कर्करोगग्रस्त स्तनांचे संरक्षण आवश्यक: डॉ कोप्पीकर

cancer
पुणे: सध्या कर्करोगग्रस्त स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याची पारंपारिक पद्धत सर्रास अवलंबिली जाते. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोगग्रस्त स्तनांचे संरक्षण करणे शक्य असून रुग्ण महिलांचे जीवन सुसह्य करण्यासाठी ते आवश्यकही असल्याचे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ स्तनशल्यचिकित्सक डॉ चैतन्यानंद कोप्पीकर यांनी केले.

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: ४० ते ४५ वर्ष वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या भारतीय महिलांच्या वृत्तीमुळे निदान होण्यास विलंब होऊन रोगमुक्तीचे प्रमाण कमी आहे; अशी खंत व्यक्त करून डॉ कोप्पीकर म्हणाले की; स्त्रियांनी स्वत: आपल्या स्तनांची नियमित तपासणी केली आणि ज्यांना शक्य आहे; त्यांनी ‘मेमोग्राफी’ तपासणी केली; तर निदान लवकर होऊन पारंपारिक शस्त्रक्रिया आणि ‘प्लास्टिक सर्जरी’चा मिलाफ असलेल्या ‘अँकोप्लास्टी’द्वारे स्तन वाचवून रुग्ण महिलांचे जीवनमान शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुकर करता येईल.

मागील २० वर्षात स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया आणि उपचारपद्धतीत झालेल्या संशोधनामुळे पाश्चात्य देशात स्तनाच्या कर्करोगाने मरण पावणा-या महिलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. भारतातही ‘अँकोप्लास्टी’कडे केवळ एक पर्याय म्हणून न पाहता स्तन रोगावरील उपचारपद्धतीचा अविभाज्य घटक म्हणून त्याला मान्यता मिळावी; अशी अपेक्षा इंग्लंड येथील ज्येष्ठ स्तनशल्यचिकित्सक डॉ जेरोम पेरिएरा यांनी व्यक्त केली.

भारतीय स्त्रियांमध्ये मुळातच स्तनाच्या कर्करोगाबाबत अज्ञान असून त्यासाठी मोठ्या जनजागृतीची गरज आहे. ‘एन्कोप्लास्टी’ला अनावश्यक प्लास्टिक सर्जरी न मानता रोगग्रस्त महिलांचा एक महत्वाचा अवयव वाचविणारी प्रभावी उपचार पद्धत असल्याचे पटवून देण्यासाठी वैद्यक तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा; अशी अपेक्षा प्रशांती केन्सर केअर मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लाले ब्रुशेरी यांनी व्यक्त केली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment