालकांनी कोणत्या धर्मातल्या लोकांना किती मूल्य असावे याविषयी काही विधानच केलेले नाही. एका प्राध्यापकाने प्रश्‍नोत्तरामध्ये असा प्रश्‍न विचारला की मुस्लिमांची संख्या ५ टक्क्यांनी वाढते आणि मुस्लिमांची संख्या २ टक्क्यांनीच वाढते अशा परिस्थितीत हिंदूंनी काय करावे? खरे म्हणजे या प्रश्‍नातील माहिती चुकीची आहे. मुस्लिमांची संख्या मुळात ५ टक्क्यांनी वाढतच नाही. ती हिंदूंपेक्षा काही प्रमाणात जास्त गतीने वाढत आहे हे खरे आहे. त्यावर अनेक सेक्युलर माध्यमांनीही चिंता व्यक्त केली आहे. मात्र या चुकीच्या प्रश्‍नावर उत्तर देताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना संख्या वाढवायला कोणी बंदी घातली आहे असा प्रतिप्रश्‍न केला. देशात कोणाला किती मुले व्हावीत या संबंधात कसला कायदा नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामध्ये काही गडबड असेल परंतु या विधानाने मुस्लिमांच्या विरोधात बहकवले गेले हे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूंची लोकसंख्या गतीने वाढली तर मुस्लीम चिडतील कशाकरिता? हा मूळ प्रश्‍न कोणी विचारतच नाही. मात्र बेजबाबदारपणे अशा निरर्थक विधानावर अधिक वाद घातला जातो. मूळच्या विधानापेक्षा हा वाद अधिक धोकादायक आहे.

Leave a Comment