बलात्कार आणि राजकारण

rape
गेल्या काही दिवसांपासून सामूहिक बलात्कार आणि दलितांवरील हल्ले यांच्यावर फार चर्चा होत आहे. असले प्रकार निषेधार्ह आहेतच पण त्याकडे सामजिक दृष्ट्या न पाहता राजकीयदृष्ट्या पाहून मन मानेल तशी विधाने करण्याची प्रवृत्ती फार निषेधार्ह आहे. महाराष्ट्रात कोपर्डी येथे झालेल्या घटनेने सारे हादरले पण काही लोकांना या घटनेवर राजकीय टीपा टिप्पणी करण्याचा मोह आवरता आला नाही. आता उत्तर प्रदेशात अशीच घटना घडली. नवी दिल्लीच्या जवळ बुलंदशहर येथे एकाकी रस्त्यावर वाहन अडवून त्यातून चाललेली महिला आणि तिच्या अल्पवयीत मुलीवर अत्याचार करण्यात आले. आता ही घटना उत्तर प्रदेशात घडली आहे आणि उत्तर प्रदेश विधानसभेची धामधूम सुरू होत आहे. अशा वातावरणात तिथल्या समाजवादी पार्टीच्या सरकारच्या विरोधात त्याच्या विरोधकांनी हल्ला बोल करणे राजकीयदृष्ट्य साहजिक आहे. हा प्रकार देशात होतच आला आहे पण या वेळी एक वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त झाली. ती केवळ निषेधार्हच आहे असे नाही तर माणुसकीला काळीमा लावणारी ठरली आहे.

या घटनेनंतर समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आजमखान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून खळबळ उडवून दिली. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून सरकारला बदनाम करण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हा अत्याचार केला असावा असे मत त्यांनी व्यक्त केले. निवडणुका जिंकण्यासाठी हे विरोधी पक्षवाले काहीही करू शकतात. ते जातीय दंगली पेटवू शकतात. ते अशांती निर्माण करू शकतात आणि समाजात प्रक्षोभ निर्माण होईल अशी विधानेही करू शकतात. तेच लोक निवडणुकीच्या तोंडावर असे महिलांवर अत्याचार करू शकतात आणि सरकारला बदनाम करण्याचा डाव खेळू शकतात. तेव्हा सरकारने याही अंगाने चौकशी केली पाहिजे अशीही मागणी आजमखान यांनी केली. आजवर आपल्या देशात बलात्काराच्या अनेक घटना घडल्या पण बलात्कारामागे विरोेधकांचा हात असेल अशी शंका व्यक्त करणारे आजमखान हेच एकमेव आणि पहिलेच नेते आहेत. आपल्या देशातले नेते अनेक प्रकारे आपल्या विरोधकांना बदनाम करू शकतात पण असा आरोप करून बदनाम करण्याचा हीन प्रयत्न आजवर कोणीच केला नसेल. बलात्कार हा विरोधकांचा कट नाहीच पण आजमखान यांच्या असे विचित्र विधान करण्यामागे मात्र राजकीय कटाचा वास यावा अशी उत्तर प्रदेशाच्या राजकारणाची स्थिती नक्कीच आहे.

उत्तर प्रदेशात जेव्हा समाजवादी पार्टी सत्तेवर येेते तेव्हा गुंडगिरी वाढते आणि या पक्षाच्या सरकारची नेहमीच गुंडाराज अशी संभावना केली जाते. कारण समाजवादी पार्टी गुंडांना संंरक्षण देत असते. असे असले तरीही आताचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाची ही प्रतिमा बदलण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांची ही शैली पक्षातल्या काही नेत्यांना पसंत नाही. म्हणून आजमखान यांच्यासारखे जुने नेते जाणीवपूर्वक विचित्र विधाने करीत असतात. तेव्हा आजमखान यांचे आताचे हे ताजे विधान वरकरणी विरोधकांना बदनाम करणारे वाटत असले तरीही प्रत्यक्षात ते आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना बदनाम करण्यासाठी आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात आजमखान असे काही तरी विचित्र बोलल्यावर त्यांना तसेच खमंग उत्तर मिळणे हे साहजिक आहे. झालेही तसेच आहे. भाजपाच्या नेत्यांनी ते दिले आहे. आजमखान यांच्याच घरातल्या कोणा महिलेवर असा बलात्कार झाला असता म्हणजे त्यांना या बलात्काराचे गांभीर्य कळेल असे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले आहे. अर्थातच या विधानावरून पुन्हा एक गदारोळ माजला आहे.

भाजपाच्या नेत्यांनी यावर क्षमा मागावी अशी जोरदार मागणी राजकीय गोटातून आणि माध्यमांतून झाली पण त्यांनी माफी मागण्यास नकारी दिला. आता यावर येता आठवडाभर गोंधळ होत राहील असे दिसते. आपल्या देशात अशा वाईट घटना घडतातच पण आपले नेते त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जी विधाने करतात ती फार अविचारातून आलेली असतात. त्यांना कोणीतरी सुसंस्कृत पणाने प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपण अशा घटनांचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की, त्या सामान्यत: मोठ्या राज्यात घडतात. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल या राज्यांत अशा घटना अधिक प्रमाणात घडतात असे आपल्याला गुन्हेेगारीविषयक राष्ट्रीय नोंदीतून दिसून येईल. बलात्काराच्या घटनांनी पूर्वीही उत्तर प्रदेश गाजले आहे. ही राज्ये मोठी आहेत म्हणून त्यांत अशा घटना घडतात का याचा तपास केला पाहिजे. कारण ही राज्ये प्रशासन करण्यास मोठी असतात. एकेका राज्याची लोकसंख्या १० कोटीच्या आसपास तर आहेच पण त्यांचे क्षेत्रही मोठे आहे. ही राज्ये म्हणजे जगातल्या काही देशांएवढी आहेत. युरोपातला सर्वात मोठा देश म्हणजे जर्मनी पण आपल्या देशातले उत्तर प्रदेश हे राज्य जर्मनीपेक्षा मोठे आहे. एकंदरितया घटना राज्यांच्या विभाजनाच्या कल्पनेला दुजोरा देणार्‍या असतात.

Leave a Comment