दहीहंडीला शिस्त हवीच

dahihandi
दहीहंडी हा भारतीय परंपरेतला एक खेळ आहे आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या बाळलीला जागविणारा आहे. मात्र अलीकडच्या काळात या खेळाला सवंग स्वरूप आले आणि त्याचे बाजारीकरण झाले. जिथे चार लोक एकत्र येतात तेथे पुढारी धावतात आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण लोकांचे लक्ष वेधण्यावरच त्यांना मिळणारी मते अवलंबून असतात. गरीब लोकांच्या शिक्षणासाठी काही प्रयत्न करावेत, समाजाच्या सुधारणांसाठी काही प्रयास करावा आणि त्यातून आपले नेतृत्व उभे करावे ही परंपरा आता खंडित झाली आहे. नाना प्रकारे पैसा कमवणे आणि त्या पैशातून नेतृत्व उभे करणे असा प्रकार आता सुरू झाला आहे. त्यामुळे अशा पठडीतल्या नेत्यांनी दहीहंडीच्या धार्मिक खेळालासुध्दा सवंग स्वरूप आणले आणि त्यावर बक्षिसे लावायला सुरूवात केली. ही बक्षिसे हजारो रुपयांवरून लाखो रुपयांपर्यंत कधी गेली हे कळलेसुध्दा नाही आणि मोठ्यात मोठे बक्षिस मिळवण्याची नशा गोविंदाच्या मंडळांना चढायला लागली. आपण काय करतोय याचे भानसुध्दा त्यांना राहिले नाही आणि ८ ते ९ मजले करून मडक्यातले दही आणि पुढार्‍यांची बक्षिसे पदरात पाडण्याची विचित्र अहमहमिका सुरू झाली.

अति तेथे माती या म्हणीचा प्रत्यय या दहीहंडीतसुध्दा यायला लागला आणि गेल्या दहा वर्षात पुणे आणि मुंबईच्या परिसरात ७०० तरुण मुले दहीहंडीच्या मनोर्‍यावरून पडून जन्मासाठी अपंग झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे या खेळावर नियंत्रण असले पाहिजे असे सरकारला वाटले आणि त्यातून कोर्टबाजी सुरू झाली. सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर काही बंधने लादली. २० फूट उंचीपेक्षा अधिक उंचीचा मनोरा असू नये आणि १८ वर्षांच्या आतील मुलांना दहीहंडीत भाग घेण्याची परवानगी असू नये असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने लादले. आता हे निर्बंध मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आले असतानाच लादले गेल्यामुळे या निर्णयावरून सवंग राजकारण सुरू झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच मनसे नेते राज ठाकरे यांनी तिच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली. दहीहंडीच्या खेळात काही मुले पडून जखमी होतात म्हणून हा खेळच रद्द करायचा का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. खरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा खेळ काही रद्द केलेला नाही. साधारणपणे दहीहंडीची उंची एवढी असावी की जिच्या वरच्या थरातून एखादा गोविंदा खाली पडला तरी तो मरू नये किंवा जन्मभरासाठी तो अपंग होऊ नये आिण सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्बंध योग्यच आहे. न्यायालयाने दहीहंडीवर काही बंदी आणलेली नाही.

२० फूट उंचीची दहीहंडी आता मान्य करण्यात आली आहे. ८ किंवा ९ मजल्यापर्यंत रचना करून तेवढ्या उंचीवर दहीहंडी बांधण्याची तयारी करणार्‍या अतीउत्साही गोविंदा मंडळांच्या उत्साहावर या निर्णयामुळे पाणी फेरले गेले आहे. २० फुटांची उंची म्हणजे साधारण चार थर होतात. बक्षिसांच्या खैरातीमुळे या खेळाला बाजारू स्वरूप येण्याआधीच्या दहीहंडीच्या खेळाची माहिती काढली तर असे लक्षात येईल की पूर्वीही चार ते पाच मजलीच मनोरे उभे केले जात होते. परंतु पुढार्‍यांनी बक्षिसे लावल्यामुळे हे मजले वाढले आहेत. त्यांना पूर्ववत २० फुटांवर आणल्याने हिंदू धर्म काही बुडणार नाही. परंतु मनसे नेते राज ठाकरे यांनी तसा आक्षेप घेतला आहे. या खेळात अपघात होतात म्हणून अशी बंधने आणण्याऐवजी दहीहंडीच्या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता द्यावी अशी एक मागणी काही गोविंदा मंडळांनी केलेली आहे. परंतु तसा प्रस्ताव अजून कोणी ठेवलेला नाही आणि ठेवायचा झाला तरी साहसी खेळ म्हणून मान्यता मिळवण्याइतपत नियम या खेळाला तयार करावे लागणार आहेत. त्याला शास्त्रशुध्द रूप द्यावे लागणार आहे आणि काही बंधने पाळूनच साहसी खेळ हा दर्जा मिळवावा लागणार आहे.

गोविंदा मंडळामध्ये आता १८ वर्षांच्या आतील मुलांना अनुमती नाही. त्यामुळे मंडळाच्या मजल्यावर बंधने येणार आहेत. कारण अधिकाधिक मजले तयार करायचे झाले तर वरच्या मजल्यावर लहान मुलांनाच चढवावे लागते. पण आता लहान मुलांना बंदी आल्यामुळे सर्वात वरच्या मजल्यांचे प्रश्‍न येणार आहेत. अर्थात आता मजलेच कमी झाल्यामुळे १८ वर्षांची वयोमर्यादा फार अडचणीची ठरणार नाही. शेवटी दहीहंडी हा काय प्रकार आहे. याचा शोध घेतला असता या खेळाचे आजचे स्वरूप, गोविंदा मंडळांच्या स्पर्धा, त्यावर लागणारी बक्षिसे आणि मंडळांचा उत्साह कमी करण्यासाठी झालेली कोर्टबाजी या सगळ्या गोष्टी हास्यास्पद ठरतात. ही दहीहंडी कशासाठी बांधायची आहे? पंढरपूरला आषाढी यात्रा संपल्यानंतर दहीकाला आणि दहीहंडी होते. परंतु शतकानुशतके तिथे सुरू असलेली ही परंपरा पुढार्‍यांच्या बक्षिसांचे ग्रहण न लागल्यामुळे सात्विकपणे पाळली जाते. श्रीकृष्ण बालपणी शिंक्यावरचे लोणी चोरून खात असे आणि शिंके उंच असल्यामुळे आपल्या एका दोघा सहकार्‍यांना खाली वाकवून त्याच्या पाठीवर चढून तो शिंक्यातले लोणी हस्तगत करत असे. मग भगवान श्रीकृष्ण त्या काळात असे ९-९ मजले करत नव्हता आणि यशोदा मैय्या तेवढ्या उंचावर लोणीही ठेवत नव्हती. श्रीकृष्णाला फार तर एखादा मजला मनोरा करून लोणी मिळवता येत होते. हे ९ मजले कोठून आले काही कळत नाही आणि त्यांच्यावर बंदी आली की संस्कृती बुडत चालल्याची हाकाटी केली जाते तीही अनाकलनीय आहे.

Leave a Comment