पाकिस्तान एकाकी

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटावरून केलेल्या भाषणात इतर अनेक विकास विषयक आणि कारभार विषयक गोष्टी होत्या परंतु त्यांनी पाकिस्तानला बलुचिस्तानवरून दिलेला इशारा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या या इशार्‍यामुळे केवळ भारतच नाहीतर सगळ्या जगताच बलुचिस्तानमध्ये नेमके काय चालले आहे यावर चर्चा सुरू झाली आहे. खरे म्हणजे तिथे जे काही सुरू आहे ते पाकिस्तानातल्या लोकांना चांगलेच माहीत आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर भारतातल्या काश्मीरमध्ये जे सुरू आहे तेच पाकिस्तान मधल्या बलुचिस्तानमध्ये सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना ते चांगलेच माहीत आहे. मात्र आता त्यावर पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विविध वृत्तवाहिन्यांमध्ये पाकिस्तानातले पत्रकार आणि विचारवंत यांच्यात बलुचिस्तानवरून जोरदार वाद सुरू आहे. नेमकेपणाने सांगायचे झाले तर हा वाद सुध्दा नाही. त्यांचे ते विचारमंथन आहे आणि बलुचिस्तानमधल्या लोकांचा स्वातंत्र्याचा लढा हा पाकिस्तानच्याच सरकारने कसा चुकीने हाताळला आहे असा या विद्वानांचा निष्कर्ष निघत आहे.

पाकिस्तान कुरापतखोर राष्ट्र आहे आणि भारताच्या काश्मीर, पंजाब एवढेच नव्हे तर सर्व राज्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या आयएसआय या संघटनेने आपले हस्तक मोठ्या प्रमाणावर पेरलेले आहेत. म्हणूनच भारतात अधूनमधून आयएसआयचे किंवा पाकिस्तानातल्या कोणत्या तरी दहशतवादी संघटनेचे हस्तक पोलिसांना सापडत असतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घातपाती कारवायांना पाकिस्तानने बळ दिले तर भारत सरकार बलुचिस्तानचा मुद्दा जागतिक स्तरावर उपस्थित करेल आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे सरकार किती निर्दयपणे लोकांना कुचलून काढत आहे हे सगळ्या जगाला ओरडून सांगेल, असा हा इशारा होता. तुम्ही काश्मीरच्या लोकांना मदत केली तर आम्हीही त्या बदल्यात बलुचिस्तानच्या लोकांना मदत करू असा काही हा इशारा नव्हता. बलुचिस्तानमधले अन्याय जगासमोर मांडू एवढेच मोदींनी म्हटले होते. परंतु त्यांच्या एवढ्याही म्हणण्याचा मोठा परिणाम झाला. जर भारताने बलुचिस्तानमधल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रत्यक्ष मदत दिली तर त्यावर किती गोंधळ होईल याची कल्पनाही करवत नाही. मोदींच्या सौम्य इशार्‍याचा पाकिस्तानमध्ये भलताच परिणाम झालेला दिसत आहे. त्यामागे इतिहास आहे. १९६५ नंतर आताच्या बांगला देशमध्ये असाच प्रकार घडला होता.

बांगला देश हा पूर्वी पाकिस्तानचाच भाग होता. परंतु तिथे असंतोष निर्माण झाला. स्वतंत्र देशाची मागणी पुढे आली. त्यावेळी भारतात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी बांगला देशामधल्या बंडखोर संघटनांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले, प्रत्यक्षात शस्त्रेसुध्दा दिली आणि योग्यवेळी बांगला देशावर हल्ला करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हा इतिहास काही फार जुना नाही. १९७२ साली पाकिस्तानचे हे विघटन झालेले आहे. तसाच खेळ भारत सरकार बलुचिस्तानबाबत करील अशी भीती पाकिस्तानी लोकांना वाटत आहे आणि त्यांच्या मनात याबाबत काहीही शंका नाही की भारताने एकदा मनावर घेतले तर बलुचिस्तान सहज स्वतंत्र होऊ शकतो आणि या भीतीमुळेच आज पाकिस्तानात भारताच्या विरोधात कावकाव सुरू झालेली आहे. तिथल्या लोकांचा कांगावा पाहिल्यास हसू येते. त्यांनी या सगळ्या संघर्षाचे वेगळे चित्र निर्माण करायला सुरूवात केली आहे. काश्मीरमधल्या असंतोषाशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान एक शांतताप्रिय राष्ट्र असताना भारत देश मात्र पाकिस्तानमधल्या विघटनवाद्यांना मदत करत आहे असा उलटा आरोप त्यांनी भारतावर सुरू केला आहे.

या चर्चांमध्ये एक हताशासुध्दा दिसते. भारत देश बलुचिस्तानमध्ये किंवा कराचीमध्ये गोंधळ निर्माण करील सुध्दा. शेवटी जगाचे राजकारण तसेच असते. परंतु बलुचिस्तान आणि कराचीमध्ये विघटनवादी शक्ती वाढू नयेत यासाठी पाकिस्तान सरकार काय करत आहे असा सवाल काही निर्भिड पत्रकार उपस्थित करत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण चुकलेले आहे म्हणूनच हे घडत आहे. असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. तेव्हा हे पत्रकार पाकिस्तानच्या सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत आहेत. कारण आज अशी स्थिती आहे की पाकिस्तानला कोणी मित्र राहिलेला नाही. जर बलुचिस्तानचा लढा तीव्र झाला तर त्या लढ्याला केवळ भारतच नाही तर इराण आणि अफगाणिस्तान हेही दोन शेजारी देश मदत करतील. कारण याही दोन देशांचे हितसंबंध बलुचिस्तानमध्ये गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत बलुचिस्तानच्या बाजूला भारत, अफगाणिस्तान आणि इराण हे तीन देश असतील पण पाकिस्तानच्या बाजूला कोणीही नसेल. कारण पाकिस्तान हा एकाकी पडलेला देश आहे असे या पत्रकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे फलित असेच काहीतरी असणार हे पूर्वीपासून सांगण्यात येत आहे. परंतु त्यांचे प्रत्यंतर आता यायला लागले आहे आणि पाकिस्तान हा एकाकी पडलेला देश ठरला आहे.

Leave a Comment