व्यसनांच्या विळख्यात तरुणाई

abdul-kalam
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी १९९१ साली भारताचे भवितव्य स्पष्ट करणारा व्हीजन २०२० हा ग्रंथ लिहिला आणि २०२० साली भारत हा जगातला एक श्रेष्ठ देश असेल असे निदान केले. अर्थात तसे करताना त्यामागची कारणेही स्पष्ट केली. भारत हा जगातला तरुण देश असल्यामुळे आणि २०४० सालपर्यंत या देशाच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या जास्त राहणार असल्यामुळे भारताला महाशक्ती होणे शक्य आहे. असे त्यांचे निदान होते. लोकसंख्येचे आकडेही तसेच सांगतात. जगाच्या लोकसंख्येत भारताची लोकसंख्या १६ टक्के एवढी आहे. पण जगातल्या तरुणांच्या संख्येत भारतातल्या तरुणांचे प्रमाण २५ टक्के एवढे भरते. अर्थात भारताच्या भवितव्या मागे भारतातली तरुणाई असणार आहे. परंतु एखाद्या देशाच्या लोकसंख्येत तरु णांची संख्या जास्त असली म्हणून तो देश महाशक्ती होऊ शकतो असे काही म्हणता येणार नाही. ती तरुण लोकसंख्या कशी आहे? अशिक्षित आहे की सुशिक्षित आहे? तंत्रज्ञानात वाकब्गार आहे का? निर्व्यसनी आहे का? यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते.

भारताच्या तरुणाईकडे या दृष्टीने पाहू गेल्यास फार निराशा पदरी पडते. विशेषतः भारताच्या तरुण मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढलेले आहे. केवळ तरुणांची संख्या जास्त असून चालणार नाही. तर ते तरुण ध्येयासक्त असले पाहिजेत. व्यसनासक्त असून चालणार नाही. फ्रेंच कवी गटे याने असे म्हटले होते की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत हे मला सांगा. म्हणजे मी तुमच्या देशाचे भवितव्य काय आहे ते सांगतो. जर देशातल्या तरुणांच्या ओठावर देशभक्तीपर गाणी असतील तर देशाच्या भवितव्याविषयी काही शंका बाळगण्याचे काही कारण नाही. परंतु देशभक्तीपर गीतांच्या ऐवजी त्यांच्या तोंडाला दारूच्या बाटल्या लागल्या असतील तर मात्र देशाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करण्याशिवाय काहीही आपल्या हातात राहणार नाही. भारतामध्ये आता अशी वाईट वेळ आलेली आहे. पुण्यातल्या एका सामाजिक संस्थेने शहरातल्या मुलांच्या व्यसनांचा अभ्यास केला असून या शहरातली मुले मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत असल्याचे आढळले आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये तंबाखूच्या वाढत्या व्यसनाबद्दल खूप चिंता व्यक्त केली जात होती. नंतर अगदी पौगंडावस्थेतील मुले सुध्दा मद्यपान करायला लागली आहेत असे दिसायला लागले आणि नवी चिंता व्यक्त व्हायला लागली. त्यापुढे जाऊन काही नशिल्या पदार्थांची व्यसने वाढताना दिसायला लागली. म्हणजे व्यसनांच्या बाबतीतसुध्दा नवनवे प्रवाह येताना दिसायला लागले.

आता तर या व्यसनांनी एक वेगळेच वळण घेतले आहे. तंबाखू, दारू आणि मादक पदार्थ यांच्या पेक्षाही हस्तगत करायला सोपे आणि स्वस्थ असले नशिले पदार्थ मुले वापरायला लागली आहेत. त्यामध्ये काही पेट्रोलियम पदार्थ आहेत, खोकल्याचे औषध आहे. तसेच इंक रिमुव्हर आणि टाईपराईटिंग मशिनमध्ये वापरली जाणारी विशिष्ट प्रकारची शाई यांचा वापर मुले करायला लागली आहेत. दारू, गांजा आणि तंबाखू ही व्यसने वाईटच आहेत यात काही शंका नाही. परंतु आता ही जी नवी द्रव्ये वापरात यायला लागली आहेत त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय अशी व्यसने करणारे तरुण मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता आहे आणि त्यांचे आयुष्य एक मनोरुग्ण म्हणून जगावे लागणार आहे. म्हणजे या नव्या व्यसनांचे परिणाम फार भयानक आहेत आणि त्यामुळे ही पाहणी करणार्‍या तज्ञांचे डोळे फिरण्याची वेळ आली आहे. या सर्वांवर उपाय काय असा प्रश्‍न त्यांना सतवायला लागला आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे तणावपूर्ण जीवन आणि भयानक स्पर्धा यामुळे मुलांच्या मनावर तणाव यायला लागला आहे आणि त्या तणावाचा परिणाम म्हणून मुले व्यसनांच्या आहारी चालली आहेत. विशेषतः या मुलांच्या हाती येणारा पैसा हेही व्यसनाचे मुख्य कारण आहे. पूर्वीच्या काळी मुलांना पॉकेटमनी दिला जात नसे. आता तो दिला जात आहेच परंतु काही मुलांचा पॉकेटमनी हजारांमध्ये असतो. कारण त्यांच्या पालकांचे इझीमनी म्हणून मिळणारे उत्पन्न लक्षावधीमध्ये असते. अशी मुले आपण दिलेला पॉकेटमनी कसा खर्च करतात याकडे पालकांचे लक्ष नाही त्यामुळे ही मुले व्यसनांच्या आहारी चालली आहेत. या मुलांच्या मनावर संस्कारक्षम वयात व्यसनाविषयी तिडीक वाटेल असे संस्कार केले गेले पाहिजेत. सध्या आपल्या समाजामध्ये संस्कार करणे ही जबाबदारी समाजाची, शिक्षकांची की पालकांची यावर केवळ वाद घातला जात आहे. खरे म्हणजे या तिन्ही घटनांनी संस्कार केले तर मुलांचा फायदा होणार आहे. तेव्हा वाद न घालता या मुलांच्या मनावर ज्या जमेल त्याने किंवा सर्वांनीच चांगले संस्कार करावेत हा चांगला उपाय आहे. मात्र याबाबत टाळाटाळ सुरू आहे. मुलांच्या मनात व्यसनांविषयी तिडीक निर्माण होईल असा कसलाही संस्कार शाळेत केला जात नाही. व्यसनांच्या विरोधात एक तरी धडा शाळेच्या पुस्तकात असावा आणि तो शिकवला जावा. त्याशिवाय अन्यही मार्गांनी हा संस्कार करता येतो. छत्तीसगडच्या चिखली या गावात एका शाळेमध्ये चुन्नीलाल शर्मा नावाचे शिक्षक विशेष करून मुलांवर व्यसनविरोधी संस्कार करत आहेत. त्यासाठी ते सगळ्या धर्मातली वचने वापरतात. असे प्रयत्न सर्वच शाळांमधून का होऊ नये. मात्र शिक्षकांना तशी निकड वाटली पाहिजे.

Leave a Comment