राजसाहेबांना पडलेला प्रश्‍न

raj-thakare
खरेच मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठा महत्त्चाचा प्रश्‍न विचारला आहे. भ्रष्ट नेत्यांना लोक पुन्हा निवडून देतात कसे ? असा सवाल त्यांनी केला आहे. केला आहे म्हणजे त्यांनी तो आपल्या मनाला विचारला आहे. मतांचे राजकारण म्हणजेच निवडणुकीचे राजकारण असे कसे असते ? मुंबईत एवढे खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या कामात एवढा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षांपासून असे प्रकार सुरू असतानाही लोक पुन्हा याच लोकांना कशी काय मते देतात असे कोडे त्यांच्या मनाला पडले आहे. राज ठाकरे यांना असे काही प्रश्‍न कधी कधी पडत असतात. तसे ते पडावेत असे आम्हाला वाटते कारण या निमित्ताने ते विचार करायला लागतील. काही संशोधन करतील. अर्थात तसे काही त्यांनी काही करावे अशी आमची अपेक्षा आहे. ते तसे काही करायला जातील तेव्हा या प्रश्‍नांची उत्तरे शोधता शोधता त्यांचे राजकीय प्रबोधन तरी होईल. आपण एवढे प्रामाणिकपणाने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करीत असतानाही लोक आपल्याला का मते देत नाहीत याचाही उलगडा त्यांना व्हायला लागेल.

राजकारणात प्रत्येक राजकीय पक्ष आपला काही तरी विचार मांडत असतो आणि जनतेला तो विचार पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या पक्षाचे नेते आपल्या विचाराने प्रभावित झालेले असतात आणि आपला विचार तोच खरा विचार आहे अशी त्यांची मनोमन खात्री असते. हा खाक्या सगळ्याच पक्षांना लागू आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. साम्यवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विचार योग्य आणि तर्कशुद्ध आहे असे वाटत असते तर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जगात शिवसेना हाच एकमेव राजकीय पक्ष तरुणांच्या मनात अंगार पेटवण्याच्या क्षमतेचा आहे अशी खात्री असते. यालाच वैचारिक अभिनिवेश असे म्हणतात. एकदा एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात आपल्या विचाराच्या अनुरोधाने अभिनिवेशाचा अग्नी पेटला की त्याला बाकी सारे राजकीय पक्ष टाकावू आणि जनतेसाठी कुचकामी असल्याचे वाटायला लागते. या संबंधाने त्याच्या मनाची कितीही समजूत पटली असली तरीही ती जनतेच्या मनाची पटलेली नसते. जनता काही सामान्य प्रश्‍न उपस्थित करीत असते. पक्षाच्या विचारांचा अभिनिवेश बाळगणारा हा कार्यकर्ता अशा प्रश्‍नाला नेमकी बगल देत असतो. एकेका पक्षाचे नाव घेऊन असे काही प्रश्‍न त्यांना विचारायला लागलो तर त्या पक्षाचे पितळ उघडे पडते पण हे पेटलेले कार्यकर्ते तसे होण्याची शक्यता दिसायला लागली की गोेंधळ तरी घालतात किंवा असे प्रश्‍न विचाराणार्‍यावर वैयक्तिक हल्ले करायला लागतात.

जागेच्या अभावी अशा विविध राजकीय नेत्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नाची आणि त्यांच्या उघड्या पडणार्‍या पितळांची यादी देता येत नाही. पण सेक्युलॅरिझमच्या बाता मारणारे कॉंग्रेसवाले मुस्लिम लीगशी युती कशी करतात, भांडवलदारांना शिव्या देणारे कम्युनिष्ट त्यांनी आपल्या राज्यात गुंतवणूक करावी म्हणून त्यांची मनधरणी कशी करतात, इंदिरा गांधी यांच्या घराणेशाहीवर टीका करणारे किती भाजपा नेते. समाजवादी नेते आणि शिवसेनेचे (त्यात मनसेही आलाच) नेते आपल्या पक्षात आणि घरात घराणेशाही चालवतात वगैरे. असे अडचणीत आणणारे प्रश्‍न विचारले गेले की अभिनिवेशाची नशा उतरायला हवी पण तशी ती उतरत नाही कारण असा पेटलेला कार्यकर्ते आपल्या पक्षात काही चुकीचे घडू शकते हे मान्यच करायला तयार नसतो. भ्रष्टाचाराचीही तर्‍हा हीच आहे. भाजपावाले कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर तुटून पडतात पण तसाच भ्रष्टाचार आपल्या पक्षातल्या नेत्याने केला की मात्र ते भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलून टाकतात. जनताही अशा बदललेल्या व्याख्यांना बळी पडते. त्यांच्या आवडत्या पक्षातला भ्रष्टाचार त्यांना सौम्य वाटायला लागतो.

आता बलात्काराचेच पहा ना ! कोपर्डीत बलात्काराची घटना घडली तेव्हा राज ठाकरे तिकडे धावले आणि बलात्काराच्या अपराधाला मुस्लिम राष्ट्रातल्या कठोर शिक्षांसारख्या शिक्षा दिल्या पाहिजेत असे म्हणाले. पूर्वी त्यांच्याच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर असाच आरोप लागला होता. तेव्हा मात्र राज साहेबांची प्रतिक्रिया वेगळी होती. त्यांना या संबंधात प्रश्‍न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी, बलात्कार करणारा कोणीही असो. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले नाही. त्यांचे उत्तर होते. सामूहिक बलात्कार हा काय मनसेचा कार्यक्रम आहे का? भ्रष्टाचाराच्या बाबतीत असेच घडते. भ्रष्टाचाराचे आरोप झाले की ज्या पक्षावर असेे आरोप होतात तो पक्ष त्या आरोपांवरचे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनात्मक मुद्दे पुढे करून त्यांचाच गाजावाजा करायला लागतात आणि जनता ऐन मतदानाच्या वेळी भ्रष्टाचार विसरून त्या भावनात्मक प्रश्‍नावरच लक्ष द्यायला लागतात. हे तर निवडणुकीचेे राजकारण असते. शिवसेनेने तसे ते केले आहे. त्या काळात राज साहेबही शिवसेनेतच होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव होणार अशी स्थिती दिसायला लागताच शिवसेनेने नेहमीच मुंबईच्या नावाने बांग दिलेली आहे. आताही भाजपाचे मुंबईला केन्द्रशासित करण्याचे कारस्थान असल्याचा बोभाटा शिवसेना आणि मनसेही करीत असतात तो याच हेतूने असतो.

Leave a Comment