गायाळ गर्दी हवीच कशाला ?

cow
गाय हा आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे कारण गायीच्या मांसाचा साठा करणार्‍यांवर गोभक्तांकडून केल्या जाणार्‍या हल्ल्यांची दखल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी घेतली आहे. गाय हा हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि त्या बरोबर हिंदू धर्मातल्याच काही लोकांसह काही अहिंदू लोकांसाठी ते खाद्यही आहे. त्यामुळे गायीवरून मोठा संघर्ष जारी आहे. तो तसा अनेक शतकांपासून आहे असे इतिहास सांगतो. मध्य युगात काही मुस्लिम शासकांनीसी गायीची हत्या करण्यास बंदी घातली होती आणि हिंदूंच्या भावनांचा आदर केला होता असे गोवध बंदीचा आग्रह धरणारे गोभक्त सांगत असतात. अशा लोेकांना कोठेही गायीची कत्तल झाल्याची बातमी ऐकली की राग येतो. काही राज्य सरकारांनी गायींची हत्या बेकायदा ठरवली आहे. अशा राज्यात हे गोभक्त कायदा आपल्या हातात घेऊन गायीच्या हत्येस जबाबदार असणारांना स्वत:च शिक्षा करायला लागले आहेत. या अती उत्साही गोभक्तांमुळे देशातले वातावरण बिघडत चालले आहे.

मुळात ज्या राज्यांत गोहत्या बंदीचा कायदा नाही त्या राज्यात गोमांस बाळगणे हे बेकायदा होत नाही. तिथे कोणी कोणाला पकडण्याचा आणि कोणाला शासन होण्याचाही काही प्रश्‍न नसतो पण ज्या राज्यात कायदा आहे त्याही राज्यात अशा रितीने गोभक्तांनीच हुल्लडबाजी करून गायी मारणारांना शासन करण्याचाही प्रश्‍न नाही कारण तिथे गोमांस बाळगणे हा गुन्हा असला तरी त्याचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार अशा या गोभक्तांना नाही. ते काम पोलिसांचे आहे. त्यांना गायीचा फारच कळवळा येत असेल तर त्यांनी पोलिसांना खबर द्यावी आणि अशा लोकांना कायद्याने काय व्हायची ती शिक्षा व्हावी अशी मागणी करावी. पण हे गोभक्त स्वत:च न्याय निवाडा करायला लागले आणि लोकांना शिक्षा करीत सुटले. देशात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्‍न पडायला लागला आणि दलित तसेच मुस्लिमांवरील अशा हल्ल्यांना सरकारची फूस असल्याचे वातावरण तयार व्हायला लागले. असे प्रकार सुरू असताना पंतप्रधान मात्र शांत होते. आपल्या देशातल्या काही लोकांचे नवल वाटते. तेे लोक नेहमी पंतप्रधानांना अडचणीत आणायला टपलेले असतात. देशात दलितांवर हल्ले होतात हा प्रकार त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. त्यावर पंतप्रधान काहीच का बाेलत नाहीत ही बाब त्यांना महत्त्वाची वाटतेे. कारण पंतप्रधान काही बोेलले तर त्यांच्या पक्षात काही प्रमाणात खळबळ माजेल आणि कदाचित पक्षांत फूटही पडेल अशी आशा या लोकांना वाटत असते. म्हणूनच ते पंतप्रधानांना बोलायला उद्युक्त करीत असतात.

अशा वावदूक लोकांना फार संधी न देता पंतप्रधानांनी या विषयावरचे मौन सोडले. त्यांनी हातात कायदा घेणारे हे कथित गोभक्त हे खरे गोभक्तच नाहीत असा टोला लगावला. एवढेच नाही तर अशा गोभक्तांना आपली पापे गायीच्या आडून दडवायची आहेत असा आरोप केला. एकुणात हे हल्ले करणारे स्वत:ला हिंदुत्ववादी आणि गोभक्त म्हणवून घेत असले तरीही कायदा हातात घेणार्‍या या उपटसुंभांशी आपण सहमत नाही असे पंतप्रधान म्हणाले. राज्य सरकारांनी अशा लोकांना उघडे पाडावे असे आवाहन मोदी यांनी केले. त्यांच्या या पवित्र्याने भाजपात काही फूट पडली नाही. मोदींनी मौन सोडावे असा मतलबी आग्रह धरणारे मात्र त्यामुळे खट्टू झाले कारण या मुद्यावर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपात मतभेद झाले नाहीत. भाजपाच्या बदनामीस कारणीभूत असणार्‍या या नकली गोभक्तांविषयी नाहीतरी भाजपाच्या सूज्ञ आणि सुजाण कार्यकर्त्यांच्या मनात रागच होता. त्यांना पंतप्रधानांनी फैलावर घेतल्याने भाजपाचे हे कार्यकर्ते तसे खुषच झाले. कारण अशा रितीने गायीचा बहाणा करून कायदा हातात घेण्याचा हा प्रकार कोणाही भाजपा नेत्यांना पसंत नव्हता.

हा सारा प्रकार मोदी यांनी चातुर्याने हाताळला. पण मुळातला प्रश्‍न राहतोच. मोदींच्या विधानावरून भाजपात काही खळबळ माजली नाही पण महामंडलेश्‍वरांनी नाराजी व्यक्त केली. गोभक्तांवर मोदींनी अशी टीका करणे योग्य नाही असे ते म्हणाले पण त्यांच्या या मताला काहीही किंमत देण्याची गरज नाही. आपल्याला या प्रकरणात जरा खोलात जाऊन विचार करावा लागणार आहे. मुळात या नकली गोभक्तांच्या या कारवाया चालतातच कशा असा प्रश्‍न विचारावा लागणार आहे. आपण गायीच्या नावावर काहीही गोरख धंदे केले तरीही समाजाच्या निदान काही लोकांचा तरी आपल्याला पाठींबा मिळेल असे त्यांना वाटते. म्हणूनच मुळात गायीविषयी असलेली भक्ती कशी चुकीची आहे हेच समाजाला समजून सांगावे लागेल. आपल्या समाजातली गायीला देव समजण्याची प्रवृत्ती मोठी अज्ञानातून निर्माण झालेली आहे. समाजात चालणारे इतर अनेक गैर प्रकार लोकांना कायदा हातात घेऊन थांबवले पाहिजेत असे वाटत नाही. पण गायीची हत्या केली गेली तर मात्र कायदा हातात घेतला पाहिजे याला समाजातल्या या लोकांची मान्यता मिळते कारण गायीची कत्तल करणे हा कसला तरी मोठा गंभीर आणि अजीबात माफी नसलेला गुन्हा आहे अशी त्यांची भावना आहे. स्वा. सावरकर या लोकांना गायाळ म्हणून संबोधित असत. ही गायाळ प्रवृत्ती कमी होणे हा या प्रश्‍नावरचा मूलगामी उपाय आहे.

Leave a Comment