संघाची गुरुदक्षिणा

digvijay-singh
कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. संघाच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात जमा केली जाणारी गुरुपौर्णिमेची रक्कम कोठे जाते असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. संघाने या रकमेचा हिशोब द्यावा आणि त्या पैशातून कोणती कामे केली जातात याचा खुलासा करावा असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एवढी प्रचंड मोठी संघटना आहे परंतु ८० वर्षापेक्षाही अधिक काळ चालवली जाणारी ही संघटना अजून शासन दरबारी नोंदलेली नाही. नोंदलेली नसल्यामुळे शासनाची काही बंधने तिच्यावर लादता येत नाहीत हे खरे. परंतु इतका दीर्घकाळ चाललेल्या या संघटनेने सरकारच्या खात्यामध्ये आपली नोंद का करू नये हा प्रश्‍न उभा राहतोच. या संघटनेसाठी लागणारा पैसा कोठून उभा केला जातो? संघ आणि संघाशी संबंधित विविध संघटनांची कार्यालये कशावर चालवली जातात? संघाच्या प्रचारकांचे खर्च कोणत्या पैशातून चालतात? याचा कसलाच खुलासा कधी केला जात नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कोणाच्या पैशावर चालते हे लोकांना कळलेच पाहिजे. तिला देणग्या देणारे लोक कोण आहेत? हे कधी उघड होत नाही आणि संघाचे नेते किंवा कार्यकर्ते संघाच्या कोणत्याही कामासाठी कधी निधी संकलनाचे काम करत नाहीत. संघाचे अनेक सहानुभूतीदार आहेत. त्यात अनेक लक्षाधीश आणि कोट्यधीश आहेत. ही मंडळी आणि संघाचे सामान्य स्वयंसेवक आपल्याला संघाला जी काही मदत करायची असेल ती सारी मदत वर्षातून एकच दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला संघाच्या शाखेवर जाऊन तिथे गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करतात. संघाचे हजारो शाखांवर या एकाच दिवशी हा कार्यक्रम होतो. कार्यक्रमादिवशी समोर एक कलश ठेवला जातो. त्यात स्वयंसेवकांनी इच्छा असेल तेवढी रक्कम टाकावी असे सांगितले जाते. शिस्तीत ओळीने बसलेले स्वयंसेवक रांगेने येऊन ध्वजाला प्रणाम करतात आणि समोर ठेवलेल्या कलशामध्ये आपल्याला इच्छा असेल तेवढी रक्कम टाकतात. पूर्वीच्या काळी ही रक्कम फार कमी असे. पण आता बरेच बडे उद्योजक, निमशासकीय अधिकारी, व्यापारी हे गुरुदक्षिणेच्या कलशामध्ये नोटांची पुडकी टाकायला लागली आहेत. हे पैसे देणार्‍या लोकांच्या मनामध्ये आपण देत असलेल्या पैशाचा विनियोग कसा होतो या विषयी तिळमात्र किल्मिष नसते. म्हणूनच ते मोकळ्या मनाने हिंदुत्वासाठी म्हणून आपल्याला जे काही देणे शक्य आहे ते गुरुदक्षिणेच्या रूपात त्या कलशात टाकत असतात.

अशा रितीने गुरुदक्षिणा देणारे स्वयंसेवक आणि सहानुभूतीदार हे संघाचा अशा रितीने जमा होणारा निधी आणि त्याचा विनियोग याबाबतीत कितीही आश्‍वस्त असले तरी एवढ्या प्रचंड रकमेचा हिशोब आणि लेखाजोखा सार्वजनिकरित्या कधीच सादर केला जात नाही आणि संघाचा निधी जमतो किती, वापरतात कसा याचा बोध कोणालाच कधी होत नाही. या गुरुदक्षिणेचा हिशोब सादर केला जावा, मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून त्यांचे ऑडिट केले जावे आणि संघाचा निधी जमतो तरी किती ते जनतेला कळावे अशी मागणी अधूनमधून पुढे येत राहते. परंतु संघाच्या प्रघातानुसार संघाचे पदाधिकारी किंवा अधिकारी अशा मागणीचा कसलाही खुलासा करत नाहीत. हिशोबाला नकारही देत नाहीत आणि हिशोब सादरही करत नाहीत. आपल्यावर जी काही टीका होईल तिला उत्तर द्यायचे नाही असा संघाचा प्रघात आहे. अलीकडे हा प्रघात मोडला गेला आहे आणि संघाचे नेतेही आरोपांचे खुलासे करायला लागले आहेत. अर्थात त्यांनी असे खुलासे सरसकट केले नाहीत तरी गुरुदक्षिणेचा हिशोब मात्र सादर केला पाहिजे.

मा. श्री. दिग्विजय सिंग यांनी बर्‍याच दिवसांनंतर पुन्हा एकदा ही मागणी पुढे केली आहे. दिग्विजय सिंग हा मोठा विक्षिप्त माणूस आहे. तो जे काही बोलतो त्याचे उत्तर देण्याची गरज नसते. वगैरे विधाने करून दिग्विजय सिंग यांनी मांडलेला मुद्दा नजरेआड केला जाण्याची शक्यता आहे. किंबहुना या मागणीनंतर आता सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्या अशाच स्वरूपाच्या आहेत. त्यात बहुसंख्य प्रतिक्रिया या संघाच्या सहानुभूतीदारांच्या आहेत हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र दिग्विजय सिंग हा माणूस कसाही असला तरी संघाच्या गुरुदक्षिणेच्या बाबतीत त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा नजरेआड करण्यासारखा नाही. संघाचे पदाधिकारी खासगीत बोलताना, संघाला ऑडिटची गरज नाही असे म्हणत असतीलही. संघाचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे काम करणारे असल्यामुळे ते काही निधीमध्ये फेरफार करणार नाहीत. त्यांच्या या प्रामाणिकपणावर विश्‍वास ठेवून हिशोब सादर करण्याचा आग्रह सोडला पाहिजे असाही युक्तिवाद संघाकडून हलक्या आवाजात केला जातो. मात्र हे खरे असले तरी पैसा कोण वापरतो यापेक्षाही पैशाचा पारदर्शकपणे हिशोब दिला जातो की नाही हे महत्त्वाचे असते. आजवर संघाने तर्कशास्त्राला पटेल असा कसलाही युक्तिवाद किंवा खुलासा गुरुदक्षिणेच्या बाबतीत केलेला नाही. संघाला आपली जी प्रतिमा निर्माण करायची आहे तिच्यासाठी हा हिशोब सादर होणे आवश्यक आहे.

Leave a Comment