हिंसाचाराचा आगडोंब

afganistan
काल अफगाणिस्तानात झालेल्या प्रचंड बॉम्बस्फोटात ८० लोक ठार झाले. १९८५ पासून अफगाणिस्तान हा देश भीषण हिंसाचाराच्या चक्रवातामध्ये सापडला आहे. जगाच्या अन्यही भागामध्ये कमी जास्त प्रमाणात दहशतवाद आणि हिंसाचार सुरूच आहे. किंबहुना गेली २५ वर्षे सारे जगच दहशतवादाने ग्रासले गेलेले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातल्या हिंसाचाराकडे लोकांचे लक्ष नाही. परंतु उपलब्ध आकडेवारीनुसार २०११ सालपासून अफगाणिस्तानमध्ये जवळपास २० हजार लोक हिंसाचाराला बळी पडले आहेत. जेमतेम साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये केवळ ५ वर्षांमध्ये या देशातले २० हजार लोक असे हिंसाचाराला बळी पडावेत यावरून या देशापुढे असलेले हिंसाचाराचे संकट किती भयानक आहे याचा अंदाज येतो. अफगाणिस्तानने हा जगातला सर्वाधिक हिंसाग्रस्त देश ठरला आहे. गेल्या २० वर्षात या देशाला सामान्य जीवन कसे असते हेच माहीत नाही. हजारो लोकांनी स्थलांतर केलेले आहे. शाळा नित्य भरत नाहीत, अनेक व्यवसाय बंद आहेत.

खरे म्हणजे अफगाणिस्तान हा देश सुक्या मेव्यासाठी सार्‍या जगात प्रसिध्द आहे. परंतु हा व्यवसाय कमी झाला आहे. केवळ अफूच्या विक्रीवर या देशाची अर्थव्यवस्था जारी आहे आणि अफूचा व्यापार हा चोरटा व्यापार असल्यामुळे अर्थव्यवस्थेत काळे धंदे करणार्‍या माफियांचा सुळसुळाट झाला आहे. हे माफिया आणि आपल्या धार्मिक विचारांचा लोकांवर मारा करणारे पाक समर्थित तालिबान अतिरेकी या दोघांच्या चपेट्यात हा देश सापडला आहे. पूर्वीपासूनच या देशात टोळ्यांची युध्दे जारी आहेत. ती अजून सुरूच आहेत. शिवाय अफगाणिस्तानात आता पेट्रोलच्या खाणी सापडण्याची शक्यता वाटत असल्यामुळे बड्या देशांचे हितसंबंध या देशाच्या अशांततेत निर्माण झाले आहेत. त्यामुळे निरनिराळ्या कारणांनी हिंसेस प्रवृत्त होणारे विविध गट आणि माफिया यांना या बड्या देशांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे दिली जातात. त्यांचा वापर करून विविध अफगाण नागरिक एकमेकांचे जीव घेत आहेत. अफगाणिस्तान हा गेल्या शतकातला आणि चालू शतकातल्या दोन दशकातला सर्वाधिक हिंसाग्रस्त देश म्हणून अभ्यासकांचा विषय ठरला आहे. काल बामियान प्रांतातल्या वीज वाहिनीची मागणी करणार्‍या निदर्शकांवर मानवी बॉम्ब आदळवून ८० लोकांचे जीव घेण्यात आले. या ठार झालेल्या लोकांशिवाय २०० पेक्षाही अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातला हिंसाचार हा त्या देशापुरता मर्यादित नाही. तो भारत, पाकिस्तान, बांगला देश या तीन देशांना ग्रासू शकतो. किंबहुना ग्रासत आहे.

८० लोकांचा जीव घेणारा हा बॉम्बस्फोट आयसीसच्या अतिरेक्यांनी घडवला आहे. आयसीसचे अतिरेकी आता भारताच्या अनेक भागात घुसले आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी बांगला देशमध्ये मुंबईतल्या २६/११ च्या स्फोटासारखा स्फोट घडवला. तेव्हाच भारतीय उपखंडातील आयसीसच्या प्रवेशाची नांदी झाली असे म्हटले गेले होते. आता आयसीसने अफगाणिस्तानमध्ये आपले बिभत्स दर्शन घडवले आणि कोणत्याही क्षणी पाकिस्तानमध्ये त्यांची पावले दिसू शकतात असे संकेत आहेत. गेल्या दशकामध्ये अल कायदा या संघटनेने असाच उच्छाद मांडला होता. स्वतः अतिरेकी कारवाया करणे मात्र त्याच बरोबर इतर संघटनांना उचकवणे आणि त्यांना घातपाया कारवायांसाठी मदत करणे असे अल कायदाचे स्वरूप होते. अमेरिकेतला ट्विन टॉवरवर हल्ला करून इतिहासात त्यांनी आपले नाव नोंदले. ओसामा बिन लादेनच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने चालणार्‍या या संघटनेचे शेवटी अमेरिकेमुळे कंबरडे मोडले आणि आता ही संघटना कालबाह्य झाली आहे.

खरे म्हणजे ती कालबाह्य होण्याचे तसे काही कारण नव्हते. परंतु तिची पाकिस्तानच्या आयएसआयशी बिनसले आणि तिचा अंत सुरू झाला. कारण एकदा आयएसआयशी बिनसले की सरकारच्या रूपात उभा असलेला पाठींबा कमी होतो. कारण आयएसएआयच्या माध्यमातून केली जाणारी मदत ही पाकिस्तान सरकारची मदत असते. ती बंद झाली आणि अल कायदा संपली. अल कायदाच्या मानाने किरकोळ असलेल्या हिजबुल मुजाहिदीन, लष्कर ए तैयबा अशा किरकोळ संघटनासुध्दा जोमाने कामे करत आहेत कारण त्यांना पाकिस्तानची मदत आहे. आयसीसला ही मदत मिळते की नाही माहीत नाही परंतु भारतातल्या तरुणांना आयसीसमध्ये भरती करण्याची कारस्थाने जोमाने सुरू आहेत. त्या अर्थी आयसीसच त्या माध्यमातून काम करत आहे असा संंकेत मिळतो. मराठवाड्यातले १०० तरुण आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी परागंदा झालेले आहेत. परभणीमध्ये एका अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याने दिलेल्या जबाबावरून त्याच शहरातल्या एका तरुणाच्या घरी बॉम्ब सापडलेला आहे. जो बॉम्ब त्याने आपल्या घरी तयार केला होता. त्याची कृती त्याला इंटरनेटवरून आयसीसच्या प्रशिक्षकांनी समजावली होती. हे सगळे रॅकेट पाहिले म्हणजे आयसीस आणि तत्सम दहशतवादी संघटना यांच्या जाळ्यात महाराष्ट्र आणि त्या पाठोपाठ भारत देश कसा ओढला जात आहे याचे दर्शन घडते.

Leave a Comment