उत्तर प्रदेशातील जातीयवादी राजकारण

voter
कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशामध्ये गेल्या ३० वर्षातील आपली गेलेली व्होट बँक परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ब्राह्मण मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. असे करतानाच प्रत्यक्षात मात्र कॉंग्रेसने आपण जातपात विरहित निवडणूक लढवणार असल्याचे वरकरणी तरी सांगायला सुरूवात केली आहे. परंतु मुळातच कॉंग्रेसचा प्रभाव कमी असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरील जातीय विभाजनावर कॉंग्रेसपेक्षाही भाजपाचा प्रभाव अधिक पडलेला दिसत आहे. या राज्यातले जातकारण विलक्षण प्रभावी आहे. भाजपाचे नेते दयाशंकर सिंग यांनी मायावती यांच्यावर अयोग्य पध्दतीने टीका केली. या घटनेने उत्तर प्रदेशातल्या जातकारणाचे अनेक रंग प्रकट व्हायला लागले आहेत. या घटनेपासून उत्तर प्रदेशातला ठाकूर वर्ग राजकारणामध्ये आता आक्रमक व्हायला लागला आहे.

दयाशंकर सिंग यांना भाजपाने पक्षातून काढून टाकले आहे आणि त्यांच्या निरर्गल उद्गाराचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागेल असे म्हटले जात असले तरी आता वेगळेच वारे वाहताना दिसत आहेत. दयाशंकर सिंग यांच्या विधानाला उत्तर देताना मायावती यांनी अतिरेकच केला. राज्यभरातल्या बसपा कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांनी दयाशंकर सिंग यांच्या निषेधाचा प्रचंड मोठा कार्यक्रम राबवला. तो राबवण्यामागे दलितांना पुन्हा एकत्रित करणे हा मायावती यांचा हेतू होता. एकंदरीत आपली दलित व्होट बँक सुरक्षित आणि संघटित झाली पाहिजे असा मायावती यांचा प्रयत्न होता. गेल्या काही दिवसांपासून या त्यांच्या व्होट बँकेला थोडे धक्के बसत होते. आता मात्र सारी दलित जनता त्यांच्या मागे उभी राहिली आहे.

दलित मतदार मायावतींच्या मागे ताकदीने उभे राहिले परंतु अलिकडच्या काळात मायावती यांनी दलितांशिवाय इतर वर्गांनाही जवळ करून सोशल इंजिनिअरिंग केले होते. बसपाच्या निदर्शकांनी दयाशंकर सिंग यांचा निषेध करण्याच्या निमित्ताने ज्या जातीयवादी घोषणा दिल्या त्याचा परिणाम होऊन दलितेतर मतदार मात्र मायावतींपासून दूर गेले आहेत. विशेषतः ठाकूर समाज आता एकवटला आहे. दयाशंकर सिंग यांनी मायावतींचा अपमान केला ही गोष्ट खरी. परंतु त्याचा निषेध करताना मायावती आणि बसपा नेत्यांनी दयाशंकर सिंग यांच्या आई, बहीण आणि मुलगी यांचा उध्दार करायला नको होता अशी भूमिका घेऊन हा ठाकूर वर्ग आता पुढे सरसावला आहे. तो एकवटून भाजपाच्या मागे उभा राहिल्यास दयाशंकर सिंग प्रकरण भाजपासाठी उपकारकच ठरले असे म्हणावे लागेल.

Leave a Comment