चले जाव चळवळीचे स्मरण

chale
आज ९ ऑगष्ट हा चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन दिन आहे. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकारी कचेर्‍या लुटल्या, सरकारी मालमत्तेचा विध्वंस केला. जनताच जर आपल्या विरोधात अशी पेटून उठली असेल तर आपण या करोडो लोकांवर राज्य करणार तरी कसे असा प्रश्‍न ब्रिटीशांना पडला. त्यांनी भारत देश सोडून जाण्याच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू केली. पाच वर्षांनी ते भारत सोडून गेले. देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगष्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे. महात्मा गांधी यांनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर जाहीर सभा घेऊन सरकारला हा आदेश दिला होता असे मानले जाते. म्हणून आता या मैदानाला गोवालिया टँक न म्हणता ऑगष्ट क्रांती मैदान असे म्हटले जाते. आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास नीट माहिती नाही म्हणून हा इतिहास आवर्जुन सांगण्याची गरज आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. महात्मा गांधी हे विचारवंत होते आणि त्यांनी आपल्या दक्षिणड आफ्रिकेतल्या वास्तव्यात अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर अनेक प्रयोग केले होते. ते १९१५ साली भारतात आले आणि त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट घेऊन त्यांना आपल्या अहिंसेेच्या तत्त्वज्ञानाची तसेच आपल्या प्रयोगांची माहिती दिली. द. आफ्रिकेतल्या नाताळ आश्रमात सुरू असलेल्या या प्रयोगांनी जगाला काही अहिंसेचे तत्त्वज्ञान कळणार नाही म्हणून महात्मा गांधी यांनी आपला हा प्रयोग व्यापक प्रमाणावर करावा असे गोखले यांनी त्यांना सुचविले. माणसा माणसातले प्रश्‍न अहिेंसेच्या मार्गाने सोडवण्यातच माणसाचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे असे महात्मा गांधी म्हणत असत. पण या तत्त्वज्ञानाची महती जगाला कळायची असेल तर नाताळ आश्रमाच्या बाहेर या तत्त्वज्ञानाचे प्रयोग केले पाहिजेत हे गोखले यांनी पटवून दिले. महात्मा गांधी यांनी एका मोठ्या जनसमुदायाचा प्रश्‍न अहिंसेने सोडवून दाखवावा असे गोखले यांनी गांधीजींना सुचविले. २० कोटी भारतीय हा जगातला सर्वात मोठा जनसमुदाय आहे आणि पारतंत्र्य ही या समुदायाची मोठी समस्या आहे. तेव्हा बापूजींनी भारताच्या पारतंत्र्याचा प्रश्‍न हाती घेतला. तो प्रश्‍न सोडवण्यापेक्षा तो अहिंसेने सोडवणे यावर महात्माजींचा भर होता. त्यांच्या दृष्टीने ते अहिंसेचे प्रात्यक्षिक होते.

तरुण पिढीला हा सारा इतिहास नीट कळला पाहिजे. कारण महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाच्या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी आता पुढे येत आहेत. गांधीजी आपल्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानावर ठाम असले तरीही त्यांच्याच तरुण अनुयायांना हे तत्त्वज्ञान पूर्णपणे मान्य नव्हते. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस असे त्या काळातले तरुण नेते स्वातंत्र्य हे आपले लक्ष्य आहे असे म्हणत असत कारण ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याला महत्त्व होते तर महात्मा गांधी यांच्या दृष्टीने ते स्वातंत्र्य अहिंसेने मिळत आहे की नाही याला महत्त्व होते. म.गांधी यांना स्वातंत्र्यप्राप्तीची घाई नव्हती. ते म्हणत असत की, स्वातंत्र्य काय कधीही मिळवू पण या स्वतंत्र देशात हिंदू आणि मुस्लिम एक दिलाने नांदणार आहेत की नाही याची खात्री द्या. आपण मुस्लिमांचा प्रश्‍न कसा सोडवणार आहोत हे आधी मला सांगा आणि मगच स्वातंत्र्याचा आग्रह धरा. गांधीजी त्यामुळेच स्वातंत्र्य मागणीची घाई करीत नव्हते. स्वातंत्र्य मिळालेच तर ते अहिंसेने मिळाले पाहिजे आणि मुस्लिमांचा प्रश्‍न आधी सुटला पाहिजे असा त्यांचा हट्ट असल्याने ते स्वातंत्र्याच्या मागणीचे आंदोलन घाईने पुढे रेटत नव्हते.

त्या काळातल्या तरुण पिढीला मात्र स्वातंत्र्य प्राप्तीची घाई होती. महात्मा गांधी या बाबत काहीच करीत नसल्याने या तरुण पिढीच्या मनात असंतोष होता. त्यांना काही तर आंदोलन हवे होते आणि लवकरात लवकर स्वातंत्र्य हवे होते. आज इतिहासकार असे सांगत आहेत की गांधीजींनी मुळात चले जावचा नारा दिलेलाच नव्हता. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या आणि त्या मान्य न झाल्यास आपल्याला या सरकारला चले जाव असा आदेश द्यावा लागेल असे ते म्हणाले होते पण या वाक्यातला चले जाव हा शब्द शिरसावंद्य मानून लोकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन सुरू केले. ते गांधीजींच्या आदेशाने सुरू झालेले नव्हते. त्याला गांधीजींचे नेतृत्वही नव्हते आणि हे आंदोलन त्यांच्या अहिंसेच्या आदेशावरूनही चालू नव्हते. अनेक ठिकाणी हिंसा झाली होती. पण तसे असले तरीही तो भारतीय जनमानसाच्या असंतोषाचा स्फोट होता आणि त्यामुळे ब्रिटीश शासन भयभीत झाले हे खरे आहे. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली. काही शे लोक ब्रिटनमधून येऊन २० कोटी जनतेला गुलाम करतातच कसे असा प्रश्‍न या असंतोषाच्या मुळाशी होता. तेच या आंदोलनाचे इंधन होते. त्याने स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले.

Leave a Comment